दिनांक २९ जून,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या लिंबाला बाजारभाव मिळत नसलेबाबतचे निवेदन संभाजी ब्रिग्रेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी (तहसिलदार) महेंद्र माळी, (पोलिस निरीक्षक) दौलतराव जाधव, (कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती), (उपसभापती) तसेच सचिवांना निवेदन दिले होते. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाचे गांभीर्याने दखल घेत (तहसिलदार) महेंद्र माळी यांनी समितीचे सचिव, लिंबू व्यापारी, शेतकरी यांची तहसील कार्यालयात मिटिंग बोलाविण्यात आली होती. या बैठकीत लिंबू व्यापारी बाजार समितीमध्ये लिलाव घेऊन दर निशित करून प्रसारित करण्यात येतील असा तोडगा निघाल्याने संभाजी ब्रिगेडच्या पत्रव्यवहाराला यश आले आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी सांगितले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये लिंबाचे दररोज लिलाव होणे अपेक्षित असताना शेतकऱ्यांकडून ठोक किमतीत व्यापारी लिलाव न करता लिंबू दररोज खरेदी करत असून, त्यामुळे तालुक्यातील सर्व लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याला सर्वस्वी व्यापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी पदाधिकारी जबाबदार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील व्यापाऱ्यांचे श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावांमध्ये लिंबाचे काटे असून ते ठरवतील त्याच दराप्रमाणे काट्यांवर ती लिंबू खरेदी केली जाते. यामध्ये कुठेही लिलाव केला जात नाही.त्यामुळे या व्यापाऱ्यांकडून श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सुद्धा लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याने या व्यापाऱ्यांवर कारवाई करून, कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांना बाहेर काटे चालवण्यास मज्जाव करण्यात यावा.लिंबू खरेदी करताना दररोज लिंबाचे लिलाव करण्यात यावेत,अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती.
याबाबत तहसिलदार माळी यांनी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, बाजार समितीचे सचिव, लिंबू व्यापारी, शेतकरी यांची तातडीने बैठक बोलावत बाजार समितीने तात्काळ लिंबाचे लिलाव घेण्यात यावेत.अशी सूचना करून तोडगा काढण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, राजेंद्र राऊत, सतीश बोरुडे, बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे, लिंबू व्यापारी उमेश पोटे, उमेश बोरुडे हे उपस्थित होते.
(स्त्रोत:संभाजी ब्रिगेडची प्रेसनोट)
