बलुतं..दया पवार(भाग १६)..

बलुतं..

होत . बैलांचे मांस घराघरात शिजत असतं . गावकऱ्यांना महारांचा संशय येतो . ते तपास करीत महारवाड्यात येतात . शिजणाऱ्या मांसाचा वास त्यांच्या नाकात शिरतो . आता महारडी सापडणार आणि आपण त्यांना कुत्र्याच्या आईवाणी बदडणार , ह्या खुशीत गावकरी झडती घेण्यास निघतात . त्या वेळी महार मंडळींनी , म्हणतात , भादव्याला साकडं घातलं . “ तुला विसरणार नाही , ” असं वचन दिलं . झालं , प्रत्येक गावकऱ्याला मांसाच्या ठायी तवलीत पिठाचे पांढरेशुभ्र उंडे दिसले . भादव्यानं आपल्याला संकटातून वाचवलं , म्हणून चालत आलेली ही भादव्याची पूजा ! –

समजा , एखाद्या घरात अर्ध्या जनावराचं मांस आलं , तर ते काही एका दिवसांत खाणं शक्य नाही . त्यांच्याकडे फ्रीज कुठला ? मग ते काय करीत एवढ्या मांसाचं ? ते चक्क वाळवीत . अर्थात मांस कसं वाळवीत , याचा प्रश्न तुला पडला असेल . ते बोटाच्या आकाराच्या लांब लांब अशा ‘ चाण्या करीत (चाणी म्हटली म्हणजे कुणाला खार आठवेल . पण खारीचा ह्या चाणीशी काही संबंध नाही .) चुलाणावर वाळत घालत . धुरामुळं त्यांना लालजर्द रंग यायचा . महार मंडळी हे कुठं शिकली , हे मात्र सांगता यायचं नाही . पण डुकराचं मांसही असंच वाळवतात . ही प्रक्रिया परदेशात फारच प्रसिद्ध आहे , म्हणतात . हे जेव्हा मी वाचलं , तेव्हा महार मंडळींचं मला कौतुक वाटलं . ह्या चाण्या वाळल्या , म्हणजे त्यांचे बोट बोट तुकडे करीत . त्याला ते ‘ तोडक्या ‘ म्हणत . आखाड – श्रावणात पोटाची भूक भागविण्याकरिता ह्या रिझर्व कोट्याचा त्यांना उपयोग होई . केव्हा केव्हा ह्यावर छानपैकी पांढरीशुभ्र बुरशी चढे किंवा सफेद किडे वळवळत . अंगणात काठी घेऊन हे वाळवीत बसणं हे आमचं पोरासोरांचं काम . जनावरांचं काहीच फुकट जायचं नाही . घरात दिवाही चरबीचा जळायचा , तर हाडकं विकत घेणारा मुसलमान तालुक्याहून यायचा . आहे की नाही गंमत ? बर्फाळ टंड्रा प्रदेशातील याक ह्या प्राण्याबद्दल तू असंच वाचलं असशील . चाण्या , तोडक्या हे शब्द तुला नवे वाटत असतील . ह्या शब्दांवरून लहानपणी ऐकलेला तमाशातील विनोद आठवतो . कोतूळचा धोंडू – बापूचा तमाशा त्या काळात खूपच प्रसिद्ध . त्यात बापू म्हणजे खूपच आतरंगी माणूस . तव्याच्या पाठीसारखा काळा कुळकुळीत , तोंडावर देवीचे ठोके , डोळे तिरळे . तमाशात सोंगाड्याचं काम करी . राजा जेव्हा त्याला फाशीची शिक्षा देई . तेव्हा तो म्हणे , ” फाशी तर मी लई खाईन ! ” सारे श्रोते हसायचे . अर्थात महार मंडळींनाच हा विनोद कळायचा . ‘ फाशी ‘ हे जनावरांच्या शरीरातील एका भागाचं नाव आहे आणि तो भाग खाण्याला अतिशय रुचकर लागतो , हे काही सवर्णांना कळायचं नाही .

सर्वांना ह्याची नावं माहिती नसली , तरी गावातील काही मंडळींना ह्या मांसाची चटक लागलेली आठवते . आमच्या घरी एक मराठा तरुण यायचा . नाव सांगत नाही , कारण आजही त्याच्यावर बहिष्कार पडायचा . तो चोरून लपून खायचा . गावात आम्ही सांगू नये म्हणून तो हग्या दम द्यायचा .

एकदा मी असाच खिशात खरपूस भाजलेल्या चाण्या घेऊन तालुक्याच्या गावी शाळेत गेलेलो . दुपारच्या सुट्टीत खाऊ , हा माझा बेत . मधल्या सुट्टीत शाळेच्या पाठीमागे जाऊन हे मी चोरून खात होतो . तितक्यात एक ब्राह्मणाचा शाळामित्र जवळ येतो आणि ” चोरून काय खातोस ” म्हणून विचारतो . माझा चेहरा गोरामोरा होतो . काही तरी उत्तर द्यायचं म्हणून मी ” चांदण्या खातो ” असं उत्तर देतो . चांदण्या कशा लागतात , हा ह्या मित्रापुढे प्रश्न . ” एखादी तरी चांदणी दे ” म्हणून तो हट्टाला पेटतो . आपल्या हातून बामणाचं पोरगं हकनाक बाटेल , आणि उद्या कुणाला समजलं तर आपली धडगत नाही , ह्या भीतीनं मी ओढलेला असतो . मित्र विनवण्या करू लागतो . मी त्याला चांदणी देतो . तिच्या खरपूस स्वादानं तो खूश होतो . हळुहळू ही बातमी तो काही मित्रांना सांगतो . हे मित्र सोनार शिंपी असतात .

एक प्रसंग तर चांगलाच स्मरणात आहे . परीक्षा जवळ आली म्हणजे आम्ही सारी मुलं शाळेतच झोपायचो . शिक्षक रात्रीचे वर्ग घ्यायचे . पहाटे उठवायचे . आई मोळी विकायला आली , की सोबत माझं जेवण घेऊन यायची . ती पाट्यावर मटण ठेचत असे आणि त्यांचा खिमा करून भाकरीवर घेऊन येत असे . कसं कुणास ठाऊक , एकदा चोरून दोघा मित्रांनी माझी भाकरी खाल्ली . पुढे पुढे त्यांना चांगलीच चटक लागली . मी उपाशी राहू नये , म्हणून आपल्या घरातील पोळीभाजी आणावयास मात्र ते विसरायचे नाहीत . स्वत : च्या खेड्यातील आणि तालुक्यातील फरक चटकन जाणवायचा . हे सवर्ण मित्र मला बरोबरीच्या नात्यानं वागवीत . त्यांचं स्वयंपाकघर सोडून मी त्यांच्या घरभर फिरत असे . म्हसे आणि शहाणे हे सोनार जातीतले मित्र खूपच घनिष्ट . सवर्ण मित्रांना बाटवावं , म्हणून मांस चारावं , ही वृत्ती मात्र नव्हती . हे सारं नकळत बालिशपणं होत होतं . आणि मित्रांना माहीत असूनही ते खात होते , ही गोष्ट नंतर समजली .

येसकर – पाळी म्हणजे कित्येकदा भीक वाटायची , पण गुलामांना गुलामगिरीची तेव्हा जाणीवच नव्हती . ते हक्काचं समजतं . दर आठवड्याला येसकर – पाळी बदले . गावात मराठा मंडळींच्या दोन जबरदस्त फळ्या . महारवाड्यात अशा दोन कुळ्या , तशा गावातही दोन . एका कुळीचे मराठे पवारांना येसकर – पाळी वाटत , तर दुसरे रूपवत्यांना . शिमग्याच्या वेळेस महारांनी विस्तव प्रथम कुणास द्यावा , ह्यावरूनही गावात पापळ – आवारी ह्यांच्यात धुमाफळी होत असे .

भाकरी मागावयाला जाताना घरातल्या स्त्रियाच बहुधा जात . ज्या घरात बाईमाणूस नसेल , तिथं एखादा म्हाताराही झोळी घेऊन गावात जायचा . जाताना हातात खुळखुळ्याची काठी हमखास असायची .

ह्या काठीचाही महारात परंपरागत इतिहास चालत आलेला . कुणी सांगत , ह्या काठीला पूर्वी ध्वज होता . आपण राज्यकर्ते होतो ; युद्धात हरलो . ” ही माणसं एकत्र राहिली , तर खूपच डोईजड होतील . सरपण फोडतात तशा यांच्या चिरफळ्या करा . गावागावांत वेशीबाहेर वाटून टाका . त्यांचे ध्वज , हत्यारं काढून घ्या आणि गुलामगिरीची खूण म्हणून हाती काठी द्या ! ” तेव्हापासून महारांच्या हाती काठी आली , म्हणतात . पुढं जेव्हा शिकलो – सवरलो आणि बाबा साहेबांचे ” शुद्र मूळचे कोण होते ? ” हा ग्रंथ वाचला , तेव्हा ह्या इतिहासाचे काही दुवे जुळून आलेले असतात .

काठी हातात धरणाऱ्याला हा इतिहास माहीत असेल किंवा नाही , हे सांगता येत नाही ; पण कुत्र्याची हावळ थोपविण्यास ह्या काठीचा चांगला उपयोग व्हायचा . गावात महारीण आली म्हणजे कोणत्याही चिरेबंद वाड्यातून कुत्र्याची हावळ उठायची . आमच्या घरी पाळी आली म्हणजे मीही आईबरोवर जायचो . महारांना ताक देणं ही मराठा मंडळी प्रतिष्ठेची बाब समजत . ‘ ताकाला जाताना मडकं लपविण्यात काय हशील आहे ‘ ही म्हण जरी असली , तरी गाडगं घेऊन जाताना मी खूपच ओशाळायचो . शाळेतल्या आपल्या सवर्ण मित्रांनी पाहू नये म्हणून काळजी घ्यायचो .

गौतम बुद्धाचा मुलगा राहुल ह्याच्या हाती भिक्षापात्र असलेलं चित्र आठवतं . त्याची आई सांगते . “ लेका , तुझा दिगंत कीर्तीचा बाप शहरात आलाय . त्याच्याकडे जाऊन वारसा माग . बाप जिवंत असता , तरी बापानं गाडग्यात काय वर दान टाकलं असतं ? ह्या तुलनेची तुला गंमत वाटेल , नाही ?

टोपल्यात कधीही ताजी भाकरी पडायची नाही . शिळीपाकी भाकरी पडे . केव्हा केव्हा तर बुरा चढलेलीसुद्धा . बहुधा महारणीकरिता कोनाड्यात रात्रीचीच भाकरी जपून ठेवत असावेत . एखादी उदार बाई लोणच्याची फोड टाकायची . तेव्हा नक्कीच जिभेला पाणी सुटायचं . आई लांबूनच दरवाज्यापाशी दीनवाणेपणं म्हणायची , ” भाकर वाढा येसकरणीला … ” सणासुदीला मात्र हमखास पुरणपोळी मिळायची . कुरड्या – पापड्या मिळाल्या तर भलताच आनंद . पाळी असली म्हणजे महारवाड्यात चूल पेटायची नाही . एकदा आठवतं , बाजरीच्या पिठाची खीर मिळालेली , पण नंतर टोपलीभर खडीमुरूम अंगणात पसरावा लागला .

” पाडव्याच्या सणावरून आठवलं . गावात घराघरांवर गुढ्या – तोरणं उभारली जात . संध्याकाळी मराठा मंडळींचे वीर निघायचे . दहा – बारा वर्षांच्या मुलाला नटवून – थटवून खांद्यावर घेतलं जाई . सर्व मारुतीच्या देवळापुढल्या पटांगणात जमत . पुढे महार मंडळींचा वाजंत्र्याचा तापा . हा सण महारांनी फुकट वाजवला पाहिजे , हा रिवाज . ताप्यापुढे लेजमाचं रिंगण . वीर चमत्कारिक आवाजात जोरजोरानं किंचाळत . महारांच्या पोरांना मात्र ह्या खेळात परवानगी नसायची . दूर उभे राहून नुसती गंमत बघायची .

एखाद्या महाराच्या मुलाला लेजीम खेळायची सुरसुरी आली , तरी त्याच्या हाती लेजीम देणं म्हणजे मोठं पाप समजत . महारवाड्यातील आम्ही मुलं हिरमुसली व्हायचो .

गावच्या यात्रेतही कुस्त्यांचा हंगाम असे . मांगांच्या हलग्या – डफड्यांच्या आवाजात कुस्त्या होत . गावोगावची कुस्तीगीर मंडळी जमत . लहान मुलांच्या कुस्त्या रेवड्या शेंगोळ्यावर लावल्या जात . पाठीमागून पैसे , नोटा , जरीचा पटका , चांदीचं कडं- अशा चढ्या भावानं कुस्त्या होत . महार कुस्तीगीर कितीही बलाढ्य असला तरी त्याला सवर्णांच्या कुस्तीगीराबरोबर परवानगी नसे . एखादा चुकून खेळला आणि प्रमुखांना समजलंच , तर त्याला बेदम मारलं जायचं . त्यामुळे कुणीही महार या फंदात पडत नसे . महाराची कुस्ती व्हायची , ती त्याच्यात जातीतल्या माणसांबरोबर .

हे सारं पाहून , लहान वयातच खेळण्याच्या आपल्या साऱ्या ऊर्मो कासवाच्या अवयवासारख्या आकुंचन पावत . एखादं मातीचं भांडं झिरपत जावं , तसं आपलं व्यक्तिमत्व झिरपू लागे . महारांच्या पोरांबरोबर खेळण्यात मन रमायचं नाही . पुस्तकी किडा होऊ लागलो . तमाशा बघताना मात्र हरखून जायचो . सकाळी पाटलापुढं तमासगिरांची बारी असायची . तमाशाही महारांचा किंवा ठाकरांचा . थोड्या वेळात जो तमाशा आपली चुणूक दाखवील , त्याला जादा विदागी .

गावची एक जत्रा आठवते . तिथं महारा – पोरांनाही जेवण्याचं आवताण . दोन मैलांवर पिराचा उरूस असायचा . तोही गावाच्या शिवेपाशी . बरबाट मिळेल ह्या आशेनं महारवाड्यातलं सारं लेंढार तिथं जायचं . महारांना मातीच्या परळात जेवायला . भाकरी ऐवजी बाजरीच्या घुगऱ्या . सवर्णाची पंगत उठल्याशिवाय महारांना कुणी हाळी द्यावयाचे नाहीत . झणझणीत बरबाट . नाकातोंडातून पाणी गळतं आहे . सू सू करीत आम्ही बाजरीच्या घुगऱ्याबरोबर बरबाट ओरपायचो . एखादी बोटी मिळालीच तर ब्रह्मांडाएवढा आनंद . सकाळी उरलं – सुरलेल घरी आणावयास मंडळी विसरायची नाहीत . गावाची मरीआई , तर म्हसोबाची पूजा करायचा मान महारांचा . म्हसोबा मात्र महारासारखा बाहेर . उन्हा – पावसात तळपत असलेला . हा म्हसोबा कोण , हे कोडं उकलायचं नाही .

गावच्या मंडळींना विषाद वाटावा असा एक खेळ महारवाड्यात रंगायचा , तो म्हणजे रायरंदाचा . हे रायरंद वर्षातून एकदा उंटावरून येत . यांचं वैशिष्ट्य असं , की हे गावात उतरत नसत किंवा गावकऱ्यांचे मनोरंजन करीत नसत . हे केवळ महाराचंच मनोरंजन करीत . मला आजही ह्याची मोठी गंमत वाटतेय . जे महार गावाच्या तालेवारांचं मनोरंजन करीत , त्यांचंही मनोरंजन करणारे कुणी असावे ना ? भारतीय समाजव्यवस्थेतील

क्रमशः

(स्त्रोत:दया पवार यांच्या बलुतं या कादंबरीतून)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading