दिनांक २९ जून,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव या ठिकाणी मोर या राष्ट्रीय पक्षाची काही नागरिकांनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रयत्न केल्या प्रकरणी वनविभाच्या अधिकाऱ्यांनी काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
मात्र, या पक्षी हत्याकांड प्रकरणी वन विभागाचे वन क्षेत्रपाल यांनी माहिती देण्याचे टाळले असल्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा तालुक्यात जोर धरताना दिसत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव या ठिकाणी मोर या राष्ट्रीय पक्षाची हत्या केल्याची माहिती वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना गुप्त माहितीदारांकडून मिळताच, तालुक्यातील अनेक वनरक्षक, वनक्षेत्रपाल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी पंचनामे केले असता त्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी मोराचा एक पाय पिसे तसेच हरणाची कातडी आणि त्यासाठी लागणारे सर्व साहित्य मिळाल्याची खात्रीलायक माहिती आहे.या प्रकरणी ३ ते ४ जण संशयित ताब्यात घेतले आहेत. वनविभागा मार्फत आज सकाळी हि कारवाई झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.
याविषयी माहिती घेण्यासाठी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी वनक्षेत्रपाल नातू यांना अनेकदा संपर्क केला असता, त्यांनी सायंकाळी ३ वाजे पर्यंत माहिती देतो. कारवाई चालू आहे. अशी उत्तरे दिली.मात्र,त्यानंतर त्यांनी आपला मोबाईल उचलणे बंद केले आहे. याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी, जिल्हा वनरक्षक अरुण रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी माहिती घेऊन सांगतो असे सांगितले आहे. त्यांनाही हिप माहिती दिली नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे वनक्षेत्रपाल नातू यांनी हि माहिती कोणाच्या सांगण्यावरून आणि कश्यासाठी लपवली याची सखोल चौकशी करण्याची खरी गरज निर्मण झाली आहे.
माहिती लपवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार :- वनमंत्री..
श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव या ठिकाणी मोराची हत्या झाल्याची माहिती माध्यम प्रतिनिधी यांच्याकडून मिळाली आहे. परंतु, या प्रकरणात मोराची हत्या करणारे आरोपी आणि माहिती लपवणारे अधिकारी या दोघांवरही कठोरात कठोर कारवाई करणार असल्याची माहिती वनमंत्री (राज्य) दत्तात्रय भरणे यानी मोबाईल वरून दिली आहे.
(स्रोत: पत्रकार दादा सोनवणे, श्रीगोंदा यांच्यामार्फत मिळालेली माहिती)
