श्रीगोंदा दिनांक २४ ऑक्टोबर : – पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मृद व जलसंधारण,राजशिष्टा्चार,विमुक्तजाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी बुधवारी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन तेथील पीकपरिस्थितीची पाहणी केली. या तालुक्यात टंचाईसदृश परिस्थिती राज्य शासनाने जाहीर केल्याने विविध सवलती या भागासाठी लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी या दौ-यात पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील टंचाईसदृश परिस्थितीची पाहणी केली. पारनेर येथील दौऱ्यावेळी आमदार विजयराव औटी,जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जि.प.चे मुखय कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने आदींसह पदाधिकारी, विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी त्यांच्या समवेत होते. तर श्रीगोंदा तालुुक्यातील बैठकीवेळी आमदार राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे यांच्यासह विविध पदाधिकाऱी उपस्थित होते.
पालकमंत्री प्रा.शिंदे यांनी, राज्य शासनाने टंचाईसदृश तालुक्यात जाहीर केलेल्या उपाययोजना आणि सवलतींच्या अंमलबजावणी संदर्भात संबंधितांना यावेळी सूचना केल्या. सकाळी त्यांनी पारनेर तालुक्यातील काळकुप, जामगाव या गावांना भेटी दिल्या. तेथील कोरड्या पडलेल्या विहिरी, तसेच पिकांची पाहणी यावेळी त्यांनी केली. त्यानंतर पंचायत समिती कार्यालय, पारनेर येथे टंचाई आढावा बैठक घेतली.
ज्या गावांची टैंकरची मागणी असेल, त्या गावांचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करा, आगामी काळात पाणी आणि चारा यांचे नियोजन करुन त्याची उपलब्धता कशी होईल हे पाहा. मागेल त्याला काम याप्रमाणे रोहयोच्या कामांचे शेल्फ तयार करा, असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
सध्याच्या परिस्थितीत एकत्रित आणि समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे सांगून राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी नमूद केले.
पाझर तलावातील गाळ काढण्याची मोहिम हाती घ्या,वनतळी, सीसीटी, रोपवाटिका निर्मिती, चारा नियोजन, पशुधनाची काळजी आदी बाबींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे यांऩी सांगितले.
पारनेर तालुक्यातील पाहणी आटोपून पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी, घुटेवाडी गावांना भेटी देऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
सारोळा सोमवंशी येथील दत्तात्रय आढाव यांच्या शेतातील तूर पिकाची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना दिलासा दिला. शासन आणि प्रशासन तुमच्या पाठिशी असल्याचा दिलासा त्यांनी यावेळी दिला.त्यानंतर घुटेवाडी येथील जयसिंग घुटे यांच्या शेतातील कांदा पिकाची त्यांऩी पाहणी केली.
या गावांतील पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री प्रा.शिंदे यांनी दुपारी पंचायत समिती कार्यालय,श्रीगोंदा येथे टंचाई आढावा बैठक घेतली. टंचाई आराखडा लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन बनवावा. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन टंचाई उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.
पाणी जपून वापरा, नावीन्यपूर्ण योजनांमधून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, टैंकर मागणीसंदर्भातील प्रस्ताव तपासून तात्काळ मंजूर केला जाईल. बोंडअळीचे 2 कोटी 76लाख अनुदान वाटप करण्यात आले आहे. हुमणी अळीच्या प्रादुर्भावासंदर्भात लवकरच राज्य शासन कार्यवाही करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टंचाईसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या सवलती आणि उपाययोजनांचा लाभ या भागातील नागरिकांना मिळेल. थकबाकीमुळे शेतकऱ्यांची वीज तोडण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
