दिनांक १७ जुन २०२४ कोळगाव, श्रीगोंदा:
कोळगाव ग्रामपंचायतच्या विशेष प्रयत्नातून आणि एसटी महामंडळ श्रीगोंदा यांच्या सहकार्याने कोळगाव आणि पंचक्रोशीतील सर्व गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी व इतर प्रवाशांसाठी एसटी विद्यार्थी पास कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. हा कॅम्प आठवड्यातील दर बुधवार आणि गुरुवार या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत कोळगाव येथील नवीन बस स्थानकात होणार आहे, अशी माहिती कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी दिली.
कोळगाव, चिखली, कोरेगाव, घुटेवाडी, सुरेगाव, मुंगूसगाव, कोथुळ, ढोरजा, घारगाव, हिवरेझरे, काळेवाडी, विसापूर, उक्कलगाव येथील विद्यार्थ्यांनी व इतर प्रवाशांनी या सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच लगड, उपसरपंच माया मेहेत्रे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.
सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी सांगितले की, “गावातील शालेय विद्यार्थ्यांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळाचे विशेष आभार मानतो ज्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम शक्य झाला आहे.”
स्त्रोत:(पत्रकार महेश शिंदे)


