कळा, उत्तम बंडू तुपे..
दीवसाबर नारायण चव्हाण घरी आला . त्याला बघून धडकी भरली . डोळ्यांत गुंजा पेरल्यागत डोळं झालेलं . वाटलं त्यानं डोळं झाकून घ्यावतं . नारायण डोळं वासून बघत हुता . आजून उन्हें कवळी हुती तरी देहीला भाजत हुतं . उन्हांतनं फिरून आल्यागत तोंड झालं हुतं . रडकुडीला आलो हुतो . पर मनाच्या वरनं हासलो .

अडदणावरचं फाळी गेलेलं कांबळं काढून टाकलं . “ लोचे ! मालक आल्यात वाईच चा ठेव ग . म्या बायकुला सांगितलं नि नारायण चव्हाण गुरकला ” तुझ्या घरचा चा नगं मला . “ का , जी ? ” ” मला इचारतो संतू ? आजपसनं तू दुसरीकडं रोजगारात जाणार म्हणत्यात . ” “ जी . “ का ? वामन्यानं रोजगार वाढाव दिला ; अंगावर शंभर रुपय दिलं ; म्हणतात नव्ह ? ” “ जी ! आता मला रुपय कमवाय पायJजीत ; मंगलचं लगीन कराय पायजी . “ संतू ! हे मला कवा बोलला ; वामन्याच्या शंभर रुपायांत तुझ्या पोरीचं लगीन हुणार हाय काय ? लग्न ठरव मंगलच . लग्नाला मी रुपयं देतो . पर तुमी दोघा दे त्या नवरा – बायकोनं माझ्या मळ्यातनं बाहेर जायाचं न्हाय ; हे शंभर रुपयं घे ; वामन्याचं माघारी . ‘ मालक बोलत हुता . हातांत मारक्या बैलाची यसण घावल्यागत वाटलं . नि धडा करून बोललो “ मालक ! तुमी देताय त्या रोजगारात ; तुमचं रुपयं कसं फिटतेलं . मी तरी कसा फेडू ; पोटाचं बघू का तुमचं रुपयं फेडू काम करून ? ‘ ” रुपयं धा देतां रोजगार ; एका टाकीचं काम . कवा खाडा ; तोडा न्हाय . काय न्हाय ; संतू आसं यड मत करू नगस . चल उठ बर ; भोकरीच्या वावरात पलान घालून तिकडं पाणी न्हियाचंय . ” बार उडवल्यागत धडाधडा मालक बोलून गेला .
जाताना शंभराची नोट अंगावर माती टाकल्यागत टाकली हुती . तरी फुलं पडल्यागत वाटत हुतं . शंभराची नोट डोळ्यांत सुया घातल्यागत खुपत हुती . तरी खिशात घातली . लोचीकडं नजर टाकली ; तर खुशीत दिसली . कुणाला दिलेला शब्द कवा माघारी घितला नव्हता . आता वामनला कुठल्या तोंडानं सांगायचं ? त्याला शंभर रुपयं कुणाच्या हातानं फिरवायचं ? माणसाचा आदी शब्द जातू ; मंग जीव . शब्दावर माणसं जगत्यात . आन् मरत्यातबी . आपण कशासाठी जगायचं ? दारात पाण्याचा झरा आसलं त्यानं फुलाची झाडं लावावीत . हातांत बळ आसंल त्यानं वावरं घ्यावीती . आपल्याजवळ काय हाय ? आतापावतर शब्दावर जगलो . आता तेबी पाळाचं अंगात बळ न्हाय . तुझ्या कामावर येत न्हाय म्हणल्यावर वामन काय म्हणल ? नारायण चव्हाण तिड्यात टाकून गेला ; नि मी मलाच पोखरत बसलो . काय सुचेना झालं . टकुरं धरून बसलो हुतो . तवर लोचीनं चा आणून पुढ्यात मांडला .
“ घ्या चा . इचार करून काय हुतंय ? वामन महिना – दोन महिनं काम पुरवंल . मालकांचं काम जलमभर सरणार न्हाय . त्याच्याइतकी जमीन कुणाला हाय ? चार मळं बागायती हायतं . उठा . लोची बोलत हुती . कान नसल्यागत काय ऐकू येत नव्हतं . चा कसातरी नरड्यात घालून उठलो . तडक मळ्यात गेलो . नारायण चव्हाण वाट बघत बसला हुता . तरातरा जावून त्याच्यापुढे उभा राहिलो . “ मालक , हे शंभर रुपयं घ्या . वामनचं देवून टाका नि त्याला काय सांगायचं ते सांगा ; तुमच्याबी कामाची खुटी नगं . ” “ आरं , तूं जा की ; त्याला इतकं भियाला का तो वाघ हाय तवा लगी तुला खाणार हाय . “” तसं न्हाय ; पर वामनला न्हाय येत तुझ्या कामावर ‘ म्हणायचं माझ्या जिवावर आलंय . रोजगाऱ्याला सगळ्यांची मनं धरून राह्याचं आसतं . मालक , त्याला मी कसं सांगू ? ” मालकानं रुपयं उचललं नि रानमळ्यात निघून गेला . आता काय हुणार नि काय न्हाय ; तिकडं ध्यान लागलेलं . तवर लोची आन् मंगल आल्या . त्यांच्या मागनं आणखी चार रोजगारणी आल्या हुत्या . सारणीच्या कामाला जुपन घिटलं हुतं . सारण वर चढत हुती . आतनं कुठनं खचत चाललो हुतो . मातीची बुटी घेवून मंगल जात – येत होती . तिची नजर सारखी बांधावरच्या हिरवटांवर बांधलेल्या तुपान कालवडीवर नि खोंडावर जात होती .
कालवड खोंडाकडं बघून आरडत हुती ; नि मंगल उगच कावरीबावरी होत हुती . का तिलाबी कळलं हुतं – कालवड वाफवर आलीय ! मालक रानमळ्यातनं तसाच दहीवडीला गेला नि धाकटा मालक दहीवडीसनं आला . घटकाभर सारणीचं चाललेलं काम बघून अंब्याखाली जावून बसला . त्याच्याकडं मंगल बघत हुती . तिची नजर सारखी भिरीभिरी फिरत हुती . आत जाळ लावल्यागत हुर्द जळत हुतं दुपार झाली . सगळीच अंब्याबुडी भाकरी खायाला गेलो . मंगल सरळ धाकट्या मालकांच्या पुढ्यात जावून बसली . “ सिरपत ! बोटात काय हाय बघ तरी ; लई सलतंय बघ . सिरपतनंबी तिचा हात हातांत घितला . बोट धरून डोळ्यापुढं धरून फिरवलं . “ मंगल काय तरी हाय बोटात ; लिवंगुडाच्या काट्यागत दिसतंय . लिवंगुडाची बोंड खायाला गेली होती काय ? ” सिरपत ! आसं बोलला तवा मंगल खळखळून हासली . “ सिरपत , तुला आजून ध्यान हाय ? ” ” मंगल ! तू इसरलीस ; मी न्हाय . आजून आठवण झाली की उरात काट सलत्यांत . ” वाटलं मंगलच्या बोटात खरंच काटा हाय ; का नुसतं निमित्त ? “ मंगले ! बघू कुठं का हाय ते . मी काढतू : मालकासनी कामं सांगू न्हायती . ‘ ” त्यासनी काय वझं उचलाय सांगत न्हाय . मंगलनं कवा आसा उलटा जबाब केला नव्हता.


माझ्यापुढं उभं राह्याला ती भेत हुती . माझ्या धाकात आसल्यागत वागत हुती . आज मातर माझ्या डोळ्यांदेखत सिरपतच्या हातात हात देवून खुशाल बसली हुती . काय झालं काय ” कळलंबी न्हाय . मंगलचं कानसुल कडाडलं . कानसील धरून मंगल तकाट लोचीकडं पळाली . ‘ आयला तुझ्या ; कुणाला काय कामं सांगावीती काय कळतंय का न्हाय ? का शुद्ध गेली पार ? ” रागाच्या भरात भाकरी खायाला बसलो . भाकरी खात हुतो ; का आपलं आपल्यालाच खात हुतो ; काय कळत नव्हतं . भाकरीचं घास चावता चावता आधनंमधनं मंगलाकडं बघत हुतो . तिचंबी डोळं रगत उतरल्यासारखं झालं हुतं . दाभाडं जोरजोरानं हालत हुती . डिवचलेल्या नागिनीसारखी फणफणून मंगल फुस्कारं टाकत हुती . ” काटा काढून घियाला गेली ; तर इतकं झालं . आणखी काय केलं तर ह्यो जीव घिल काय माझा ? ” घास चावता चावता मंगल बोलली . घटा घटा पाणी पिवून तांब्या खाली आपटला . “ मंगले ! हे आसलं मला संत्याला खपायचं न्हाय . जिती पुरीन . ” रागाच्या भरात बोललं . इकडंतिकडं नजर टाकली ; तर धाकटा मालक दिसला न्हाय . दिवसभर रागाच्या भरानं माती उचलली हुती . तोंड शिवून घिटल्यागत कुणीच एका शब्दानं बोलत नव्हतं . मंगल मातीच्या बुट्या सारणीवर टाकत हुती . सारणीची सिग सावकाश वर चढत हुती . सांजची सुटी झाल्यावर बाकीच्या रोजगारणी निघून गेल्या . मंगल , मी , लोची तिघंच घराच्या वाटनं चालत हुतो . बोलावं का नको ? मनाला उभारी येत नव्हती .
तरी मंगलला बोललो . “ मंगल ! म्या दुपारा तुला मारायला नको हुतं . पर बापाचं काळीज तुला कळायचं न्हाय . मंगल म्या तुला मारलं ; माझं चुकलं आसलं . पर तू त्या पोराच्या हातात हात देनं मला खपलं न्हाय . मंगल ! ह्या रोजगारणी काय म्हणतेल्या ? माणूस बरबाद झाला तरी त्याचं दुखं होतं न्हाय ; पर बरबादीची चर्चा झाल्यावर खरं दुख हुतं बघ . बोलत हुतो . मंगल रडत हुती . तिचं डोळं गायच्या डोळ्यांगत दिसत हुते . तिला काय म्हणता येतय – ह्यापेक्षा माझं लगीन का करंत न्हाय ? दिवस मावळून गेला हुता . भुई गार पडली हुती . तरी देहीला झळा लागत हुत्या . जाळात उभं राहिल्यागत झालं हुतं. गुराढोरागत राबत हुतो . इक खाल्ल्यागत अन्न खात हुतो . जिवाला बरं नसल्यागत घर दिसत हुतं . कष्टाला कसलं ते यश नसल्यागत दिवा ढणाढणा जळत हुता. तरी घरात काळोख पसरल्यागत दिसत हुतं. कुठणं आलेल्या पाली सादरीत कुचकुचत आसल्यासारखं वाटत हुतं. लोची गपगप हुन भाकरी थापत हुती. दुर्व्याची परीक्षा जवळ आलेली . दिवा पुढ्यात घेऊन दुर्व्या अभ्यास करत…
क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)
