पाटलीपुत्राहून चिठ्ठी
त्या काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आजच्याप्रमाणे सुविधा नव्हत्या किंवा इतरही सुखसोयी नव्हत्या. मौर्य ( मगध ) साम्राज्य तर खूप मोठे होते. त्याची व्यवस्था राखण्यासाठी निरनिरळ्या भागावर शासक म्हणून नेमणूक केली जात असे. अशोक उज्जैनीचा शासक (राज्यपाल) झाला. तेव्हा सुसीम तक्षशिलेचा प्रशासक म्हणून कार्यभाग सांभाळत होता.

बिंदूसारचा निरोप मिळताच अशोक विदिशा व आपल्या मुलांना विदिशानगरीत सोडून त्यांचा निरोप घेऊन निघाला . कारण लहान मुलांना घेऊन प्रवास करणे योग्य वाटले नाही. विदिशाने अशोकाला भरल्या नयनांनी निरोप दिला. तेव्हा अशोकही गलबलून गेला . दोन्ही मुलांना जवळ घेतले. मायेने त्यांवर हात फिरवला आणि निरोप घेऊन निघाला. निरोप देताना विदिशा म्हणाली, ” रक्तपात व हिंसेपासून स्वतःला आवरावे, ” हिंसेने मिळालेला आनंद अल्पजीवी असतो. ” अशोकाने मजल दरमजल प्रवास केला व अशोक आपल्या सैन्यासह राजधानी पाटलीपुत्र येथे येऊन दाखल झाला. मातोश्री सुभद्रांगी यावेळी आजारी होत्या.
त्यांनाही जाऊन भेटला. मातोश्रींनी आपल्या नातवांविषयी विचारपूस करत असताना अशोकाला विदिशाचे शब्द आठवले- ” मलाही घेऊन चला. मला माझ्या सासूबाईंची सेवा करता येईल . ” किती मोठ्या मनाची आहे विदिशा ! अशोक मनोमन सुखावला. मातोश्रीचा निरोप घेऊन पिताश्रींची भेट घेतली तेव्हा अशोकाला सांगण्यात आले – आता आपणास तक्षशिलेला जायचे आहे. तेथील लोकांनी बंड केले आहे आणि सुसीमचा त्यावर अजिबात वचक नाही. लोक आपल्या राज्याच्या विरोधात बंड करून उठले आहेत.
ते शमवण्याची शक्ती अशोकामध्येच आहे हे बिंदूसार ओळखून होता. अशोक कर्तव्यदक्ष व कर्तव्यनिष्ठ आज्ञाधारक आहे याची सर्वांनाच जाणीव होत होती. अशोकासाठी ही एक चांगली संधी चालून आली होती.
क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)
