कळा, उत्तम बंडू तुपे(भाग २८).

कळा, उत्तम बंडू तुपे..

जत्रा उलगली नि पाऊसाळ्यातल्या खडकांगत गाव उघडंपागडं पडलं . गावात करमना झालं . फिरिस्त्या कुत्र्यागत कळा आली . दिसांत पडलेली मंगल घरात हुती . आज – उदया बाळांत झाली तर निवारा पायजी . घराला तर उंदरामांजरांनी भसकं पाडलेलं ; त्यातनं वारं आत शिरलं की घराचा छत गद – गदा हालायचा . एकादी मोठी वावटळ आली तर सगळं घर उडून जायचं भ्या वाटायचं . कुठणं तरी भारा – दोन भारं काड – पळकाट्या आणून घर शेकरायचं मनात हुतं . पर कुणापुढं तोंड पसरायचं ? काड – पळाकाट्या का हुईत न्हाय ; फुकट कोण देणार ? आजचा उन्हाळा उदया सरंल आन् पावसाळा इल .

https://bit.ly/bspmycityshrigonda

वली बाळांतीन पावसात भिजली तर तिचं बाळ ; ती या दोघासनी जपाया पायजी . जाताना सिरपत सांगून गेलाय –मंगलला जपा- म्हणलाय . हुर्द दगडाखाली घालून नारायण चव्हाणाच्या मळ्यात गेलो . गुपित धनावरचा पिंपळ वाऱ्यावर नाचत हुता . पायातल्या पुंगरागत पिंपळाचा कवळा पाला खुळ – खुळत हुता . खिनभर त्या पिंपळाकडं बघत उभा राहिलो . भराभरा एकएक चित्रं डोळ्यापुढनं पळाली . या पिंपळाला आत्ता आग लागावी ; न्हायतर दांडगी वावटळ उठावी ; मुळ्या – ढाळ्यासकट पिंपळ उलथावा . या पिंपळाखाली बसून लोचीसंग म्या पोटभर भाकरी खाल्ल्या . ह्याच्या सावलीत घटका – घटका इसावा घिटला . तो पिंपळ डोळ्यापुढं एकटाच उभा हुता . त्याचा इस्तार वाढला हुता . त्याची सावली बी इस्तारून नारायण चव्हाणाच्या मळ्यावर पडली हुती . न्हाय म्हणायला एक मोठी फांदी मधनंच मोडलेली तेवढी दिसत हुती . कवा मोडली कुणाला दखल ? पर तेवढी जागा सुणी दिसत हुती . खालनं हिरीच्या बाजूनं आवाज आला , “ कोण भडवा हाय रं . त्यो का मरायला तिकडं गेलाय ? ” गुपित धनावरचा साप , फुस्कारा टाकून पुढं उभा राहिल्यागत वाटलं . आपसूक हात उरावर जुळलं . नारायण चव्हाणानंबी मिशा नसलेल्या व्हटावरनं हात फिरवला .

डिवचलेल्या भुजंगागत डोळ्यांच्या गुंजा झळकायला लागतेल्या . ” संत्या ! ह्या बांधाच्या आत पाय का घाटलास ? ” “ धनी ! झालं गेलं इसरू या ; मी नडलोय ; पोटानंबी मरायला लागलो . तवा तुमच्या पायाजवळ आलूया मी . ‘ का मरायला काय झालं रं ? जगायला तेवढा माझं घर दिसतं ; जा तुक्या संगट ममईला जा . मायंदाळी काम हायती म्हण तिकडं . जा तरणी पोर हाय , तिलाबी कामाला लावा . डबली , टिबलीन कमाई हुतीय तिकडं . त्यांचं न्हाय पुरलं तर लोचीलाबी घेऊन जा . “ धनी ! लोची आत्ता कुठं घावायची ? जे गेलं ; ते मेलं . त्याची निदा करून आत्ता काय मिळणार ? ” ” आत्ता आसं म्हणतूस पर तिला खूळ लागलं तवा लांब नेहून सोडली . ‘ ‘ न्हाय धनी ! म्या सोडली न्हाय .

शेणी , खुळी आसली तरी ती माझी बायकू ” ” हाय . ” आरं ; मंग तिला बघायला गेला न्हाय ? संत्या ! सुखाचं सोबती सगळं हुत्यांत ; पर दु : खात कोण कुणाचं नसतं . ” “ जी धनी ! तेबी जिनं जगलोय मी . माझ्या परसंगाला कुणीबी उभं रायलं नाय ! ” ” “ मंग संत्या ! तुझी बायको लोची आत्ता कुठं हाय ? ” ” म्हणत्यात पंढरपुरात हाय . ” आसं व्हय ? मंग तू आज हिकडं का आला ? ” “ वाईच काडं पायजी हुती . घरावर टाकायला . निवारा पार मोडखळीला आलाय बघा धनी . धनी ! तुमच्याशिवट मला कोणबी गरज करायचं न्हाय . माझं चुकलं – वाकलं माझ्या पदरात घाला .

पायजीतर पायतान गूवात भरवून थोबाड फोडा माझं ; पर मला तुमच्याच पायाजवळ राहू दया .नारायण चव्हाण देवागत उभा हुता . त्याच्या पायावर टक्कूर मांडून पडलो हुतो . खालची ; मळ्यातली माती परक्या माणसागत भाजत हुती . पोटाला चटाटा चटकं बसत हुतं . उंचच्या उंच झालेला गुपित धनावरचा पिंपळ खळखळून हासत हुता . तवा सगळीच बेमान झाल्यागत परकी ; परकी वाटत हुती . नारायण चव्हाणाच्या डोळ्यांतल्या गुंजा आणखी रंगल्या हुत्या . आत्ता पुटून लाल रगत बाहेर पडल वाटत हुतं . “ धनीऽऽ दया करा ; ” म्हणून त्याचंच पाय कवटाळत हुतो . गुपित धनावरचा भुजंग उभा राहिल्यागत नारायण चव्हाण दिसत हुता . त्याच्या पायांतली नवीकोरी नुकतंच नाल मारलेली पायतानं बघून उराला धाप लागल्यागत झालं हुतं . या वक्ताला मळ्यात कुणीच न्हाय ; काय घ्या काय कमी सरस झालं तर ; भ्या वाटत हुतं . लांडग्यानं बकरं धरल्यागत नारायण चव्हाणानं माझं गचूरं धरलं .

वाऱ्यानं हालवल्यागत हालत हुतो. नारायण चव्हाणाच्या मागनं मेलं मढं हून फरफटत चाललो हुतो . माझंच मरण मला भ्या दावत हुतं . मरून – मरून जगलो तरी मरणालाच मिठी मारून बसत हुतो . आपून आता जगायच्या लायकीचं न्हाय राहयलो ; वाटत हुतं. ज्यांच्या बळावर जगलो त्याच्या मळानं मरणं. मांजराच्या तोंडातल्या उंदरागत धडपडत हुतो . माझंच मरण मला घेऊन कुठं चाललंय ; काय कळत नव्हतं . “ यो तिकडं घेऊन जाईल ; गळा दाबून हिरीत टाकील . न्हायतर तालीआड घालून वरनं ताल ढासळून आपलं मढं गप करल . ” हातानं मरण मागून घिटल्यागत वाटायला लागलं . आंब्याखाली आणल्यावर नारायण चव्हाणानं गचूरं सोडलं. कडाल ! कानसुला – खाली आवाज झाला. त्याच्या हातातल्या पायतानाला रगत लागलं. काळं ; गुटळ्या झालेलं रगत ; जळकट झालेलं रगत ; दिवसा अंधार पडल्यागत नजर अंधूक झाली . चाकावर बसवून फिरवल्यागत वाटायला लागलं. ‘ पडलो ; पडलो ‘ म्हणूसतवर भुईवर पडलो का उभा हुतो ; काय कळत नव्हतं . डोळ्यावरची झाक गेली तवा स्वप्नात आसल्यागत पुढ्यात लोची बसली हुती . तिच्या मांडीवर लाल रक्ताचा गोळा जिता हून हात – पाय हालवत हुता . लोचीचं भूत ; का लोची ही ? धडपडून उठलो .

https://bit.ly/bspmycityshrigonda

डोळं चोळून – चोळून न्याहळून बघिटलं . डोळ्यांवर इश्वास बसना . “ संत्या ! बघ , नीट बघ ; कोण हाय ते ? ” “ धनी ! मला काय बी कळंना झालंय. ‘ ” संत्या ! ही खुळी झाली ; याड लागलं म्हणताना हिला बेवारशी पंढरपुरात टाकली . त्याच दिवस मी घेऊन आलो. रातोरात साताऱ्याच्या दवाखान्यात हिला…

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading