कळा, उत्तम बंडू तुपे.(भाग १६)..

कळा, उत्तम बंडू तुपे.

‘ त्याचा मळा पेटला तर बरं हुतं बघा . लई वांड माणूस त्यो’ ” का , काय वांडपना केला त्यानं ? आन् वांड आसला तर त्याची त्याला . तुझा मतलब कामासी . ” न्हाय ; त्याचं काम करायचं न्हाय मला . ” संतू ! मंग आता हिथं तुला काय काम देता येणार न्हाय . तिकडं उसाच्या तोडी सुरू झाल्यात ; येत आसला तर नेतू . ” कुठं जायाचं ? ” क – हाडला . ” लांब हाय नव्हं क – हाड . ‘ कुठलं आलंय लांब ! वीस रुपयं खर्ची पडती हिथनं . तिकडं ऊस तोडायला रोजगारबी चांगला हाय …

https://bit.ly/bspmycityshrigonda

” मी एकटाऽच येतो ; पर मागं तारांबळी हुणारऽवं . ‘ “ आरं , घर घे की ; त्यासनीबी कामं हायती . बायकाबी ऊस तोडत्यात ; वहातुकीला बायकाबी बऱ्या पडत्यात . ” व्हय ; पर दुर्व्याची शाळा ? ” ” आता दुर्व्या शाळा शिकून बालीष्टर हुणार काय ? ” “ शिकतंय तर शिकू दया . त्याच्या तरी जलमाचं धड भलं हुंदया . ‘ ” संतू ! इतकं हाय तर धोंडी कारभाऱ्याच्यात का जात न्हाय ? का तोबी वांड हाया ? ” “ धोंडी कारभारी फुकाट राबवून घिया बघतो . ” “ मी समजलो न्हाय . ” जत्रंच्या वक्ताला त्यानं मुंधळं घातलं हुतं . त्याच्या बदल्यात उसाची खांदणी करायचं ठरलं ; धा रुपयं रोजानं काम कराय तयार झालो . शंभर रुपयांत धा रोज काम करतो म्हणलो ; पर त्याचं म्हणनं – पंधरा दिवस काम कर . हे कसं जमायचं ? ” “ संतू ! तुझा सभाव दिवसाच्या मानानं आडका झालाय . आरं , धोंडी कारभारी गावाचा कारभार करतोय ;

तो तुला आसा पेचात कसा टाकंल ? हा , दुसरं कुणाबद्दल हे बोलला आसता , तर मला पटलं आसतं . ‘ ” न्हाय पटायचं कुणाला ” संतू ! धोंडी कारभाऱ्याचं काय देणं हाय का ? ” ‘ हाय वाईच बाकी . ‘ ” उदया त्यो आडवा पडल्यावर ? ” ” ” त्याला काय कळू दियाचं न्हाय . आता गेलो की माणसं घेवून गोदावल्यात येतो . इस्टानावर तुमची वाट बघत बसतो की . ” व्हय ; पर खर्चीचं कसं केलईस ? ” ” तुमी भरा की खर्ची . लोकाची कसी भरता ? ” ” संतू ! आसलं येड मातर करू नगंस . आपलं गाव धरून रहा ; पोरगं शिकतंय तर शिकू दे . तिकडं जावून माणसं काय सोनं हागत्यात ? आरं , हाय हे बेस हाय . गावात उदयाला उसाचा तोडा सुरू हुतोय . तुला कुठंबी काम लागंल . ” “ वामन ! ह्या सगळ्या मळंकऱ्यांनी ऊस साखर कारखान्याला घाटलाय ; कारखान्याची लोकं ऊस तोडायला येणार हायती . ” ” संतू ! आमी काय कारखान्यांची लोकं हाय ? आरं , माझ्या फैलातली माणसं आपल्याच गावाला उसाचा तोडा करायला येणार हायती … “ वामन ! हे कसं केलंसा ? ” “ पोटासाठणं हाजार उलंडाभालंडी कराव्या लागत्यात तवा हे पोट भरतंय . संतू ! मंगलच्या लग्नाचं कुठं जमतंय का न्हाय ? ” “ न्हाय ; ह्या दुबळवाडीत काय मंगलचं लगीन व्हईल म्हण सांगता येत न्हाय . पोरीचं चलिंतरबी काय बराबर दिसत न्हाय . हिकडं आलुय ; पर सगळा जीव घराकडं लागलाय . बोलता बोलता वर बघिटलं . ठळक चांदण्या दिसत हुत्या . अभाळात मधभागी आलेलं चांदण्यांचं बाजलं मावळून गेलं हुतं . उगवतीकडणं ग्यासबत्ती वर आल्यागत शुक्राची चांदणी वर येत हुती . येणाऱ्या दिवसांचं आगत – स्वागत करायला ही गगण स्त्री नटल्यागत दिसत हुती . देवाच्या देवंगणांनी सगळी फुलं वेचून नेली . त्यातलंच फूल चुकून राहिल्यागत शुक्राची चांदणी दिसत हुती . सगळं आकाश त्या एकटीनंच शोभिवंत केलं हुतं . ढळढळीत उजेड पडलेला . “ वामन ! पड ; आत्ता उजडलं बघ . चांदणी उगवली . ‘ गार वारं सुटलं हुतं . गारठ्यांचं दिवस ; थंड वाजत हुती .

तरी घराच्या ओढीनं चालत हुतो . डोळं आपसुक झाकत हुतं . आता घरी जावून घटकाभर पडायचं मनात धरून तावानं निघालो . लवनातनं जायाला भ्या वाटाय लागलं ; तवा नेपतीच्या कुरणाकडंची वाट धरून माळामाळानं निघालो हुतो . वान्याच्या अंबराईत आल्यावर कुणाचा तरी कोंबडा बांगला . करळाच्या माळात शिरलो ; तर घरातला दिवा दिसला . ह्या थंडीत लोचीनं दारं झाकून आत बसाचं ; ते दार उघडं ? अंगातली थंडी कुठल्या कुठं पळाली . घरात घरात एक पाय ; दारात एक पाय . तवर लोचीनं मोठ्यानं हंबरडा फोडला . दुर्व्या एकटाच बसला हुता . मंगल नव्हती . ” लोचे , ये लोचे , रडतीस का ? पोरगी कुठाय ? ” “ पोरीनं दगा दिला . ” मजी ? ” ” मजी काय ? मंगली गेली वं ; माझी पोर पळवली . आता मी काय करू ? कुठं बघू माझ्या हारणीला ? लोची हामसून रडत हुती . डोळं नसल्यागत नुसता बघत उभा राहिलो हुतो .

अंगावरचं कातडं कुणी तरी सोलतयंस वाटायला लागलं. डोळ्यापुढं धा वाटा उभ्या ; कोण्या वाटनं गेली आसंल ? कुठं गेली आसंल ? कुणी नेली असल पोरीला ? काय झालं आसंल तिचं ? काळीज आगीवर धरल्यागत झालेलं . गरीब डोळ्यांची मंगल पुढ्यात दिसत हुती . तिचं फाटकं झंपर तेवढं आडदणावर लोंबत हुतं . खालच्या दिव्यानं धुरकटत चाललेलं . घराला कोळसा घासल्यागत घर काळमिठ दिसत हुतं . उसासा टाकून खाली बसलो . दुर्व्याबी पोटासंग पाय बांधून बसला हुता. कुणाला आपलं तोंड दिकून दाखवू न्हाय ; कुणाला काय बोलायचं ? मंगलचं लगीन माघंच करून टाकलं आसतं तर हे घडलं नसतं . उजाडलं तरी घरात काळोख दिसत हुता . घरातनं बाहेर पडलो . गाव मैती करून आल्यागत दिसत हुता . पायाखालची वाटबी मरून पडलेली . गावाला हे कळायच्या आत मंगलला हुडकून आणाय पायजी म्हणताना निघालो हुतो. धा वाटा . त्याला फुटलेल्या आणखी पाऊल वाटा पुढ्यात उभ्या हुत्या . पाण्यानं भरलेल्या हिरी डोळ्यांपुढं येत हुत्या . हिरीचं खोल खोल पाणी मनात उठलं की जीव गुदमरल्यागत हुतेल्या . वाटच्या कडंच्या हिरीत डोळं घालून पुढं जात हुतो . पाय गुंत्यात गुतल्यागत झालेलं . लांब वसाडीच्या माळाला आलो . तवा आतनं उमाळा उसळला . “ मंऽ … गऽ … ल ” मोठ्यानं हंबरडा पोडला . “ लेके कुठं गेली तू . का कष्टी मन केलं ह्या दुबळ्या बापावर ? ” एकटाच माळावर उभा हुतो . पुढ्यात माळ पेटल्यागत भगभगत हुता .

माळाखाली लांब पसरलेला नारायण चव्हाणाचा मळा . मळ्यात नारायणाचा खोंडबी दिसत नव्हता . दिसत माळ माघ टाकून खोमण्याच्या वस्तीवरनं पुढं निघालो . वस्तीवर कोंबड्या हुत्या . नव्या खोपातल्या अंड्यावर आलेल्या दोन तलंगा ‘ काडर कार ‘ करून अंड्याला जागा हेरत हुत्या . डोळ्यांत मंगलची नाजूक भावली उभी हुती . त्या तलंगाच धरून उरासंग कवटाळून धराव्या वाटल्या . हुर्द पिळल्यागत झालं .” पापण्या ओलावल्या . मोठ्यानं हंबरावं वाटलं ; पर घशात तोबरा बसवल्यागत आवाज आतलं आत कोंदला . चार दिवस गेलं तरी मंगल हाताला लागत नव्हती . गावात ही बोंब उठली . कुणी काय , कुणी काय बोलत हुतं . भेलसे म्हातारा सकाळचा घरी आला हुता . “ संतू ! आसा झुरत बसू नगस . उपजाली कन्या कुळाभाईर . चांगल्या चांगल्यांच्या आस्या जात्यात . भेलसे बोलत हुता खरं ; पायताणं तोंडावर पडल्यागत वाटत हुतं . लोचीनं अन्नपाणी वरजलेलं . नारायण चव्हाणबी मलाच बोलत हुता . एकदा तर सरळ बोलला- “ संतू ! माझ्या भावाला मंगलीनं पितवून नेलंय . आरं , माजावर आली हुती तर तिच्या मायअंगात तापवून पार घालायची नव्हती व्हय . मस राग येत हुता . पर आपलंच नाणं खोटं ; काय करायचं ? इक घोटल्यागत सगळं घोटत हुतो .

https://bit.ly/bspmycityshrigonda

मीऽच अपराधी आसल्यागत सगळं सोसत हुतो . न्हाय तिकडं जावून बघत हुतो . देवाला नवस केली . रायलं हुतं एक पंचांग बघायचं . तेबी करायचं ठरवलं नि निघालो . “ सुदाम तात्या ! ” दोन हाका मारल्यावर सुदाम तात्या बाहेर आला . त्याला सगळं बैजवार सांगितलं . त्यानंबी बोटं बोजली ; कागदावर आडव्या तिडव्या रेघा मारल्या . ” संतू ! पोर लांब गेलीय बघ . माघारी येईल आसं सांगता येत न्हाय . पर एक दिवस येईल . ” सगळीच मला फसवत हुती . माझं दुबळं मनबी फसत हुतं …

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading