धम्मदीप (धम्माची वाटचाल):
अशोक महास्थिवर मोग्लीपुत्र तिष्य यांना गुरूस्थानी मानीत असे. बौद्ध धम्माचा महान अभ्यासक असल्याने बौद्ध धम्माची विपुल माहिती त्यांच्यामार्फत अशोकाला मिळाली. अशोक धम्माची माहिती करून घेण्यासाठी जवळ जवळ ३ वर्षे पायी फिरला. श्रामणेराचे जीवन जगला.

बौद्धांच्या पवित्र स्थळांना भेटी दिल्या. भिक्खूच्या बरोबरीने धम्माचे पालन केले. त्यांनी तथागत गौतम बुद्धाचे जन्मस्थान लुंबिनी, ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली, ज्या गयेत अनेक वर्षे बुद्धाचे वास्तव्य होते, ते श्रीवस्ती, जेतवन, जेथे तथागत गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले ते कुशीनगर अशा अनेक महत्त्वाच्या स्थळांना भेटी दिल्या. माता – पिता, थोर व्यक्ती, मित्र, परिचित व्यक्ती, कुटुंबातील व्यक्ती, दास, श्रमण, उपासक, सेवक, गरीब, पिडीत, एकूणच सृष्टीतील सर्वांसाठी निष्पाप वृत्तीने सत्कर्म करणे हाच खरा धम्म आहे.
सर्व धर्माच्या लोकांनाही अशोकाने मानाचे स्थान दिले. कधी कोणाच्या धर्माबद्दल अनादर दाखविला नाही. उलट त्यांचा सन्मानच केला. हा असा मोठ्या दिलाचा राजा होता. सद्विचारांचा ध्यास धरा, सद्भावनांची जोपासना करा, चांगल्या गुणांची वाढ करा, त्यातून आपले जीवन व्यतीत करा असा अशोक उपदेश करीत असे. अशोकाच्या मते बौद्धधम्म म्हणजे मानव धम्म आहे. धम्म म्हणजे नीती. ते अशोकाने पाळले. त्याने इतर धर्मातील चांगल्या गुणांचा आदरच केला. सर्व धर्मातील चांगले तत्त्व एकत्र करून ते आचार – विचार, कृती, संयम या गोष्टींचा माणसांनी विकास करावा अशी त्यांची भावना होती.
बौद्ध धम्म जगाच्या पाठीवर अनेक देशात पोहोचवण्याचं महान कार्य अशोकांनी केले. अशोकाने हळूहळू लोककल्याणाची कामे करण्यास सुरूवात केली. २५ २६ वर्षे तुरूंगात खितपत पडलेल्या लोकांची सुटका केली. अशोकामध्ये घडत असलेल्या परिवर्तनाने राधागुप्त मात्र फारच त्रस्त झाले होते.
क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)
