अशोकाचे तक्षशिलेला प्रयाण
तक्षशिला हा नाग लोकांचा प्रांत म्हणून प्रसिद्ध होता. सुसीमबरोबर ज्या सुविधा व सैन्य आहे त्याची माहिती करून घ्यावी कारण सुसीम त्या प्रांताचा प्रशासक होता म्हणून त्याच्याकडून त्या प्रांताची आणि लोकांच्या बंडाची कारणे समजून घ्यावीत म्हणून तो सुसीमदादाकडे गेला . अशोकाला वाटत होते की , राजकीय व धार्मिक कारणाने लोकांनी बंड केले असेल . सुसीमला भेटण्यास गेला तेव्हा तो नाचगाण्यात दंग होता . तो दारू पिऊन स्वतः नृत्य करत होता . हे पाहून अशोकाला वाईट वाटले .

” दादा , मी तक्षशिलेला जात आहे . तू त्याविषयी मला काही माहिती दिलीस तर बरं होईल. ” माहिती देण्याचे लांबच अशोकाचा त्याने अपमान केला. ” मला जमलं नाही म्हणून तू दिवे लावायला निघालास ? जा पाजळ आपल्या अकलेचे दिवे. ” अवमानाचे कडवट डोस त्याने अनेकदा पचवले होते. बिंदूसारचा दुजाभाव, सैन्य – सामुग्री कमी देणे हा फरक अशोकाच्या लक्षात आला होता. पट्टमहिषी यांच्याकडून वेळोवेळी होणारा सुभद्रांगी व अशोकाचा अपमान आणि सुसीमचे खोचक बोलणं अशोकाच्या मनाला बोचत होतं. याची पाळंमुळंही यातच आहेत. तसा मुळात अशोक सहनशील , मनमिळावू , विशाल मनाचा कुमार होता . पण प्रसंगच माणसाला कठोर बनायला शिकवतात.
अशोक सुसीमचा निरोप घेऊन मागे फिरला. तेव्हा तो म्हणाला, “ जा आणि आम्हाला जमलं नाही ते तू करून दाखव . तेथील लोक नीच , राजद्रोही आणि विद्रोही आहेत. तू हे अराजक मोडून आलास तर मोठे बक्षीस देईन . पण तू जातोस तर तेथला म्होरक्या मी बंदीखान्यात बंदीवान केलाय. तेथे गेल्यावर जरा जपून. तेथे एक तळपती कट्यार वावरत आहे. ” आणि तो खदखदून हसला. अशोकाच्या मनाला फार वेदना झाल्या.. मोठा बंधू म्हणून त्याचा मान राखन तेथून बाहेर पडला. तक्षशिलेला निघाला तेव्हा अशोकाचा बंधू तिष्य – हा प्रेमळ व स्वच्छ मनाचा.
तो अशोकाला रागावर ताबा राखण्याचा सल्ला देत असे . तो एकदम अशोकाच्या पुढे येऊन उभा राहिला व त्याने अशोकाला हसत हसत अभिवादन केले. सुसीमच्या बोलण्याने व्यथित झालेला अशोक तिष्यच्या भेटीने थोडासा सुखावला. तिष्याने आपल्या हातातील तथागत गौतम बुद्धाची एक अभयमुद्रा असलेली मूर्ती अशोकाच्या हातात दिली . ” हे बघ, तू गांधारदेशात जात आहेस. तेथे अशा कलापूर्ण सुंदर अभय मूर्ती मिळतात . मला दोन हात उंचीची शुभ्र अभयमुद्रा असलेली बुद्ध मूर्ती आणशील ? ” अशोक थोडंसं हसला व म्हणाला, ” नक्की आणतो . ” अशोक जेव्हा पाटलीपुत्रच्या रस्त्यावरून निघाला तेव्हा पाटलीपुत्र नगरीच्या बावन्न बुरूजावर व रस्त्यावर लोकांची तुफान गर्दी झाली होती .
अशोकाच्या लोकप्रियतेची ही एक पावतीच होती . यावरून अशोक किती प्रेमळ लोकप्रिय होता याची कल्पना येते . पाटलीपुत्र ते तक्षशिला हा रस्ता बिंबिसारच्या काळात बांधला होता . ( तयार केला होता ) . याच मार्गावरून आपल्या सैन्यासह अशोक निघाला होता. वादळामुळे रस्त्यात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडलेले होते. ते दूर करेपर्यंत अशोकाला थांबावे लागत असे . एका ठिकाणी असेच थांबावे लागले . बंधू पालीतासह तो फेरफटका मारण्यासाठी जंगलात गेला. तेथे ठिकठिकाणी झाडावर पक्षांची गर्दी होती. अनेक प्राणीही दृष्टीस पडले. पण अशोकाला शिकार ( मृगया ) करण्याची इच्छा झाली नाही. फक्त निसर्गसौंदर्याचा तो आनंद लुटत होता . म्हणजे वेळप्रसंग पाहून त्या प्रसंगाशी अनुरूप असेच वर्तन तो करीत असे . विदिशाच्या विचाराची पक्कड अशोकाच्या मनात परिवर्तन घडवत होती .
प्रवास पुढे चालू झाला. वाटेत व्यापाऱ्यांचा तांडा भेटला. तेव्हा सैनिकांना अवश्य लागणाऱ्या वस्तू खरेदी केल्या. तांडाही त्यांच्या सोबतीने पुढे जात राहिला . थोडेसे अंतर पुढे गेल्यानंतर अनेक बौद्ध भिक्खूचा संघ येताना दिसला. त्यातील एक बौद्ध भिक्खू सैनिकांच्या जवळ जाऊन विचारपूस करू लागला . अशोकाने आपली नजर सैनिकांवर फिरविली .
सैनिक बौद्ध भिक्खूपासून दूर गेले. भिक्खूने अशोकाच्या उग्र चेहऱ्याकडे पाहिले आणि विचारले, ” तू माझ्यावर रागावलास का ? अरे, जगात कितीतरी प्रकारचे लोक आहेत . त्याप्रत्येकावर असाच रागावणार काय ? मला वाटते तू तसा उग्र व रागीट राहशील असे नाही . तू प्रेमळ , अत्यंत दयाळू , प्रजाहितदक्ष राजा होशील . ” अशोकाला आश्चर्यच वाटले. या बौद्ध भिक्खूकडे पाहताना विदिशाची चैत्यपूजा, तिचे ते प्रेमळ स्वच्छ मन खरोखर बौद्ध धम्माचा स्वच्छ झराच आहे अशा विचारात अशोकाने तक्षशिलेकडे प्रयाण केले . वाटेत गंगेच्या काठी मुक्काम होता. सैन्यही प्रवासाने थकले होते. सगळे शांत झोपलेले होते. अशोकाला भल्या पहाटेच जाग आली. अशोक उठला आणि तडक गंगा – यमुनाच्या संगमावर निघाला . पायाखाली मऊ गवत त्यावरून चालताना एक आगळाच अनुभव अशोक अनुभवत चालत होता. नदीकाठच्या फुलाच्या सुगंधाने वातावरण भरून गेले होते. अंगावरचे वस्त्र उतरवून बाजूला ठेवले आणि सरळ पाण्यात सूर मारला. पाण्यातून डोकं वर काढलं तर बंधू पालीत समोर उभा .
अशोकाला म्हणाला , “ जागोजागी शत्रू आहेत . आपण असं एकट्यानं फिरणं बर नाही . ” अशोकाला पाहून घबरलेल्या पालीतला धीर आला. ” आपल्यासारखे माझे रक्षक असताना मला कसली भीती आली आहे . ” तेव्हा दोघेही खळखळून हसले. त्या संगमातील स्वच्छ पाण्यासारखे, त्यांची मन ही स्वच्छ होती . स्नानानंतर दोघेही परत निघाले. तेव्हा चांगलेच उजाडले होते. वाळवंटात एक उदासवाणा माणूस बसलेला होता . त्याच्यावर अचानक अशोकाची नजर गेली. अशोकाने त्याच्याजवळ जाऊन त्याची विचारपूस केली. तो चंपानगरीत भेटलेला सगुण पाथरवट होता . तो तेथे येण्याचे कारण विचारल्यानंतर सगुण मुसमुसून रडू लागला . अशोकाने त्याला पुन्हा विचारले , “ काय झाले ? सांग बघू . ‘ सगुण म्हणाला , ” माझे वडील वारले . त्यांच्या अस्थी येथे सोडविण्यासाठी आलो होतो . ” अशोकाने त्याला धीर दिला तेव्हा त्याचं रडनं थांबल तो थोडा स्थिरावला तेव्हा अशोक म्हणाला “ बरं ! सगुण तू अजूनही दगडाच्या मूर्ती बनवतोस. ” ” होय .

” म्हणून बांधलेल्या कपड्यातील एकाच दगडात चार सिंहाचं, प्रत्येक दिशेकडे एकाचे तोंड असलेले असे अप्रतिम शिल्प त्याने अशोकाला दाखविले. अशोकाने ते शिल्प स्वतःकडे ठेवले. सगुणला सोबत घेतले. बंधू पालीतला सगुणची सर्व व्यवस्था करण्यास सांगितले. नंतर ते तक्षशिलेकडे मार्गस्थ झाले. सामान्यातल्या सामान्य मानसाला धीर देणारा अशोक हे एक वेगळ व्यक्तिमत्त्व होतं.
क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)
