मधुकर म्हस्के
प्राण तळहातावर घेऊनच हे जवान सीमेवर तैनात असतात . अतिरेकी कोणत्या पद्धतीने हल्ला करतील , याचा काही नेम नसतो . अतिरेक्यांचा हल्ला बंदुका , बाँम्ब वर्षाव या पद्धतीनेच होईल , असा कयास साफ चुकीचा ठरतो . अतिरेकींचा पाठलाग करीत असताना बर्फाच्छादित रस्त्यावरून सैनीकांची गाडी दरीत कोसळली यामध्ये दोन जवानांचे प्राण गेले .यात चांडगावचा भुमीपुत्र मधुकर म्हस्के हा देशासाठी कामी आला .
चांडगाव, तालुका श्रीगोंदा येथील शेतकरी सखाराम व मालनबाई म्हस्के यांच्या पोटी ६ एप्रिल १९८१ रोजी मधुकरचा जन्म झाला . त्या अगोदरची कन्या छाया आणि दिलीप ही मुले . सखाराम व मालनबाई यांनी पोटाला चिमटा घेत तिघांना शाळेत घातले . मधुकरची उंची सहा फूट आणि अंगात चित्त्याची चपळता होती . कबड्डीची मैदाने गाजविण्यासाठी एक आज्ञाधारक खिलाडू वृत्तीचा मुलगा म्हणून मधुकर सर्वांना परिचित . दहावी पास झाला आणि श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात प्रवेश घेतला . एकच ड्रेस अंगावर . बसचा पास काढण्याची परिस्थिती नव्हती . अशा परिस्थितीत जुन्या सायकलची दुरुस्ती करुन मधुकरने कॉलेजसाठी खडतर प्रवास सुरू केला. तो अकरावी पास झाला . बारावीत असताना कोपरगावला ११० इंजिनिअर रेजिमेंटची सैन्यभरती निघाली. मधुकर रेल्वेने कोपरगावला गेला. १७ जानेवारी २००१ रोजी तो सैन्यात भरती झाला. पुणे येथील अभियांत्रिकी विभागात चालक म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले. मधुकरचा रणभूमिवरील लढा सुरू झाला . लान्सनायक म्हणून बढ़ती मिळाली . मधुकर म्हस्के हा पहाडी भागात सैनिक वाहन चालविण्यासाठी एक्सपर्ट होता .
म्हस्के परिवाराची परिस्थिती बदलली . आई – वडिलांनी मधुकरचे लग्न करण्याचा निर्णय घेतला . जिजाराम म्हस्के व घारगावचे हरिभाऊ थिटे यांनी मध्यस्थी केली . घारगाव येथील भिमाजी व संजना थिटे यांची मुलगी मोहिनी हिच्याबरोबर ११ मे २००६ रोजी विवाह झाला . वैवाहिक जीवनाचा प्रवास सुरू झाला . आई – वडिलांना शेतीत काम करण्यासाठी मदत व्हावी, या भावनेतून मोहिनीला चांडगावला ठेवले. पण मोहिनीशी दररोज मोबाईल संपर्क होता .
जवानाच्या घरात अंकिताच्या रुपाने कन्या पुष्प उमलले . मधुकरला खूप आनंद झाला . त्यानंतर मधुकर यांनी कुटुंबाला पश्चिम बंगालला नेले . नेपाळची त्यांनी सफर केली . मात्र दररोज धावपळ पाहून मोहिनीने चांडगावला येणे पसंत केले . त्यानंतर पुन्हा मधुकरबरोबर जाण्याचा योग आला नाही . आदित्य हा मुलगा झाला . पाच महिन्यानंतर आदित्यला भेटण्यासाठी मधुकर घरी आले . त्यावेळी बाप – लेकांची भेट झाली . पण ही भेट शेवटची ठरली . काश्मीरमधील सियाचीनमध्ये अतिरेकी घुसले होते . त्यांना शोधण्याची मोहीम झाली . परिसरात बर्फ असल्याने रस्ते शोधणे अवघड होते . हवामानात धुके आणि बर्फाळ परिस्थितीमुळे रस्ताच दिसत नव्हता . अशा परिस्थितीत मधुकर सैनिकी गाडी घेऊन निघाले . गाडीत सात जणांची टीम होती . बर्फाळ रस्त्यावरून जात असताना दरीत गाडी गेली . २८ जानेवारी २०१० रोजी मधुकर म्हस्के व सुभेदार मेवासिंग हे जवान शहीद झाले .
चांडगावचा भूमिपुत्र शहीद झाला, यावर गावकऱ्यांचा विश्वास बसत नव्हता . टीव्हीवर बातमी आली . चांडगाव परिसरात दुःखाची सुनामी पसरली . लष्करी इतमामात मधुकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .
चटणी,भाकरी आणि शाळा
चटणी , भाकरी घेऊन माझं लेकरू शाळा शिकलं. अंगात घालायला एकच सदरा होता . पायात चप्पल नव्हती . सायकलवर शाळा केली . गावात साऱ्याचा लाडका होता . गावी आला की शेजाऱ्या पाजायांना भेटत असे . माझी कधीच मर्जी मोडली नाही . पण लेकरू गेलं , दहा वर्षे झाली . त्याला पोळ्या फार आवडायच्या . सणसूद आला की लेकराची आठवण येते, अशी आठवण सांगताना वीरमाता मालनबाईचा ऊर भरुन आला .
(शब्दांकन : गणेश जेवरे, लोकसत्ता)
स्रोत:(अग्निपंख फौंडेशन)
