दिनांक १३ फेब्रुवारी २०२६, श्रीगोंदा:
तालुक्यातील काष्टी येथे मागील अनेक दिवसांपासून छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अश्लील व्यवसायावर अखेर आज स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) हातोडा टाकला आहे. एका नामांकित स्वयंसेवी संस्थेच्या (NGO) मदतीने करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली असून, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता गंभीर सवाल उपस्थित केले जात आहेत.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, आज १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काष्टी येथील एका हॉटेलवर अचानक छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी काही तरुणी आणि महिलांना ताब्यात घेतले आहे. संबंधित हॉटेल मालकावर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, काष्टी हे गाव आमदार विक्रम पाचपुते आणि माजी आमदार बबनराव पाचपुते यांचे होमग्राउंड मानले जाते. अशा वजनदार राजकीय नेतृत्वाच्या गावातच सर्रासपणे अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
काष्टीमधील अनेक हॉटेल्समध्ये असे अश्लील उद्योग चालत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आधीपासूनच होती, मात्र आजच्या कारवाईने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या कारवाईमुळे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
स्थानिक पोलिसांना जे दिसले नाही, ते जिल्ह्याच्या गुन्हे शाखेला कसे समजले..?, स्थानिक गुन्हे शाखेने येऊन कारवाई करेपर्यंत श्रीगोंदा पोलीस प्रशासन गप्प का बसले होते?
“जिल्हा पोलीस प्रमुखांनी या प्रकरणात लक्ष घालून स्थानिक पोलिसांची या अवैध धंद्यांना मूकसंमती होती का, याची चौकशी करावी,” अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरत आहे.
उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सदरील कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा AHTU पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर यांनी केली असल्याचे समजले आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
