दिनांक १२ ,एप्रिल(कोळगाव,श्रीगोंदा):
कोरोना संकटात दुर्बल घटकांपर्यंत मदत जाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समाजातील सक्षम लोकांनी पुढे येण्याचे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. डॉ . विखेपाटील यांनी आज कोळगाव, भानगाव, मांडवगण येथे जात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
त्यावेळी ते म्हणाले, कोरोना साथीने हाहाकार माजला आहे.या साथीला रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन,लॉक डाऊन मध्ये सर्व भारतीयांनी सहभाग घेतला आहे.
त्यामुळे या रोगा वरती आपण सगळेजण मिळून मात करू. परंतु,दरम्यानच्या काळामध्ये अनेक लोकांपुढे अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपण सगळ्यांनी मिळून मदत केली पाहिजे व त्यासाठी समाजातील सक्षम लोकांनी पुढे यावे.असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. खासदार डॉ. विखे पाटील यांनी नायब तहसीलदार योगिता ढोले यांच्याकडून सद्यस्थितीचा आढावा सुद्धा घेतला. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, सिद्धेश्वर देशमुख, पुरुषोत्तम लगड, मधुकर लगड, नितीन नलगे याठिकाणी उपस्थितीत होते.
