दिनांक १२ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:
नवीन दुचाकीचा आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या दोन तरुण मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील आदित्य संदीप नलगे आणि किरण मोहन लगड हे दुचाकी घेण्यासाठी अहिल्यानगरला गेले होते. मात्र, परतताना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या पीकअपने जोरदार धडक दिली.
ही दुर्घटना नगर-दौंड महामार्गावरील कोळगाव फाटा येथे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. दौंडकडून नगरच्या दिशेने द्राक्ष घेऊन जाणाऱ्या (एम. एच. १८ बी.जी २९९५) या पीकअपने दुचाकीला धडक दिली. या अपघातात आदित्य नलगेच्या पोटावरून वाहनाचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या किरण लगड याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचाही दुर्दैवी अंत झाला.
या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, कोळगाव गावाने दोन तरुण मुलांना गमावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)




