जलसंपदा विभागाच्या आदेशानेच कुकडीच्या कालव्यावरील पाईप लाईन व होस पाईप काढले : प्रा.दरेकर.

दिनांक ९ जून,श्रीगोंदा:

कुकडी प्रकल्पांतर्गत उन्हाळी हंगाम सन २०१९-२० च्या आवर्तन क्रमांक दोनच्या नियोजनाची कालवा सल्लागार समितीची बैठक दिनांक २९ मे २०२० रोजी जलसंपदामंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन भवन, पुणे येथे पार पडली. या बैठकीमध्ये कुकडी डावा कालव्यावरील पाईप लाईन व होस पाईप ( सायफन ) द्वारे होणारा अनधिकृत पाणी उपसा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी नोंद या बैठकीच्या इतिवृत्तातील पान नंबर तीन वर करण्यात आलेली आहे व त्यानुसार कुकडीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुकडी कालव्यावरील पाईप लाईन आणि होस पाईप (सायफन) हटविण्याची मोहीम घेतलेली आहे. असा खुलासा कुकडी पाटपाणी न्याय्य हक्क कृती समितीचे निमंत्रक प्रा.तुकाराम दरेकर यांनी केला आहे.

प्रा.दरेकर म्हणाले, कुकडीच्या डाव्या कालव्यावरील अनधिकृत पाणी उचलण्याचा बंदोबस्त करण्याचा निर्णय दिनांक २९ मे २०२० रोजी झालेला आहे. कुकडीचे न्याय्य पाणी तालुक्याला मिळावे, म्हणून आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली संदीप नागवडे, गणपतराव काकडे, अनुजा गायकवाड व मी स्वतः १ जून २०२० रोजी उपोषणाला बसलो होतो. या उपोषणामध्ये आम्ही कुकडीच्या कार्यकारी अभियंत्यांना विचारले की, श्रीगोंद्याच्या पूर्व भागाला कुकडीचे पाणी गेल्या आवर्तनात पुरेसे मिळाले नाही. त्यावेळी त्यांनी सांगितले की, कुकडी कालव्यावर अनधिकृत पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असून, त्यामुळे पूर्व भागाला पाणी मिळत नाही. आता हा अनधिकृत पाणी उपसा थांबविण्याचे आदेश कुकडी कालवा सल्लागार समितीने आम्हाला दिलेले असून, दोन-तीन दिवसात कुकडी कालव्यावरील सर्व पाईप लाईन आणि सर्व होस पाईप (सायफन) काढण्याचे काम आम्ही करणार आहोत.

प्रा. दरेकर पुढे म्हणाले, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याचे कुकडीचे पाणी मिळाले पाहिजे आणि वर्षानुवर्षे ते मिळत नाही. म्हणून कुकडीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे .अशी आमची मागणी होती आणि आहे.

पाण्याचा अनधिकृत उपसा किती?

१) कुकडीच्या डाव्या कालव्यावर किमी ११० ते १६५ मध्ये सुमारे १०० होस पाईप(सायफन) आहेत. त्यामध्ये काही ४ इंची, काही ६ इंची तर काही १० इंची आहेत. सरासरी ६ इंची होस पाईप चाळीस दिवसाच्या आवर्तनात ७२० क्युसेक्स म्हणजे ६० द.ल.घ.फूट पाणी उपसतात.

दहा इंची चार होस पाईप दररोज एक क्युसेक्स पाणी उपसतात. तर सहा इंची सहा होस पाईप दररोज एक क्युसेक्स पाणी उपसतात. याप्रमाणे १०० होस पाईपद्वारे पूर्ण आवर्तनात सुमारे ६५ दलघफू पाणी उपसले जाते.

२) किलोमीटर ११० ते १६५ पर्यंत कालव्यावर पांच अश्‍वशक्तीचे १२५० विद्युत पंप आहेत. सहा विद्युत पंप २४ तासात एक क्युसेक्स पाणी उपसतात. म्हणजे १२५० विद्युत पंप २४तासात सुमारे २०८ क्युसेक्स पाणी उपसतात. परंतु लोडशेडिंगमुळे प्रती दिवशी सरासरी नऊ तास वीज मिळते. त्यामुळे १२५० विद्युत पंप दररोज सुमारे ८० क्युसेक्स पाणी उपसतात. चाळीस दिवसाच्या आवर्तनात २७५ दशलक्ष घनफूट पाणी उपसले जाते. तर शंभर शेत तळ्यांना १६० दशलक्ष घनफूट पाणी दिले जाते.

एकंदरीत एका आवर्तनात ५०० दशलक्ष घनफूट म्हणजे अर्धा टीएमसी पाणी अनधिकृतपणे उचलले जाते. त्यामुळे श्रीगोंदे तालुक्यातील कुकडीच्या लाभार्थ्यांना अर्धा टीएमसी पाणी कमी मिळते. अधिकारी मात्र अनधिकृत पाणी श्रीगोंद्याच्या माथी मारतात.

प्रा. दरेकर म्हणाले, जलसंपदा विभागाने पाईप लाईन आणि होस पाईप काढण्याचे आदेश दिले नसते, तर आमच्या उपोषणाचा कुकडीच्या अधिकाऱ्यांवर काहीही परिणाम झाला नसता. कुकडीच्या अधिकाऱ्यांची अनधिकृत पाणी उचलणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांबरोबर मिलीभगत असल्यामुळे कुकडीच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या आदेशामुळे अनिच्छेने पाईप लाईन व होस पाईप काढावे लागले आहेत. यामध्ये आमदार बबनराव पाचपुते व माझ्या उपोषणाचा काहीही परिणाम नाही. कुकडीचे अधिकारी आमच्या ऐकण्यात असते तर दहा-पंधरा वर्षांपूर्वीच कुकडीचा कालवा अनधिकृत पाण्याच्या उपशापासून मोकळा झाला असता. ज्या शेतकऱ्यांचा गैरसमज झाला असेल त्यांनी आपली समक्ष भेट घेतल्यास कुकडी कालवा सल्लागार समितीचे इतिवृत्त आपण त्यांना दाखविण्यास तयार आहोत. असेही प्रा. दरेकर म्हणाले.

चालू आवर्तनात श्रीगोंदा तालुक्याच्या वाट्याला ४१० दशलक्ष घनफूट पाणी आलेले आहे. जर अनधिकृत पाण्याचा बंदोबस्त केला नसता तर हे सर्व पाणी पाईप लाईन व होस पाईप आणि शेततळे यांनाच पुरले नसते व लाभार्थ्यांना एकही थेंब पाणी मिळाले नसते ,असेही प्रा. दरेकर म्हणाले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading