दिनांक २७ जुन २०२४, श्रीगोंदा:
तालुक्यातील ७९ गावांसाठी केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ अंतर्गत जल जीवन मिशन पाणी योजना मंजूर आहे. यापैकी फक्त १३ गावांची पाणी योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु इतर गावांची योजना रखडली असल्याने सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी जगताप व श्रीरंग साळवे यांनी पंचायत समिती श्रीगोंदा येथे कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते.
अधिकारी व ठेकेदारांनी मनमानी करत दिलेल्या वेळेत पाणी योजना पूर्ण न केल्याच्या विरोधात हे उपोषण करण्यात आले होते. पाणी योजनेचा कार्यारंभ आदेशातील अटी-शर्तीनुसार विहीत वेळेत योजना पूर्ण करणे बंधनकारक असताना संबंधीत अधिका-यांनी ठेकेदारांना पाठीशी घालत गावातील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले होते. त्यामुळे या अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि विलंब करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करत त्यांचा ठेका रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली होती.
गट विकास अधिकारी राणी फराटे यांनी मध्यस्थी करत संपुर्ण पाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले. चांभुर्डी गावातील पाणी योजना ४५ दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात आले. तसेच कामे पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या गाव पातळीवरील अडचणी लेखी स्वरूपात देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. गट विकास अधिकारी राणी फराटे यांनी वरील आशयाचे पत्र देऊन व पाणी देऊन आज उपोषण मागे घेण्यात आले.
शेवटी, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले, आणि गावकऱ्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)



