श्रीगोंदा तालुक्यातील जनतेसाठीची जल जीवन मिशन योजना गॅसवर..


दिनांक २४ जून २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील जन जीवन मिशन योजनेची कामे अपूर्ण राहिल्यामुळे ‘हर घर पाणी’ योजनेला हरताळ फासल्या जाण्याच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी बेमुदत अमरण उपोषण पुकारले आहे.

शासनाने ग्रामीण भागातील जनतेला व पशुधनाला पिण्याचे पाणी मिळावे म्हणून श्रीगोंदा तालुक्याला जन जीवन योजना मंजूर केली होती. यासाठी रुपये ११०६०.१६ कोटी (रुपये एकशे दहा कोटी साठ लाख सोळा हजार) मंजूर करण्यात आले आणि प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश २०२२ मध्येच दिले होते. सदर काम पूर्ण करण्याची मुदत १२ महिने होती.

काही गावांतील कामे संबंधित ठेकेदारांनी पूर्ण केली असली तरी काही गावांतील कामे मुदत संपून सहा महिने झाले तरी पूर्ण झालेली नाहीत. परिणामी, काही गावांना पिण्याचे पाणी टँकरने पुरवावे लागत आहे. अपूर्ण कामांपैकी चांभूर्डी या गावची परिस्थिती विशेषतः भयानक आहे.

श्रीगोंदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी जगताप व श्रीरंग साळवे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन तसेच विद्यमान आमदार व खासदार यांना दिलेल्या पत्रात सदर कामे २६ जून २०२४ पर्यंत पूर्ण न झाल्यास २७ जून २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजल्यापासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे जाहीर केले आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, कामे वेळेत पूर्ण न केल्यामुळे शासनाचा उद्देश सफल होताना दिसत नाही. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासनाचा पैसाही वाचवण्यासाठी आणि गावागावांतील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावेत.

अशा स्थितीत प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. योजनेचे काम कार्यारंभ आदेशातील नियम व अटीनुसार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कायदेशीर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

स्रोत:(निवेदन पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading