दिनांक ७ ऑक्टोबर २०२५,इस्लामपूर/जामखेड:
इस्लामपूर-सांगली रस्त्यावर शेतकरी उद्यानाजवळ रविवारी (दि. ५) रात्री १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार, आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आविष्कार गोकुळ गायकवाड (वय २४, मूळ रा. उघडा जामखेड, जि. अहिल्यानगर) याचा जागीच मृत्यू झाला.

आविष्कार हा शेवटच्या वर्षात शिकत होता. तो मित्राला सोडून परतत असताना, शेतकरी उद्यानाजवळील वळणावर त्याच्या दुचाकीवरील (एमएच १६ सीएल ५६५९) नियंत्रण सुटले आणि रस्त्याकडेने चाललेल्या आदम कांबळे (वय ५६, रा. रमाईनगर, इस्लामपूर) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात आविष्कारच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अतिरक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, पादचारी आदम कांबळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या मार्गावर गेल्या चार महिन्यांत सहा जणांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील दुभाजक, बंद सिग्नल व्यवस्था आणि अतिवेगामुळे अपघात वाढत असल्याची तक्रार करत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Advertise..
