कळा, उत्तम बंडू तुपे.(भाग १५).

कळा, उत्तम बंडू तुपे..

रानवडी जुंधळं फुलोऱ्यात हुतं . कणसाच्या बोंडांत कुठं कुठं कवळं दानं दिसत हुतं . भारांतला जुंधळा घमघमत हुता . पिकाचा वास मातीच्या वासात मिसळून आगळाच गोड वास रानात भरला हुता . पाखरांचं भिरच्या भिरं कवळं दुधाळ दानं खायाला येत हुतं . राखणी बसल्या हुत्या . वाऱ्यात गारवा भरला हुता . दिवाळी येवून गेली हुती . तरी मंमईची माणसं आली नव्हती .

https://bit.ly/bspmycityshrigonda

त्यांची वाट बघून डोळंबी थकलं हुतं . जाता वक्ती तुका म्हणला हुता – दिवाळी करायला गावाला आलो की तुला घेऊन जाईन . पर त्यानंबी गाव वर्जी केलं ; आला न्हाय . भेलके म्हातारा रोज वाट बघतोय . लेकाचं टपाल इल ; न्हायतर तो ; पर काय येत न्हाय . म्हाताऱ्याला बसली जागा उठवत नव्हती . थंड तर मी म्हणत हुती . म्हातारा ह्या थंडीनं एकाद वक्ती राम म्हणायचा ; काय नेम नव्हता . पिकलं पान कवातरी गळायचं . सवं सांजला रानातनं आलो हुतो . बाहेर दारात बसायचं मनात हुतं ; पर थंडी वाजत हुती म्हणताना तसाच घरात गेलो .

अंगात वाईच उबारा यावा म्हणताना चुली पुढं शेक घेत बसलो . लोचीनं नुसती चूल पेटवून हुलग्यांचं कडान कढवत हुती . एकादया एकराची खोती घियाचं मनात हुतं . ज्याची रानं पिकली हुती ; त्या सगळ्यासनी इचारलं ; पर खोती देतो म्हणून कुणी तोंड दिकून उघडलं न्हाय . खोती दियाचं लांबच राहिलं . चितागती हूनशन बसलो हुतो . एका टाकीचं काम कुठं लागत नव्हतं . आज ह्या बांधाला तर उद्या त्या बांधाला . दांडून विट्टी कोलल्यागत पळत हुतो . खरं ह्या दिसांत कामं मागं लागायची ; कामांच्या मार्ग लागूनबी कामं धावत नव्हती . गुन्हाळं लागली आसती तर गेलो असतो ऊस तोडायला ; जाळव्या म्हणून जाळ घालायला . ह्या साखर कारखान्यानं तेबी बंद झालं हुतं . चुलीपुढं बसलो हुतो तरी अंगाला जाळ लागत नव्हता . आतनं पार गार पडत चाललो हुतो .

सगळी रानमळं वाकुडपन आल्यागत झाली हुती . लोची भाकरी थापत हुती . आजच्या भागरीत उदयाची भाकरी उगवायची . तिच्यासाठी जगायचं . उदयाची भाकरी कुठं बघायची ? कुणाला मागायची ? कोण हाय दाता ? ” आरं ! मी काय भीक मागत न्हाय . ह्या दोन हाताला काम दया ; म्या कवा हाटून रोजगार मागीतलाय ? देताल त्या रोजगारात राबतोय . सांगाल ती कामं करतोय . जुपाल त्या वक्ताला जुपून घेतोय नि सोडाल त्या वक्ताला सुटतोय . रातध्याड राबायची हिंमत हाय अंगात ; मला काम दया . कसं तोंडातनं हे आलं ; कळलं सुदिक न्हाय . लोची भाकरी थापता थापता गप झाली . टक लावून माझ्याकडं बघायला लागली ; तवा माझी मला लाज वाटली . आपून हे काय बोललो . “ काय वं ! आसं खुळ्यागत काय बरळताय ? ” ‘ बरळत न्हाय , खरं हाय ; रानं हिरवीगार हायती तर ह्या वल्या रानात काम न्हाय ; वाळल्या रानात कुठलं ? ”

“ उठा , चूळ भरून भाकरी खा . ” व्हय ; आज हाय म्हणून भाकरी खायाची . उदया ? ” “ उदयाचं उदयावर ; उठा . ” न्हाय लोचे ! भूक पार मरून गेलीय . भाकरीवर काय मन व्हत न्हाय . लोचीनं एक भाकरी मोडून ताटात मांडली . कुरडूची भाजी हुती . चारच घास खाल्लं आन् उठलो . “ लोचे ! मिसाळ आलाय वाटतं . त्याच्याकडं तरी जावून येतो . बघतो काय म्हणतोय ते . ” ‘ आता त्यानं आपल्या फैलातली माणसं कवा दसऱ्याला नेल्यात . त्याला गरज नसंल . ” “ बघतो . त्याचं पाय धरतो ; हिथं बसून तरी काय करती ? ” ” व्हय ; पर उदया उजडणार हाय नव्ह . ” उदया गेला तर भेट हुणार न्हाय . ‘ आता रातीचं कवा जाल ; जवळ हाय व्हय ? ” ” काय व्हत न्हाय . आता जातू ; बघतो काय म्हणतो . ‘ ” काय म्हणतो तो तरी ; आपलं हिथंच बघा कुठं . “ लोचे ! हिथं काय आता रोज कामा लागंल आसं वाटत न्हाय . मी मिसाळकडं जातू . “ आऽवं , तो तरी आलाय का न्हाय – कुणाला ठावं ; आता आंधारात कुठं जाताय ? पायांत एक पायताण न्हाय . थंड ही आसली ! ”

” थंडी वाजतीय म्हणून कसं बसायचं ? पोट म्हणतंय व्हय थंड लागतीय ? ” तसाच उठलो . बाहेर आलो . अंगावरनं बोराटीची फांजर फिरवल्यागत वाऱ्याची गार झुळूक फिरली . अंगाला ओरबाडं काढल्यागत वाटलं . देही अकसल्यागत झाली . वरनं गार वाऱ्यांचं चपकार ; खाली गार पडलेली भुई . पाऊसानं उघडं पडलेलं खडं ; काटं रुतल्यागत पायांत रुतंत हुतं . झपाझपा चालायचं मनात हुतं . तरी पाय उचूलूसं वाटत नव्हतं . हात बांधून हाताची घडी उरावर धरली हुती . अंगातली ऊब धरून ठेवल्यागत तेवढंच वाटत हुतं . वल्या रानातला गारवा देहीला चावत हुता . खाळामिट काळोख पडलेला ; तरी डोळं मिसाळाच्या वस्तीकडं लागलं हुतं . तेवढाच उबारा येत हुता . सरकत्याच्या मळ्याजवळ आलो तवा कोल्हाचं जुळं आडवं गेलं . मनाला आणखी उभारी आली ; काम फत्ते हुणार . झपाट्यानं निघालो हुतो . मुसलमानाच्या इनामात आलो तवा एकाएकी घुबड घू : घू : करून आजारी आसल्यागत वरडायला लागलं . तवा पोटाला हातभर डबरं पडल्यागत वाटलं . लांब तिकडं तांबोळ्यांच्या चिचंवर पिंगळा बोलला . डाव्या बाजूनं टिटवी आरडत उडाली . मन कुचमून गेलं ; तरी तसाच पुढं पुढं जात हुतो . लवनात उतरलो . बाजूची पिकं खसकसली . वळू अंगावर आल्यागत वाटलं .

https://bit.ly/bspmycityshrigonda

पुढचा पाय पुढं आन् मागचा मागं धरून उभा केल्यागत उभा राहिलो . काळोखातनं दोन कुन्हाडी दोन बाजूनं आल्या . तिसऱ्यानं माझा तपास घिटला . तंबाखूचा बटवा त्याला घावला . ” बोल ; काय हाय तुझ्याजवळ ? ” ” बाबा हो ! अंगावर नीट कपडाबी न्हाय बघा . मी गरीब रोजगारी हाया ; पोटासाठी पळतोय ‘ बोलत हुतो ; तवर येकानं कानफाडात तडाखा हाणला . गप बसलो . तवर दुसरा पुढं झाला – “ या त्याला सोडून . ” ” लई बोलू नगस .पाचपुत्याची तंबाखूचा बटवा त्यांनी ठेवून घिटला . दोन – तीन रोज पुरली आसती एवढी तंबाखू बटव्यात हुती . पुरवून पुरवून खाल्ली आसती तर पाच रोज पुरली आसती . सगळ्यांनी तंबाखू घेतली . बटवा माझ्या हवाली केला . चाचपून बघितलं . चार- पाच विडं हुतेलं एवढीच तंबाखू हुती . हातांत बटवा पडला आन् ज्या पळालो ; थेट पाचपुत्याच्या वस्तीवर दम टाकायला आलो . कुत्री भुकली . कुत्री चावरी हुती म्हणताना वस्तीवर गेलो न्हाय . तसाच सरळ बांध धरून गेलो . ह्या वक्ताला झोपेचा भर आमंल . पाच – पंचीस हाका मारल्या . तवा कुत्री भुकायला लागली . कुत्र्यांची नाव घिटल्यावर मिसाळाचा थोरला कुत्रा झांबऱ्या पळत आला . दोन्ही पाय गळ्यात टाकून भेटला .

उ :, उ : करून काय इचरंत हुता . खात्या घरी दिल्याचं त्यानं इमान राखलं हुतं . माणसानं मुकं घिटल्यागत झांबऱ्या मुका घेत हुता . सोबतीला आसता तर चोरट्याची काय टाप हुती माझ्या कानफडात हाणायची ? एकएकाला उभा फाडला आसता झांबऱ्यानं . कुत्रं पाळायचं दिकून बळ नव्हतं नव्हं ; म्हणताना हा वाघागत कुत्रा मिसाळाला दिला . त्याचं आलेलं रुपयं खाऊन ; हागून गेलं . ह्यानं मातर इमान टाकलं न्हाय . मिसाळाच्या वस्तीवर झांबऱ्याच्या सोबतीनं गेलो . चार – पाच हाका मारल्यावर मिसाळ उघडाच बाहेर आला . उंभऱ्यात उभं राहून त्यानं त्याच्या बायकुला लाईट लावायला सांगितलं . तवा तिनं लाईट लावली . वामन मिसाळानं निरखून बघितलं . ‘ संतू ! ह्या येळला का आला ? आणि हे रं काय ? गालभाडवर वळ कसलं ? ” मिसाळानं विचारलं . त्याच्या गळ्यात पडून मोठ्यानं रडावं वाटलं . ” येताना चोरट्यांनी मारलं मला . ” लई मारलं का ? ” ” दोन तडाखं हाणलं कानफडात . सगळी झडती घेटली . ‘ “ आरं , मंग सकाळी का आला न्हाय ? ही येळ कुणची ? ” “ वामन ! पोटाला येळकाळ कायबी कळत न्हाय . ‘ ” संतू ! हे पोटाचं रडं कुठंवर चालणार रं तुझं ; आणि माझ्याजवळ काय हाय तुला दियाला ? आमीच विकतचं आणून खातोय . ” ” वामन ! मी काय पोटाला धान्य मागायला आलेलो न्हाय . मला काम पायजी . ह्या दोन हाताला काम दया . ‘ ” आरं , मंग नारायण चव्हाणाचा मळा काय पेटला काय ? ” ” …

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading