प्रजापिता सम्राट अशोक (भाग ८)

उपराज (शासक)

सुसीमची तक्षशीला व अशोकाची उज्जैनीचे उपराज म्हणून नेमणूक करण्यात आली . अशोकाला ही आज्ञा पाळणे भाग होते आणि अशोक आपल्या कामगिरीवर उज्जैनीला जाण्यास निघण्यापूर्वी म्हणाला , “ माझ्यापेक्षा मोठे भाऊ आहेत . त्यांना पाठवा . ” तेव्हा राधागुप्त म्हणाले , “ कुमार ! आपले सर्व बंधू व सैन्य एकीकडे आणि आपण एकीकडे. आपले कौशल्य, शौर्य व शक्ती वेगळी आहे . ” तेव्हा अशोक तयार झाला.

https://bit.ly/bspmycityshrigonda

उज्जैनीला जाण्यापूर्वी राज्यकारभाराची माहिती अशोकाने आत्मसात केली होती . अवंतीचा शासक ( उपराज ) म्हणून बिंदूसारांनी त्याची नेमणूक केली होती . आज्ञाधारक अशोकाने या गोष्टी मान्य केल्या होत्या . पाटलीपुत्रच्या रस्त्यावर व बावन्न बुरूजावर ( इ . स . पू २८६ ) अनेक जण निरोप देण्यासाठी उभे होते . अशोक आपल्या पराक्रमान सर्वांनाच चांगला परिचित झाला होता . जनतेच्या मनातील भावी राजा अशोक वाटत होता . अशोकाला निरोप देण्यासाठी जमलेल्या लोकांनी अशोकाच्या नावानी घोषणा दिल्या अशोकावर फुले उधळली यामुळे अशोकाने ओळखले आपल्यावर अन्याय करणा – यापेक्षा प्रेम करणारी जनता मोठी आहे .

लोकांचा निरोप घेऊन तो पुढील प्रवासाला निघाला.वाटेत विदिशानगर लागले . या नगरीचा परिसर वनश्रीने सुंदर फुलला होता . अशा वातावरणात अशोकाला फिरायला आवडायचे . तो निसर्गात रममाण होई . अगदी सकाळची वेळ . हिरव्या वनश्रीवर सूर्याची पिवळे किरणे पसरली होती. मनमोहक निसर्ग अशोकाला खुणावत होता, बोलावत होता. अशोक घोड्यावर स्वार होऊन निसर्ग न्याहाळत फिरत होता. याच नगरात एक व्यापारी ( श्रेष्ठी ) राहात होता . तो बौद्ध होता तर पत्नी शैव होती . त्यांच्यापोटी एक सुंदर कन्यारत्न जन्मास आले होते . तिचे नाव विदिशा ( महादेवी ) . घरात सर्व बुद्ध धम्माचे आचरण करत होते. ती याच वातावरणात लहानपणापासून वावरत होती . तिचे आचरण शुद्ध होते .

बौद्ध संस्कार लहानपणापासून तिच्या अंगी रुजले होते. विदिशा पक्षीप्रेमी होती . तिने एक पोपट पाळला होता . तोही सकाळी सकाळी विदिशाशी बोलत असे. आज विदिशा सकाळीच उठून बागेत फुले गोळा करण्यासाठी निघाली . तिला पाहताच पोपट म्हणाला , ” बुद्धं सरणं गच्छामि धम्म सरणं गच्छामि सघं सरणं गच्छामि ” विदिशाने वरीलप्रमाणे स्वरात स्वर मिसळले आणि हसतच म्हणाली , ” मला आज लवकर तयारी करून नेत्रवतीच्या काठी स्तूप पुजेसाठी जायचे आहे . ” तिने बागेतील सुंदर टपोरे फुले गोळा केली .

पोपटाकडे हसत पाहून विदिशा आणि तिच्या मैत्रिणी नेत्रवतीच्या काठी एक भव्य आणि दिव्य असा स्तूप आहे , त्याच्या दर्शनाला जात होत्या . सकाळची सुरेख शोभा पाहत अशोक याच नदीकाठी फिरत होता . एवढ्यात विदिशा नगरीतील तरुणींचा एक घोळका त्याच रस्त्यावरून जात होता . अशोकाची नजर त्यापैकी विदिशावर स्थिरावली . तो तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे तिच्याकडे आकर्षित झाला . त्याने आपला घोडा तिच्याजवळ नेऊन थांबविला . अशोक म्हणाला , “ तुम्ही कोण ? कोठे जात आहात ? ” ” आम्ही याच नगरीच्या कन्या . आम्ही चैत्य दर्शनाला जात आहोत . ” ” तुम्ही सगळ्या बौद्ध आहात . ” ” अग विदिशा , आपणास उशीर होत आहे . चल लवकर .

“विदिशाला जयवंती नावाची मैत्रीण म्हणाली. तशी ती चैत्याच्या दर्शनासाठी चालू लागली. अशोक विदिशाच्या पाठमो – या आकृतीस न्ययाहाळत उभा होता . हे नगर जसे सुंदर तशा येथील या तरुणी सुंदर आहेत . ती विदिशा पाठीवर लांबवर रुळणारे केस , सुंदर टपोरे डोळे , मोहक चाल , गौर कांती या सगळ्या गोष्टीने अशोक कधी विदिशाच्या मोहात गुरफटला गेला ते कळलेच नाही. अशोक कितीतरी वेळ विदिशाला पाठमोरा न्याहळत होता.

आपल्या सोबत असलेल्या सेवकाकडे मान वळवून त्याने इशारा केला . अशोकने तिचे माता – पिता कोण , कोठे राहतात ते शोधण्याचा सेवकाला आदेश दिला . आदेश मिळताच सेवकांनी नगरीत फिरून चौकशी केली . तेव्हा कळले की ती एका व्यापा – याची मुलगी आहे . ” ठीक आहे , त्यांना सांगा की , मला ताबडतोब त्यांना भेटायचे आहे . ” व्यापा – याला निरोप देताच व्यापारी थोडासा धाबरला . आपण काय चूक केली ते त्याला कळेना . तो अगदी बेचैन झाला . राजकुमार भेटीला गेल्यावर त्याने त्यांचे चांगले स्वागत केले . नंतर त्याला अशोक म्हणाला , “ आपली हरकत नसेल तर एक गोष्ट विचारू ? ” तो घाबरत ” होय ” म्हणाला . ” मी आपल्या मुलीला सकाळी पाहिले .

ती मला खूप आवडली. मी तिच्याशी विवाह करू इच्छितो. तुमची परवानगी असेल तर , मी तिला मागणी घालण्यासाठी आलो आहे . ” हे ऐकून त्यांच्या मनातील भीती क्षणात दूर पळाली . हात जोडून हसत हसत त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले ” हे माझे परमभाग्य आहे . ” त्याचा चेहरा आनंदाने फुलला . आणि लगेच विवाहाची तयारी करण्यात आली . अशोक – विदिशाचा विवाह अगदी थाटामाटात पार पडला ( इ.स.पू .२८५ ) आता अशोकाला थांबायला वेळ नव्हता . उज्जेनीला पोहोचायचे होते . नववधूला पाठविण्यासाठी फार मोठा जनसमूह जमला होता. त्यात नगरीच्या रस्त्यावर विदिशाची मैत्रीण जयवंती म्हणाली, ” बघ हं , तुझा पती रागीट, राकट , काळा आहे आणि राजकुलातील कुमार अनेक विवाह करतात , जरा जपून हं ! ” ” हे बघ जयवंती , तू माझी जीवाभावाची मैत्रीण आहेस . तुला सांगते , मी माझ्या पतीला गुणदोषांसह स्वाकारलं आहे . ते मला मनापासून आवडतात . मी चैत्य दर्शनाला जाते काय , त्यांची भेट होते काय आणि आज त्यांची पत्नी म्हणून त्यांच्यासोबत जाते काय . किती झटपट घटना घडल्या ते कळलंही नाही . ” त्या चैत्य दर्शनाने मला नवचैतन्यच प्राप्त झाले आहे . त्याच वाटेवरून हा प्रवास आहे .

अशोक आपल्या पत्नीसह उज्जैनीला निघाला. उज्जैनीला पोहोचल्यावर त्याने शासनाची सर्व सूत्रे स्वीकारली आणि तेथील कारभार पाहण्यास सुरुवात केली. राधागुप्त वेळोवेळी अशोकाला मदत करीत होते. अशोकाने आपल्या कार्याने लोकांची मन जिंकली होती. राजकारभाराच्या धामधुमीत काळ पुढे पुढे सरकत होता . विदिशासाठी वेळ फारच कमी मिळत होता. एकदा अशोक आणि विदिशा सुशोभित केलेल्या नौकेतून क्षिप्रा नदीतून जलमंदिरात जात असताना तेथील मंदिर व परिसर पाहून विदिशा खूपच उल्हासित झाली. अशोक व विदिशा यांनी बराच वेळ तेथे आनंदाने घालविला. ते एकमेकात मनाने केव्हा विलिन झाले ते कळले नाही. परतीच्या वाटेवर निघाल्यानंतर जंगलात लपून बसलेल्या माणसाने अशोकाच्या दिशेने बाण मारला.

तो बाण सळसळत आला. अशोकने विदिशाला चटकन बाजूस ओढले . तरी अशोकाच्या दंडात एक बाण घुसला . अशोकाने त्या दिशेने आपली कट्यार फेकली आणि समोरचा माणूस जायबंदी झाला . मोठनोठ्याने ओरड लागला – “ याला दोन थेंब पाणीही देऊ नका . ‘ अशोकाचे अंगरक्षक राधागुप्तच्या एका नजरेत थरथर कापू लागले . समोरचा प्रसंग पाहून विदिशाच्या पोटात कालवाकालव झाली . बुद्धाला हिंसा मान्य नाही . त्या बौद्ध संस्कारामध्ये ती लहानाची मोठी झाली होती. या प्रसंगाने ती दुःखी झाली . सैनिकांनी त्याला घेरलं तेव्हा ती म्हणाली , ” कुमार महाराज , ह्या वेड्या मुलाला या वेळी क्षमा करा . आपल्या या प्रेमसहलीला रक्ताचे गालबोट नको . त्याला ठार मारू नका .

त्याला क्षमा करून जीवदान द्या. कारण यातच वीराचा वीरपणा असतो. हे सर्वात मोठे दान आहे . ” राधागुप्त म्हणाले, “ हे पहा , आपलं मन घट्ट करायला हवे . आपण एका राजकुमाराच्या सहचारिणी आहात. ” ” हो , ते खरं आहे पण यावेळी त्याला सोडा. ” क्षमा हा सर्वात मोठा गुण आहे. विदिशाच्या विनंतीवरून त्या तरुणास जीवदान देण्यात आले . विवाह होऊन आता एक वर्षाचा काळ लोटला होता . इ.स.पू. २८४ मध्ये विदिशाच्या पोटी एक पुत्र जन्माला आला . त्याचे नाव महेंद्र .

अशोकाला खूप आनंद झाला . तो म्हणाला , ” हा माझा मुलगा पृथ्वीवर विजय प्राप्त करेल इतका मोठा बनेल . ” विदिशा म्हणाली , ” मला वाटते हा तथागत गौतम बुद्धाच्या धम्माचा अंगीकार करून मानव जातीचे हृदय जिंकेल. ” मुलाच्या आगमनाने राजमहाल फुलला होता . सगळ्यांना आनंद झाला . महेंद्र दिसामासी वाढत होता. पुढे इ.स.पू .२८२ मध्ये कन्यारत्न जन्मास आले. आणि तिचे नाव ठेवले संघमित्रा. हे नाव विदिशाच्या आवडीनुसार ठेवले होते. अशोकाचा आता आपल्या कार्यात जम बसला होता. सेवक अशोकाच्या कार्यावर खूष होते आणि आपले कार्य कर्तव्यदक्ष पद्धतीने पार पाडून अशोकाशी मनमोकळेपणाने वागत होते. अशोकही तेवढ्याच खुल्या दिलाने त्यांना वागवत होता.

https://bit.ly/bspmycityshrigonda

अशोक – विदिशा यांच्या संसारवेलीवर महेंद्र आणि संघमित्रा ही गोंडस फुलं उमलली होती. त्यांच्या सहवासात विदिशा सुखावली होती. उज्जैनीची जनता ही अशोकाच्या राज्यकारभारात खुष होती. आता अशोकातही बदल जाणवत होता. आपल्या कर्र कर वाजणाऱ्या वहाणा तो विदिशाच्या महालाबाहेरच काढून मगच महालात प्रवेश करीत असे . तेव्हा त्याची मुद्रा सौम्य, शांत व हसरी असे . कठोर मनाचा वाटणारा अशोक विदिशाच्या सहवासाने मृदू व कुटुंबवत्सल बनत चालला होता. विदिशा अशोकाच्या मनात कठोर शिक्षेपेक्षा क्षमेची भावना रूजवत होती यावरून सिद्ध होते.

क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातून)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading