कळा, उत्तम बंडू तुपे..
गावाची जत्रा नेहमीसारखीच जवळ आली हुती . एक एक गावकरी कमई करून डामाडोलानं गावाच्या जत्रंला आला हुता . बायकापोरासनी सजवून आपूनबी पांढरी धोट कापडं घालून पुढाऱ्यागत गावात मिरवत फिरणारं गावकरी बघून उराला आग लागत हुती . घराघरांतनं गोडधडाचा , तळण्या – मळण्याचा वास दरवळत हुता . गावात द्वारका उतरल्यागत झालेलं . मी आपला दुर्व्याला घेवून गावाबाहेर लांब तिकडं कवड्याच्या माळाला ; न्हायतर जानाईच्या पठराला जावून बसत हुतो . जोडी फुटलेल्या मोरागत एकटाच लांब लांब आभाळाखाली नजर फिरवत बसत हुतो . लांब लांब गावाच्या बाजूनं धा इस माणसं कोल्ह बिळाकडं चालली हुती . खांद्यावर सस्याच्या वाघरा हुत्या ; कुत्री हुती . जत्रंला आलेली माणसं आसं चैनीनं शिकारीच्या निमतानं रानात फिरायला निघायची .

घावलं एक – दोन ससं तर त्याचं कडान करून रानातच खायाची . लांबनं बघत हुतो . वळखीच्या देही डोळ्यांत उठत हुत्या . तुकाची दुडकी चाल , मव्हन्याची उडती चाल बघून जीव पाघळायला लागला . जीव देहीतनं तुटून राहातू काय ? तसं झालं . उठून उभा राहिलो . तुकानं नेमकं वळिखलं . “ सं – तूऽऽऽ हय , गाय हंबरल्यागत तुका हंबरला . ”” ” तु – का – ऽऽऽ , ” पळत गेलो . तुकाच्या गळ्याला मिठी मारली . “ संत्या ! आमला पार इसरून गेलास व्हय . आरं , आल्यापासनं धा यळा घरी गेलो . घराला हात्या ! ” तुकाचं डोळं पन्हेवलं . ” तुका ! माझं पार वाटुळं झालं .
माणसांतनं उठलो पार . ” तुका जिवाचा मैतर हुता . त्याला सगळी हकीकत सांगितली तवा हुर्द मोकळं झालं . तुकानं पाठणीवरनं हात फिरवला तवा धीर आला . या आभाळाखाली आपलं कुणीतरी जिवाभावाचं हाय आसं वाटलं . मव्हन्याबी जवळ आला . त्यानंबी धीर दिला . तवा तुकानं हाताला धरलं आन् म्हटलं – “ संतू ! चल की गावात . “ नगं ; हे काळं थोबाड कुणाला दावाय नगं , तुका ! ” “ आरं , तुझं तोंड काळ न्हाय ; चल . “ नगं ही झाकली मूठ आसीच आसू दी . ” “ संतू ! आमी मंगलीला घेऊन आलू या . “ हे खरं का तुका ? ” “ संतू ! मी खोटं कशला सांगू ? मंगलीला चव्हाणाच्या पोरग्यानं धोंडवाडीत ठिवल्याती . ‘ ” तुका ! मला तिकडं घेवून चल ; मला मंगलीला भेटवा … ‘ “ ते सगळं हुतय . पर एक कर ; मंगलीला लोचीबद्दल कायबी कळू दियाचं न्हाय . ” “ का ?
तिला सांगायला व्हवं . ” “ ती यळ ही नव्ह . मंगली दिसांत पडलीया . तिला हे कळलं तर न्हाय ती बला हुयाची . ” ” तुका ! लोचीलाबी आणाय पायजी ; | जातो . जत्रंपावतर तिलाबी घेऊन येतो ; तवर दुर्व्याला संभळा . आतापावत आणली आसती पर खर्चीला पैसा ” न्हाय . “ मंग ; आता कसा जाणार ? ” “ जातू चालत . तवाच जाणार हुतो . पर दुर्व्याला चालणं हुईत न्हाय . म्हणताना हिकडं आलो ; तर नारायण मागं लागलाय . त्यालाबी इंगा दावतू . “ संतू ! चालताना ठेचकाळलो म्हणून पायांत पडलेल्या दगडाला लाथ मारतं का कुणी ? आरं , आपलीच बोटं फुटतेली . त्याला काय हुयाचं न्हाय , ” त्यानं माझं घर मोडलं ते . ‘ ‘ व्हय ; पर त्याच्या भावानं एक बाजू उलचून धरलीय . ” ” ” तुका ! या दुर्व्यासाठी जीव गुतलाय ; न्हायतर नाऱ्या चव्हाणाचा मुडदा पाडून बसलो असतो तुरंगात जावून .
“आसलं टक्कूऱ्यात आणू न्हाय ; आज ना उदया त्याची चूक त्याला कळंल . ” बरं ; मी कवा निघू पंढरपूरला ? लोची पंढरपुरात हाय . ” इतक्या लांब गेली कशी ? ” ” तिच्या भावानं सोडली तिला नेहून . ” ” चल ; घावलं एक – दोन ससं तर बघू ; न्हायतर जावू . ‘ माणसांत मिसळून निघालो हुतो . तवा भातचं माणूस झाल्यागत कोल्हबिळाचा डोंगर दिसत हुता . डोंगराच्या सिगवरचा तुका काळजात उतरत हुता . दिवसभर कोल्हबिळाचं रान उठवून दोन ससं आनी त्याची पिल्लं धरली . ” ” तुका ! ससं लेकुरवाळं हायतं . सोडून देवू या . ” “ संतू ! तूबी खुळाच झाला ; आरं , आपून सोडलं तरी त्याला कुणीतर मारणारच की .
“ मंग आस करा ; ही पिल्लं तरी सोडू या . ” “ ते का ? आईबापाच्या माघं त्यांसनी जगता येणार न्हाय . ‘ तुका बोलला डोळ्यांत डोळं घालून पुढ्यात उभा राहिला . उशिरानं बोलला – ” संतू ! हे ससं हायतं ; वाघ नव्हतं . ” तुकाचं खरं हुतं . ससं , सस्याची पिल्लं माझ्या हातांत हुतं . या गावाच्या शिवारात जलमलेल . ह्याच शिवारात जगलं ; मोठं झालं . आपलं कुटुंब वाढवून कुंटुंबासकट या शिकाऱ्यांच्या हातात घावलं . हातांतलं ससं हातांत धरून सस्याकडं बघत हुतो . आत आतला ससा ; खोपंतल्या सस्यागत भेदरून बसला हुता . लावलेल्या वाघरा डोळ्यांपुढं दिसत हुत्या . सगळ्या वाघरांत पडून मेलेला एक ससा पुन्हींदा जिता झाला हुता .

पुन्हा पुन्हा जलमं घेऊन पुन्हा मरण्यासाठी जलम घेत हुता . तरी त्याला समजत नव्हतं ; शिकारी वाघर लावून बसलाय . मरणाच्या भ्यानं मरणाकडंच पळत हुता . त्याच्या पायांतलं बळ त्याला जगवत हुतं . पळ काढण्यापेक्षा दुसरं बळ त्याच्यात नव्हतं . चारी बाजूनं संकट उभी हुती. कुठं पळायचं या अफाट मुलखात ? बेफाटपणानं तरी कुठंवर पळायचं ? हिरमडल्या तोंडानं तुकाकडं नजर टाकली . तुकाबी उदास दिसत हुता . त्याला काय तरी सांगायचं हुतं ; बोलायचं हुतं ; तरी तुकाचं तोंड मट . व्हटाळ्या तेवड्या हळूहळू हालत हुत्या . मिशा ताठ झाल्या हुत्या . ” संतू ! बोलू का एक ? “
क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)
