कळा, उत्तम बंडू तुपे.(भाग १२).

कळा, उत्तम बंडू तुपे.

” भिताडांवर भुतागत नाचत हुती . सगळ्याच सावल्या भयानं भेसूर दिसत हुत्या . कोणाकोणांत कायकाय मुरलं हुतं ; कोणाच्या सावलीखालनं भूत उठल ह्याचा भरवसा नव्हता . लोची भाकऱ्या थापता थापता थांबली हुती . “ इतकी आब्रू हाय तर कशाला दुसऱ्यांच्या कामाला लावतासा ? घरात बसवून घाला खायाला . न्हायतर गळ्यात बांधा ; बसा राखण करत . माझ्या पोरीला नुसतं पाण्यात बघताय . तिनं आता …. हातांत धरलीय नव्हं का ; तवा कुणीबी यावं ; हाणून जावं . तुमच्या भणीनं बावं ठिवलं हुतं ; तसं तर करत न्हाय ही . “ लोचे ! थोबाड बंद कर . लई बोलू नगस . “ बोलू नोको ? लग्नाआदी पिल्लं पाडत हिंडली न्हाय माझी लेक .

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

” लोची बोलत हुती . चुलबी ढणाढणा पेटली हुती . तव्यावर टाकलेल्या भाकरीचा पार कोळसा झाला हुता . जळक्या वासानं घर भरलं हुतं . घरातला कालवा ऐकून शेजारची चार म्हातारी पार घरात घुसली हुती . त्यासनी बघून उगा बसलो हुतो . सुबीचा सासरा पुढं येवून बोलला . “ संतू ! का भांडतूस रं ? ” ” जावा आपल्या आपल्या घरी ; तुमच्या पावंतर आमचं आलं न्हाय . सुबी आली ; तिनं सासऱ्याला ओढून नेलं . नकट्यागत गप गेली ; काय बोलली न्हाय . मनाला मोडती घालून बाहेर दारात आलो . “ आयला ह्यानच्या ! लेकीची भाड खाऊन दमले . आता सुणांची भाड खात्यात आन् मला शाणपन शिकवाय येत्यात . ” एकटाच शिव्या देत दारात उभा हुतो . घरबी आतनं धुसफुसत हुतं . लोचीनं दुर्व्याला दाती धरलेलं . दुर्व्या मोठा अन्यव केल्यागत गप . मंगल सुळावर उभी केल्यागत मोठ्यानं आरडून रडत हुती .

पुन्हा घराकडं तोंड केलं . ” गप व्हता का न्हाय आता ? ” घर गप झालं . सुबीचा सासरा त्याच्या दारातनं बोलला ” माझ्या सुणला कुठं धरलेलं बघिटलं ; का तिच्यावर बसलेलं कुणी तू उठवलंस ? ‘ मनात आलं दुपारचं सगळं ओकावं ; पर मन मारून गप झालो . सुबीनंबी सासऱ्याला घरात घातलं . गप येवून घरात बसलो . कुणीच कुणासंगट भाषा करत नव्हतं . आपल्याच नादात घर ! पोटाला वणवा लागलेला . आ करून मोठ्यानं जांभाळी दिल्यावर लोचीनं दोन भाकरी आन् मुठभर भाजी पितळीत घालून पितळी पुढं सारली. भुकेच्या तडाख्यात खाली बघून तेवढ्यांचा बुकना केला . बाहेर येवून पडायचा बेत केला ; तवर पावसाची रिपरिप चालू झाली .

अभाळ गळायला लागलं . तवा एका कोपऱ्याला लेपाटं टाकून पडलो . कवा डोळा लागला ; काय कळलं न्हाय. ” पाठणीला ऊन ऊन वारं लागलं तवा कुस बदलली ; लोची माघं येऊन पडली हुती . घरात अंधार हुता . मंगलच्या बांगड्या वाजत हुत्या . लोची माझ्या पांघरुणात हुती. घटकंत सगळा राग विरघळून गेला हुता . विझून कोळशागत पडलो हुतो . टकुऱ्यातल्या झिणझिण्या आजून गेल्या नव्हत्या. लोची उठून तिच्या आथरुणाकडं निघाली हुती . तिच्या हाताला धरून बस ‘ म्हणलं . ‘ आता आणखी काय पायजी . ” ” काय नग ; बस वाईचं . तुला सांगतू … ‘ “ काय सांगता ; कर्म ? ” ” लोचे ! धोंडी कारभाऱ्याच्या कामावरनं दुपारांच आलो . ” ‘ आत्ता गं बया ! हे काय करून बसला ? एक तर कुठं काम न्हायती . आण तुमी लागलेलं काम टाकलं . म्हणायचं काय तुमासनी ? ” “ मंग ; त्याच्या शंभर टिकल्यासाठी काय महिनाभर फुकाट राबू काय ? ” ” बरं केलं. आता बसा भिलागत ससं हुडकंत . ‘

“तसलं काय करतू काय मी ; तर येताना चव्हाणाच्या मळ्यातनं येत हुतो . नारायणानं द्राक्षाचं वेल छाटायचं काम दिलं . काम करत हुतो . आपलं सजागती नजर टाकली . तर नारायण आन् सुबी उसात जाताना नजरला पडली. म्याबी हागायच्या निमतानं तिकडं गेलो . बघतोय तर दोघांचं जुळं जुगत हुतं . ‘ ” लोकाचं पाप बघायला काय वाटतं का तुमाला ? आन् बघून गप बसला ? ” “ तर काय करू ? ” ” आपली मंगल त्या जागी आसती तर काय केलं आसतं ? ” “ तिथंच धोंडा घातला आसता टकुरीत . टाकली आसती मारून दोघंबी.

” “ मंग ; तसंच करायचं हुतं . ” ” आण फासावर कोण तुझा बा जाणार काय ? मला जिता सोडला आसता त्या चव्हाणाच्या बेन्यानं ? ” ‘ न्हाय तर तिच्या सासऱ्याला सांगायचं . ‘ ” कसं सांगती गं ? नारायणानं मला धमकी दिलीय . ” “ पेटला मेला नारायण ; जळक्या तोंडाचा ; त्याला काय हाय का न्हाय ? त्याच्या लेकरागत न्हाय का सुबी? सुबीचं वय काय ; त्याचं काय ? ‘ “ ते ह्या सुबीलाबी कळायला पायजी का नग ? लोचे , तुला एक सांगतो . हे ” ” ” कुठं बोलू नगस .” ” ‘ न्हाय बोलायची मी . त्याच्या इदमानं काय कोरडं खाल्लय म्या ? ” “ मंग जा . आता झोप जावून तुझ्या जाग्यावर निवांत. सकाळला लवकर उठाय पायजी . ‘ ‘ आमाला आमची भरांत हाय की . ‘ ” कशाची गं भरांत ? ” ” मोकाशाची पळाटी , भांगलायची झाली . आता कुणाकडं रोजगार बघवा ? हुतं एका टाकीचं काम ; सरलं तेबी . ” “ लोचे ! गावात कुणाकडंबी जा ; कामं बघा . पर चव्हाणाच्या बांधाला जावू नगसा . लई वंगाळ हाय त्यो . ‘ “ आपून नीट आसलं मजी कुणी काय करत न्हाय . “ तरी नगं .

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

तरणीताठी पोर हाय आपली ; कुणाचं मन कुणाला घावलंय ? वासना फिरली तर माणूस गू दिकून खातंय . बेन्याची नजर लई वाईट हाय बघ . घरची बायकू झुरतीय ; आन् ह्यो रानं हुंगत फिरतोय ह्या वयांत . ” “ आवं , मंग तुमी जावा की , जुनी वळख काढा. ‘ “ लोचे ! पड बरं आता ; उगी टिंगल करू नगस . तुझा चावरापना बास झाला . अंथरुणावर पडलो हुतो . डोळा काय लागत नव्हता . आजून रातबी लई बाकी हुती ; झोप काय येत नव्हती . घरातला अंधारबी नको वाटायला लागला ; बाहेर बी अभाळ गळत हुतं . नजर मेल्यागत अंधारात बघत हुतो . कायबी दिसत नव्हतं ; तरी डोळं तेज हुतेलं . डोळ्यांवर पांघरून वढून तसाच पडलो ; अंधाराचं भ्या वाटत हुतं . “

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading