दिनांक २८ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:
संपूर्ण महाराष्ट्रात “महाराष्ट्र बारव मोहीम” अंतर्गत महाशिवरात्रीनिमित्त ऐतिहासिक बारवांवर दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून श्रीगोंदा तालुक्यातील तीन प्रमुख बारवांवर—खंडोबा मंदिर श्रीगोंदा, देऊळगाव गलांडे आणि बेलवंडी कोठार येथे दीपोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचा महत्त्वपूर्ण उपक्रम
श्रीगोंदा तालुक्यात बारव संवर्धन चळवळ गतवर्षांपासून शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे. यंदाच्या महाशिवरात्रीला या चळवळीअंतर्गत तीन ठिकाणी दीपोत्सवाने बारवा उजळून निघाल्या. श्रीगोंदा येथील खंडोबा मंदिर बारव येथे शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी जय मल्हार देवस्थान यात्रा कमिटीचे सहकार्य लाभले.

- देऊळगाव गलांडे: येथे शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंब युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला.
- बेलवंडी कोठार: येथे छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने दीपोत्सव पार पडला.

ही महाराष्ट्र बारव मोहीम अंतर्गत महाशिवरात्री दीपोत्सवाची सलग चौथी वर्ष होते. आपल्या पूर्वजांनी मोठ्या मेहनतीने बांधलेल्या या बारवा दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाल्या. एकेकाळी जल संधारणाचा महत्त्वाचा घटक असलेल्या या बारवा आज विस्मृतीत जात आहेत. मात्र, या दीपोत्सवाच्या निमित्ताने या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व पुन्हा लोकांसमोर येत आहे.
“आपल्या नजरेसमोर असूनही नजरेआड गेलेला हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा म्हणजे बारव. महाराष्ट्राला दुष्काळात साथ देणाऱ्या या बारवा जतन करण्याचा आमचा संकल्प आहे,” असे भावना सहभागी नागरिकांनी व्यक्त केल्या.

या दीपोत्सव सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन भोसले, दिगंबर भुजबळ, संगीता इंगळे, मारुती वागसकर, अक्षय ओहळ, ॲड. गोरख कडूस, त्रिवेणी कडूस, नितिन शेळके, जालिंदर पाडळे, संजय वेठेकर, अमोल हिंगणे, बाळू बाजीराव खेतमाळीस, भाऊसाहेब खेतमाळीस, ईश्वर कोठारे, किरण नवले, राहुल नवले, वैभव दांगडे, शंकर दांगडे, भरत सुंबे, महेश डोंगरे यांसह अनेकांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्रातील ऐतिहासिक बारवांवर अशा प्रकारचे दीपोत्सव आणि संवर्धन चळवळी नियमितपणे होत राहाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे भविष्यात बारवांच्या पुनरुज्जीवनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
