कळा, उत्तम बंडू तुपे.
टक्कुरीवर ट्रंका आन् हातांत पिशव्या घेवून गावची माणसं निघाली हुती . त्यासनी घालवावं म्हणून डांबरी सडक पावंतर त्यांच्यात मिसळून चालत आलो हुतो . त्यांच्यांत हुतो तवर काय वाटलं न्हाय . डांबरीला आल्यावर तुका पुढ्यात उभा राहिला . वाघाचं मांजर झाल्यागत तुका ; तुटकं दोन शब्द बोलला- ” संतू ! आता आमी जातो . आलो तर दिवाळसणाला चार राती येऊ ; का येतो तू आमच्या संगट ? लवतू तुलाबी कुठं तरी . आत्ता ह्या गावात काय हाय ? माती खायाचं म्हणलं तरी कुणी फुकट खाऊ देणार न्हाय , चल . ‘ मनात आलं आसंच ह्या घोळक्यात मिसळून जावं . कमाई करून रुपयं आणावंत .

निदान माघ राहिलेली तरी सुखानं खातेली . दुर्व्याची शाळा पुरी करावी ; मंगलच्या लग्नापुरतं रुपयं आणावंत . ” तुका ! तुमच्या संग यावं वाटतंय . पर लोचीला इचारलं न्हाय ; काय सांगितलं न्हाय का हातरा – पांघरायला ; काय घिटलं न्हाय . ” ” त्याला काय व्हतंय . चल , धा माणसांत एकादं खपून जातंय . ” “ नगं , हाय हे बेस हाय . ” संतू ! तुला गाव सुटना म्हण की ; गाव सोडल्या बगार माणूस सुधरत न्हाय .
” तुका ! तू दिवाळीला येणार हाय नव्हं . तवा मी तुझ्याबरं येईल . ‘ घोळक्यानं माणसं चालली हुती . जिवांत जीव गुतवून चालल्यागत चाललेली माणसं . “ संतू ! ध्यान आसुदे घरांकडं ; म्हातारा आजारी हाय . सकाळ – संध्याकाळचं घराकडं एकादी फेरी टाकत जा . कमीजास्ती झालं तर टपाल टाक . ” भेलसेचा यशवंता बजवून सांगत हुता . मीबी व्हयापा देत हुतो . जिवाचं दोन भाग झाल्यागत वाटत हुतं . एक भाग निघून चालेला ; एक भाग गुतलेला.जिकडं बघावं तिकडं साई पसरल्यागत हिरवीगार रानं दिसत हुती . पावसानंबी उघडीप दिली हुती . पेरी धरलेल्या उसाच्या खांदण्या कुठं कुठं चाललेल्या . हिरव्या धरतीकडं बघून डोळं निवंत हुतं . ह्या वर्षी पावसाळा चांगला हुणारं वाटत हुतं .

धरतीच्या हुदाँतलं धन कवळ्या रूपानं धरतीवर आलं हुतं . नि पावसासंग जल्माला आलेलं जीव ओल्या , हिरव्या रसातनं काढल्यागत हिरवं दिसत हुतं . ह्या नव्या दुनयेकडं नुसतं बघत बसावं वाटत हुतं . भुईतनं उठल्यागत गार वारं अंगाला झोंबत हुतं . फुलावर आलेल्या पळाटीचा सुवास रानारानांतनं दरवळत हुता . हिरव्या वासानं मन धुंद झालं हुतं . खांदणीची कुदळ आठ दिवसाआधीच शेवटून आणली हुती . उसाच्या खांदणीला सुरवात झाली हुती . मऊ पोळीगत झालेल्या रानातनं पाभरी , औत फिरत हुती . झोकात पेरणी चालली हुती . कुठं कुठं भुईवर अंकुरं आली हुती . मूग , बाजरीच्या पेरण्या करून मोकळं झालेलं शेतकरी मळ्यांत उतरून बागायताकडं डोळं भरून बघत हुतं . चा पिऊन बसलो हुतो .
धोंडी कारभाऱ्यानं हाक मारली . अंगात वारं भरल्यागत उठलो . धोंडी कारभाऱ्याचा चार एकर ऊस खणून ; सऱ्या उजरायच्या हुत्या . धोंडी कारभाऱ्यानं चार दिवसापूर्वीच सांगितलं हुतं .” ” ” संतू ! आजपासनं खांदणीला सुरवात कर . खांदणी मनापासनं करायची . सरी खोल गेली पायजी . ” त्याची काळजी नगं . ” घरातली कुदळ घेतली ; तकाट सुटलो . धोंडी कारभाऱ्याचा मळा गावापासनं मैलभर हुता . चालायचा झपाटा लावला तर घटकंत मळ्यात पोचणार हुतो . दारातनंच तोंड करून लोचीला सांगितलं , ” लोचे ! उंबर मळ्यात भाकरी घेवून ये . ‘ “ मलाबी भांगलाय जायचंय . जाधवाच्यात भाकरी घेऊन यणं हुणार न्हाय . भाकरी घेऊन जावा . ” संतू ! आता आणखी काय राहिलं रं ; उगा खोळंबून बसू नगस . “ न्हाय ; भाकरी घेतू नव्हं . “ का लोचना आन् मंगल येत न्हाय काय ? ‘ ” न्हाय ; त्या दुसरीकडं जाणार हायत्या . ” ते का ? या म्हणून सांग . माझीबी पळाटी भांगलायची हाय . जत्रेच्या दिवसी धोंडी कारभाऱ्यानं धा पायल्या जुंधळ घालून बांधून घिटल्यागत झालं हुतं . उसाची खांदणी मजी नवा जलम हुतो . माणसांचा कमाई करून घियाचं दिवस . रोजगारानं ऊस खांदायचं परवडत न्हाय रोजगायला .
ही आसली कामं अंगावर घेवून करायची आसत्यांती . “ धोंडी ! ऊस उकता अंगावर क्या खांदायला . ” ” संतू ! अंगावर ऊस दिला आसता ; पर उकती घिटलेली कामं नीट हुत्यांत काय ? उसाच्या सऱ्या खोल जात न्हायत्या . कुठं तोंडाला घुडघाभर खोल तर मधी वितभरबी सरी खोल जात न्हाय . तवा आपलं रोजगारानं ऊस खांद ; रुपयं धा रोजगार देतो . ” “ तसं कसं ? जगात काय धारा चाललाय ? ” “ संतू ! जगाचं मला सांगू नगस ; उदया जग उघडं नाचल . मी नाचणारा न्हाय . ” धोंडी ! धा रुपयं रोजगारानं मी ऊस खांदणार न्हाय . ” ‘ न्हाय तर नको खांदू ; पर माझं तेवढं दाण्यांचं रुपयं दे ; चार महिनं झालं का न्हाय ह्या यवाराला ? ” ” व्हय ; झालं की . ” धोंडी बोलला , यसण धरलेल्या बैलागत आकाळलो , सगळी देही एका जागी गोळा करून गाठोड बांधल्यागत झालं . वक्ताला त्यानं जुंधळ घालून ” उपकार केलेलं .
त्याचा ऊस खांदून देणं भाग हुतं . त्याला न्हाय कसं म्हणायचं ? धोंडीच्यात धा दिवस रोजगारानं जायाचं ; त्याचं रुपयं हायतं तर धा रोजाच्या रोजगारात वळती करून देता येत्यालं ; इचार केला . पुन्हींदा घरात गेलो . लोचीला दुसरीकडं कामाला जाया सांगितलं नि म्या धोंडीच्या उंबर मळ्याची वाट धरली . मनाजोगं ऊन भगभगत हुतं . नजर फिरल तिकडं हिरवी रानं . मधनंच एकादी पावसाची झड झडून जात हती नि भराऽरा , हिरव्या रानांतनं सुवास उठत हुता . मन भरून नुसता वास हुंगत राहावंसं वाटत हुतं . हिरव्या रानांत मोकळं वार ; वाऱ्यावर रानं उसळी मारल्यागत दिसत हुती . मोराचा कळप उडत चालल्यागत रानं दिसत हुती . हिरवा दर्या उसळल्यागत पिकं वाऱ्यानं उसळत हुती . खांदयावर कुदळ टाकून उंबर मळ्याची वाट चालत हुतो . तिट्यावर आलो . तरस आडवा गेल्यागत नारायण चव्हाण आडवा आला . आता माणूस तोंडापुढं आल्यावर गप कसं जायाचं ?
“ रामराम मालक ! ” ” रामराम ; संतू ! कुणाचा ऊस खांदाय घिटलाऽरं ? ” ” धोंडी कारभाऱ्याच्यात जातो . धा – पंधरा रोजाचं काम हाय . ‘ त्याचा ऊस झाला की ये ; तुला कुणी आडवं येणार न्हाय ; काय ? ” “ येईन की . ” ” न्हायतर मनात काय तेड आसली तर सांग . ‘ “ तेड धरून भागणार काय मालक ? ” ऊनं चटकत हुती . कंबरला पोत्याचं भोत . हातांत जुन्या कोटाचं हातपं घातलं . कुदळ घेवून उसात शिरलो . खोडव्या उसाची खांदणी . ऊस दाट फुटला हुता . डुकरागत मुसंडी देवून सरी सरी खांदत हुतो . उसाची पानं उघड्या अंगावरनं फिरून चराचरा आंग चिरंत हुतं . दाट उसांत गदमरून आंग नुसतं पाझरत हुतं . तरी खांदायचं बंद हुतय काय ? का ते आपल्या घरचं काम हाय म्हणून काम टाकून पळायला येतंय ? चार – पाच सऱ्या खांदूस्तवर कसातरी दम काढला . घटकाभर येवून बांधाला बसलो . तंबाखू खावून उठलो . पुन्हींदा कुदळ उचलली . खरं ऊस खांदायच्या आदी उसांच्या बंडातला पाला साळून काढायचा हुता . उसाची दोन चार पेरी उघडी करून ठिवावी लागत्यांत .
धोंडीनं ऊस साळला नव्हता . ऊसाच्या पाल्यानं सऱ्या दंड पार झाकून गेलेलं . एकाद वक्ती कुदळ सरीतल्या पाल्यावरनं निसटून पायावर येत हुती . तरी मनातनं खांदायचं चाललेलं . दुपार पावार चार गुढं रात खांदून टाकलं ; नि भाकरीला सुटी केली . एकटाच खांदणीचं काम करत हुतो . “.
क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतून)
