बलुत…

हे दया पवार यांचे आत्मचरित्र जे जगातील अनेक भाषांत भाषांतर झाले आहे.ते बहुजन समता पत्र च्या वाचकांसाठी सादर करीत आहोत.

आई , तुझ्यामुळंच दलितांच्या विराट दुःखाच दर्शन झालं.

तो एकटा असला , म्हणजे त्याची आणि माझी हमखास भेट होते . भला कळू लागल्यापासून तसा मी त्याला ओळखतो . स्वत : ची सावली माणसाला जेवढी परिचित असते , तेवढा ओळखीचा , पण कधी अंधारून आलं किंवा वातावरण ढगाळ झालं म्हणजे स्वत : ची सावली जशी दिसेनाशी होते, तसा तोही माझ्यापासून दिसेनासा होतो. गेल्या काही वर्षांपासून तर गर्दीची त्याला विशेष आवड. सारखा कुणाबरोबर तरी किंवा सभा – संमेलनात. आजही असंच झालं. एका सभागृहात सामाजिक प्रश्नावर परिसंवाद आयोजित केलेला. स्टेजवर मान्यवर मंडळी. त्या घोळक्यात तो अंग चोरून बसलेला. त्याची पाळी येते. तो आपला विषय बेंबीच्या देठापासून मांडतो आहे. अनेकांना त्याची मांडणी आवडलेली दिसते आहे . काही टाळ्याही वाजतात. सभा संपते. त्याच्याभोवती असलेले चेहरे दिसेनासे होतात. माझ्याजवळ तो येऊन बोलतो : ” माझं भाषण कसं झालं ? ” ” छान बोललास. पण एक सांग. तू केव्हाच प्रसन्न दिसत नाहीस. नेहमीच वैतागलेला. तुझा चेहरा गलोलीसारखा ताणलेला … ” ” फार दिवसांनंतर तू आज मला पकडलेलं दिसतंय. अरे, तुझ्यापासून आजवर काय लपवून ठेवलंय ? ” ” तुझा एक प्राध्यापक मित्र तुला दलित ब्राह्मण ‘ अशी शिवी हासडत असतो ! ” ” त्याच्या म्हणण्यात तथ्यांश आहे. लौकिक दृष्टीनं पाहिलंस, तर मी सुखी माणसाचा सदरा घातला, असंच कुणालाही वाटेल. महिना सातशे – आठशे रुपये पदरात पडतील अशी सरकारी खात्यात नोकरी आहे. तीही ऑडिटरची. मायबाप सरकारनं भाड्याचं का होईना, सबर्बमध्ये घर दिलंय. सुशिक्षित बायको आहे. दोन मुली शिकताहेत. आपलं नाव पुढे चालवावं, म्हणून अंगाखांद्यावर पाच – सहा वर्षांचा मुलगा खेळतोय. मोठ्या मुलीचं लग्न झालंय. मागल्याच वर्षी तिला मुलगा झाला. म्हणजे चाळिशीत मी आजोबा झालोय. माझ्याकडे पाहून खरं वाटत नाही. एकंदरीत वेल मांडवाला चाललीय.

“तरी पण तू उदास ? तुझं असं काय हरवलंय ? ” ” टोपी हरवलेल्या गुराख्याच्या पोराची गोष्ट तुला माहीत आहे काय । ‘ मी नकारार्थी मान डोलावतो. तो बोलू लागतो : ” एका गुराख्याच्या पोराची हरवली असते टोपी. पोराला सतत टोपीची आठवण यायची. खाताना – पिताना टोपी डोळ्यांपुढं दिसायची . त्यामुळे तो सतत वेचैन. एक दिवशी तो नेहमीसारखाच रानात गुरं चारायला जातो. तिथं शहरातून प्रेम करायला आलेलं असतं एक जोडपं. त्या दोघांचा प्रेमातला संवाद गुराखी चोरून ऐकत असतो. प्रियकर आपल्या प्रेयसीच्या डोळ्यांत डोकावून पाहत म्हणत असतो, ‘ हे प्रिये, मला तुझ्या डोळ्यांत चंद्र, सूर्य, फुलं, समुद्र, कातरवेळ – सारं नंदनवन दिसतंय बघ ! ‘ चोरून संवाद ऐकणारा गुराखी पुढं येऊन म्हणतो, ‘ अहो, बघा हो ! माझी हरवलेली टोपी दिसते काय ? ‘ ” तत्त्वज्ञानी माणसासारखा असा मुखवटा घालून बोलू नकोस. नेमकं काय झालं, ते सारं सरळ का सांगत नाहीस ? ” ” कसं सारं सरळ सांगता येणार ? ते का एका दिवसाचं आहे ? तब्बल चाळीस वर्षांच्या आयुष्याचा इतिहास. रात्री कोणती भाजी खाल्ली, हे आज आठवत नाही. तसा मी खूपच विसराळू. विसरण्याची सवय असल्यामुळे आज मी जिवंत आहे. नाही तर डोकं फुटून मरायची पाळी. एकाही मुलाची जन्मतारीख मला आठवत नाही. बायकोच त्यांच्या वाढदिवसांची आठवण करून देत असते. ” पण तू कसा घडत गेलास, कोणत्या मुशीत वाढलास, हे सांगायला काय हरकत आहे ? ” ‘ जसं आठवेल तसं सांगतो .. ‘ ‘ कोंडवाड्यात माझी आवडती कविता आहे.

सागरात हिमखंड पुरून उरावा ;

” तसे हे दुःख ।

सुळक्या – सुळक्याने चालून येतात

आठवणींच दाहक थेंब … थेंब अंगावर तेजाब

शिडकावा जाळ जाळ थरकाप करून जातात

खांद्यावर आयुष्याचा हा असा क्रूस कपाळी ‘

प्रारब्ध पाटी ठोकून तुम्ही शहाजोग हात झटकले

आता भूतकाळाची त्वचा सोलून नितळ चेहऱ्याने कसे मिरवावे ?

क्रमशः

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading