कळा, उत्तम बंडू तुपे(भाग २५).

कळा, उत्तम बंडू तुपे..

एकच आवय उठलेली ” त्यातला मी नव्हं ; मी चोर न्हाय . मला सोडा ; कुरपा करा माझ्यावर . मी गरीब हाय . म्हणत हुतो . ” गरीब का गणिम हाया ; हे काय आमाला वळखाना व्हय ? ” ‘ धरला , चोर धरला ‘ म्हणत माणसं धावून आलेली . माणसांची नुसती झिंबड पडली हुती .

https://bit.ly/bspmycityshrigonda

केरात पडलेली वस्तू न्याहळून बघिटल्यागत माणसं न्याहळून बघत हुती . ज्यांचं चोरानं सगळं लुटलं हुतं ; ते भडा – डा शिव्या देत हुती . बायकांबी येत हुत्या . खुदला की … किरड्याला ! त्याची गरिबी काढा xxx तनं ; सावध राव्हा ; त्याचं साथीदार हिथं कुठं असतेलं . उसांत दडून , दबून बसलं आसतेलं . “ आणा रं दावी ; बांधा खज्याळीच्याला . ” कुणीतरी बोललं नि सगळी देहीच जीव नसल्यागत झाली.

मटकरनं खाली बसलो ; तसं मागनं पेकटात लाथ बसली . एकानं सुरवात केली तसं धा जणाचं धा हात पडलं . करडीचा पेठा बडवल्यागत बडवून काढलं . आदूगरच अंगावरच्या पांघुरणांची वाघर झाली हुती . ती पांघरुणं आणखी फाटली . खाली पडल्यापडल्याच हात जोडलं आन् म्हटलं , “ पाया पडतो . पायजी तर तुमच्या पावार लोटांगण घालतो . पर मला मारू नका ; मी चोर न्हाय . गरीब हाय मी . ‘ “ गरीब का गणिम रं ? तुमी चोरलोकं कसलाबी भेस घेता . कशाच्याबी निमतानं येता . आता उदया तुला पोलिसाच्या ताब्यात दिल्यावर तिथं आय घालून कबली देचिला . ” “ तसं काय करू नगसा . तुमच्या हातानं माझा जीव घ्या पायजी तर . दिसंल त्याच्या पायावर टक्कूर ठेवत हुतो .

इत्या करत हुतो . पर त्या वस्तीवरची माणसं ऐकून घेत नव्हती. ‘ झवला दाडीवाला ; धावला मिशावाला ‘ , त्यातली गत झाली हुती . जो येत हुता , तो वादाड देत हुता . तावदारून बोलत हुता . हात उगरून दापत हुता . वस्तीवर नुसता कालवा झाला हुता . एक कुत्रं भुकलं की बाकीची कुत्री भुकावी ; तसं झालं हुतं . कुणी कासरा तर कुणी दोऱ्या घेऊन आलं हुतं . कुणाच्या कुणाच्या हातांत काठ्या – कु – हाडी दिसत हुत्या . यानी माझं हे हाल करण्यापेक्षा माझा जीव घिटला तर बरं हुईल ; वाटत हुतं . एकएक जण पुढं येत हुता . तर एक दांडगा इसम ‘ आत्ता कुणाची रं वाट बघता ? कुणी मानकरी येणार हाय व्हय ? पुढं आला बांधा की हातपाय . ” नका – नका ; मला बांधू नका . मी पळून जात न्हाय .

एका इसमाला माझी कीव आली . त्यानंबी माझी बाजू धरली . “ आर : त्याचं ” ? ” हया ऐकून घ्या . उग साप म्हणून भुई धोपटू नगसा . त्याचं बोलणं हुतंय – न्हाय हुतय तवर दुसरा पुढं आला – “ मोठा शेणा आलाय सांगायला ; हू माघ . “ आरं ; त्योबी माणूस हाय . गुरू न्हाय . पयला बोलला . “ आण रं कासरं – दोऱ्या . ” दुसरा तावदारून बोलला . तवर धा याच्या बाजूला तर धा त्याच्या बाजूला झाली . ज्यानं माझी बाजू धरली हुती ; त्याच्या पायाला मिठी मारून पडलो – “ दादा ! अन्ना ! बापू ! वाचवा मला ; ह्या परसंगातानं सोडवा ; खरंच मी चोर न्हाय . पायजी तर उदयाला माझ्या गावी चला . माझा संशव धरू नगसा ; लेकराबाळाचा धनी हाय मी . परिस्थितीनं लाचारी हाय ; दुबळा हाय . माझ्या दुबळपणाचा सगळ्यानी फायदा घिटलाय जी . दुबळपणामुळं एकुलत्या एका पोरीचं लगीनबी करायला आलं न्हाय मला . तरणीताठी पोर परागंधा केली ; बायकूला खूळ लागलंय .

पोरगा मला सोडून गेलाय . दशा झालीय माझ्या जिनगानीची . ” जल्माची ही हाकिगत सांगत हुतो . भवतीनं जमलेली लोक चुकू – चुकू करून वाईट वाटून घेत हुती . माणसाचं काळीज ज्याच्या हुात हुतं ; त्याचं काळीज हालत हुतं . कुणी हाताला धरून उठवत हुतं . काळजाचा दगुड केलेली माणसं मारक्या खोंडागत तंबून बघत हुती . जीव हल्लक झाला हुता . कुणाच्या तरी अधारानं उठत हुतो . तवर काणावर हाक आली – “ बाऽपूऽऽ ” दुर्व्यानं गळ्याला मिठी मारली हुती . दुर्व्याला बघून सुपागत काळीज झालं . भोगलेलं सगळं इसरलो- “ मंडळी ! ह्यो माझा पोरगा हाय ; पायजी तर ह्याला इचरा . ” ‘ त्याला काय इचारता मला इचरा की ! ” मेहुणा तावदारून पुढं आला . “ खज्याळीच्याला बायकापोरं संभळायला जड झालेती ; आल्या वाटनं माघ फिर आता . ” मेहुणा . “ का ? माझी कायबी सत्ता न्हाय का ? पोरगा माझा हाय . “ त्यानं तुला बाप म्हणाय नग का ? ” मेव्हणा . “ का म्हणायचा न्हाय ? ” म्हेवणा आणखी पुढं झाला . त्यानं दुर्व्याच्या दंडाला धरून हरबाऱ्याचा ढाळा हलवल्यागत हलवलं .

“ दुर्व्या ! ह्यो तुझा बाप हाय का वैरी – सांग ह्या लोकासनी . ” दुर्व्या गप उभा हुता . काय बोलत नव्हता . त्याचं डोळं गरीब झालं हुतं . फास लागलेल्या वासरागत दुर्व्या नुसता हंबरत हुता. “ बापू , माझ बा – पू ” म्हणत हुता . मेहुणा त्याला माझ्यापासनं तोडत हुता . दुर्व्यानं माझ्या गळ्याला मिठी मारली हुती .” ” ” ” ” नका ; मेहुण पोराचं हाल करू नगसा .

त्याला आसा वरबडून नेहू नगसा . माझी लोची कुठाय ? ” ‘ हाय मसनात जा बघ ; जा . “ मजी ? काय म्हणताय काय ? ” “ बापू ! आयला मामानं पंढरपुरात नेहून सोडलीया . ” ” का ? का सोडली ? ” “ तर का ? गळ्यात बांधून हिंडू काय त्या खुळीला ? ” मेहुणा . “ मेहुणं ! तिला घेवून का आलासा ? ” ” म्हणलं हुतं ; हिथं वाईच सुधरलं ; पर पार बिघडली हुती पयलीच . तुमी एक आब्रू सोडलीय ; आमी न्हाय . ” मेहुणं ! आसं तिड्यानं बोलू नगसा ; काय ते सरळ बोला . ” ” चला घरी . मंग बोलू . मेहुणा पुढं ; मागं दुर्व्या ; त्यांच्या मागनं चालत हुतो . मेहुण्याचं तोंड चालूच हुतं . तोंडावर खापरं फुटल्यागत वाटत हुतं . अंगाला ठणूक लागलेला .

दुर्व्या सारखा मागं फिरून बघत हुता . ” बापू ! लई हाणलं व्हय तुला त्या लोकांनी ? ‘ “ मंग आता जा . त्यांची उपटून भारं बांध . लई बापाचा कैवारी हू नगस . मेहुणा . “ मेहुणं लोचीला पंढरपुरात का सोडली ते सांगा . माझी लोची कुठं कुठं हिंडत आसंल . रातीला कुठं निजत आसंल अवं ती मंगलच्या पायांत खुळी झाली . “ तरी तिची दयामाया आली न्हाय . लई खाज आली हुती तर रुईचा चीक घालून घियाचा हुतासा . न्हायतर एकादी कुत्री ; न्हायतर गाढव धरायची . ” मेहुणा . “ मजी ? ” “ मजी काय ; लोचीला दिवस गेल्यात . आमचं थोबाड काळं करण्यापेक्षा तिकडं मरू दया . मेहुणा बोलला तसा टक्कूऱ्यात जाळ झाला . नारायण चव्हाण डोळ्यापुढं उभा राहिला . खूळ लागल्यापासनं लोचीला हात दिकून लावला न्हाय ; हे सांगायलाबी धीर व्हत नव्हता . उर दाबल्यागत झाला .

तोंडातनं सबुद दिकून निघना झाला . नारायण चव्हाणानं डाव साधला हुता , माझी लोची खुळी झाल्यावर त्यानं तिला फसवलं हुतं . गुपित धन आसलेल्या पिंपळाखाली त्यानं लोचीला चोळली ; घोळली . त्याचं बीज घेवून लोची फिरतीय . मोठ्यानं हंबरडा ? “फोडावं वाटत हुतं . अंगातल्या सगळ्या वेदना मरून गेल्या ; तरी मेहुणा बोलत हुता . काळजात सुया घाटल्यागत वाटत हुतं . दुर्व्या सारखा माघारी फिरून माझ्याकडं बघत हुता . त्याचीबी हाडं उघडी पडली हुती . दुर्व्याची अबळ बघून हुर्द तुटत हुतं . फाटलेल्या मनाच्या फाळी घेऊन मेहुण्यामागनं चालत हुतो . रात वैऱ्यागत वाटायला लागली . जेवण यळ टळल्यावर मेहुण्याचं घर आलं . मेहुण्याची बायको धोंडी सभावानं बरी हुती . गेल्या गेल्या तिनं तांब्या भरून पाणी दिलं . तांब्याभर पाणी घटाघटा ढोसलं . मेहुणा मोडक्या पितळीगत तोंड करून घरात गेला . ‘ बस ‘ दिकून म्हणला न्हाय . तसाच कडगाहून बसलो . धोंडीनं पेटवली ; तसा मेहुणा गुरकला . “ आता आणी कशाला चूल जागवतीस ? ” “ भाकरी अपुऱ्या हायत्या ; दोन भाकरी टाकती . ‘ ” काय नग ; भाकरी थापायची गरज न्हाय ; पाणी पिऊ दिलं तेचं उपकार मान म्हणावं .

https://bit.ly/bspmycityshrigonda

भनीचं वाटुळं केलंय माझ्या . ” ‘ आ – वं ! पावणा हाय . आसं म्हणून कसं चालंल ? कवा टुकडा खाल्ला आसलं ; वक्ताला नसंलबी खाल्ला . ” मरू दी की उपाशी ; दुर्व्या ! चल खा भाकरी . ‘ “ मामा ! माझ्या वाट्याची भाकरी दया ; बापू आनी मी खातू . ” दुर्व्या बोलला . पोटात कालवाकालव झाली . दुर्व्याला कवटाळलं . आसंच त्याला पोटात घालावं वाटायला लागलं . “ लई बापाच्या मायाचा हू नगस ; उदया जा त्याच्याबरं . ‘ ” व्हय ; उदयाला घेवूनच जाणार हाय मी . हिथं ठिवून काय मारू व्हय त्याला ? नकावाणी पोराला कष्टात घातलसा. वादया , तुला काय मायादया हाय का न्हाय ? ” वैऱ्याची रात गेली . सकाळचं निघालो . शिंदवाडीत दिवस उगवला . दुर्व्याला चालवत नव्हतं . पार पेकाळून गेला हुता . उन्हें भगटली हुती. सगळी रानं जळीतहुन गेल्यागत भकास, भयाण दिसत हुती…

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading