माता रमाईच्या निर्वाण दिनानिमित्त..

आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली.

इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते. त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला.पण,ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी,अडचणींशी,गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते.त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. इ.स. १९१३ साली रामजी सुभेदारांचा मृत्यू, इ.स. १९१४ ते १९१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू, ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू, पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. इ.स. १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर व इ.स. १९२६ मध्ये राजरत्‍नचा मृत्यू पाहिला.

बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये. म्हणून, त्यांना कळविले नाही. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या.. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवर्‍या.. सरपणासाठी वणवण फिरल्या. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जात असत.बॅरिस्टरची पत्‍नी शेण वेचते म्हणून,लोक नावे ठेवतील. म्हणून, पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर गोवर्‍या थापायला वरळीला जात असत. मुलांसाठी उपास करत असत.

अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब, आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्‍यास करु लागले. त्याच वेळी रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.

डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती. म्हणून, त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या. ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्‍यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण,रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहीलीस? रमाई म्‍हणाली, तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असताना,मी तुम्हाला अगोदर भेटणे योग्य नाही. मी तर तूमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते.रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये. म्हणून, त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, “साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा.” असे म्हणत. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत.

रमाईचे शरिर काबाड कष्टाने पोखरुन गेल होते. रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्‍न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्‍न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्‍या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.

बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक…

बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य नि माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली – जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक…’’ आपल्या पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या आहेत.

(संकलीत)

“बहुजन समता पत्र” परिवारातर्फे आई रमाईस विनम्र अभिवादन..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading