प्रजापिता सम्राट अशोक (भाग २).

अशोक आणि सिंहासन

अशोकला अनेक भाऊ होते . सुसीम हा सर्वात मोठा आणि विताशोक हा त्याचा सख्खा लहान भाऊ होता . अशोक दिसामासी वाढत होता . आपल्या भावंडांसोबत निरनिराळे खेळ खेळत होता . अनेक खेळांत तो प्रवीण झाला होता . एकदा सर्व भावंडे बागेत खेळत होते . खेळात सर्व अगदी दंग झाली होती . तेवढ्यात एक सेवक तेथे आला आणि म्हणाला , महाराजांनी आपणा सर्वांस आरामशाळेत बोलविले आहे . ” तेव्हा सुसीम म्हणाला , “ तुम्ही सगळे पुढे व्हा .

https://bit.ly/bspmycityshrigonda

मी आलोच मागून . ” अशोक आरामशाळेत पोहोचला तेव्हा महाराज बिंदूसारांची ती काळी धिप्पाड मूर्ती , उग्र वाटणारा चेहरा एका आसनावर विराजमान झालेला होता . अशोकाची आई सुभद्रांगी मात्र कितीतरी पटीने सुंदर आणि सुकोमल होती . महाराज बिंदूसाराचा रंग व शरीरयष्टी घेऊन अशोक जन्मास आला होता . अशोकाला पाहताच महाराज म्हणाले , ” कुमार ! हे पहा गांधार देशातील कलाधर नावाच्या कारागिराने तुम्हा सर्व कुमारांकरिता ही छान छान आसनं बनवलेली आहेत . किती छान आहेत , नाही का ? तुला आवडली ? ” अशोकाने होकारार्थी मान हलवली . ” अरे ! मग जाऊन बस की , तुझ्या आवडीच्या आसनावर . ” हिरेजडीत सुंदर सिंहासन होते . त्यावर अशोक जाऊन बसला आणि गंमतच झाली . अशोकाने उजवा पाय जोरजोरात आपटून म्हणाला , ” कोण आहे रे तिकडे ? लवकर या . ” अगदी सहज आपल्या वडिलांची हुबेहूब नक्कल केली .

बिंदूसार कौतुकाने पाहत हसले अन् म्हणाले , ” अरे वा ! छान कुमार . “अशोकाने टाळी वाजवली आणि म्हणाला , ” कोण आहे रे तिकडे ? ” अशोकाचा आवाज ऐकून राधागुप्त अशोकाच्या समोर हजर झाले आणि हात जोडून म्हणाले , ” आज्ञा महाराज . ” ” उद्यानात माझे बांधव खेळत आहेत . त्यांना लवकर घेऊन या . ” ” छान ! ” ” वा ! कुमार अशोक महाराज आणि राधागुप्त मंत्री . ” आरामशाळेत अनेक तऱ्हेची आसनं होती. परंतु, अशोकाने इतर सुंदर आसनांपेक्षा रत्नजडीत आणि सिंहाचे जबडे असलेले व आकर्षक कोरीवकाम केलेले सिंहासनच बसण्यासाठी निवडले . हे सिंहासन मौर्य साम्राजाचे प्रतीक होते. परंतु, अशोकाचा हा आनंद फारकाळ टिकला नाही .

थोरल्या पट्टमहिषी यांचे कर्कश शब्द कढत तेलासारखे अशोकाच्या कानावर धाडकन आदळले . “ पुरे हा पोरकटपणा, याला काही सुमार आहे की नाही ? हे राणीच्या राजपुत्राचे सिंहासन आहे. दासींच्या नव्हे. ” त्या . बाल अशोकाकडे करड्या व जळजळीत नजरेने पाहत कडाडल्या . अशोकाचा आनंद क्षणात कोठे पळून गेला . कंठ दाटून आला . डोळे पाण्याने डबडबले . शरीराला कंप सुटला पण तेवढ्यात धैर्य करून अशोकाने महाराजांना विचारले, ” तात , मी खरोखरच दासीपुत्र आहे का ? ” तेवढ्यात सुसीमसह सर्व भावंडे आरामशाळेत आली होती . अशोकाचे बोलणे ऐकून सुसीम म्हणाला , “ माझी मातोश्री राणी आहे ? ” “ तात , मग माझी आई तुमची राणी नाही ? ” महाराजांनी अशोकाला जवळ घेतलं आणि त्याला समजावत म्हणाले , ” शांत हो पुत्रा, राणीसाहेब रागात आहेत .

त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस . ” ‘ मग सांगा मला सिंहासनावरून का उठवलं ? माझा त्यावर अधिकार नाही . ” महाराज म्हणाले, ” अरे ! पट्टराणीच्या थोरल्या मुलानं सिंहासनावर बसायचं असतं . सुसीम हा सर्वात मोठा राजपुत्र आहे . तो त्याचा अधिकार आहे . ही आपल्या राजघराण्याची परंपरा आहे . ” अशोकाचे डोळे रागाने लाल झाले . अंगाची लाही लाही झाली . तो ताडकन् बाहेर जाण्यासाठी निघाला तेव्हा महाराज म्हणाले , “ दुसरी किती तरी आसने आहेत . ते बघ गरुडासन , आपल्या मौर्यकुलाचे भूषण मयुरासन . त्यावर बैस . ” महाराजांनी अशोकाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला . “ नको , मला या सिंहासनावरच बसायचे आहे . ” सुसीमची आई सुसीमला त्या सिंहासनावर बसण्यास सांगत होती, परंतु, तेव्हा सिंहाचे जबडे बघून घाबरलेला सुसीम म्हणाला , ” नको , नको मातोश्री ते सिंहासन .

ते सिंहाचे आक्राळविक्राळ जबडे बघूनच मला त्यावर बसण्याची भीती वाटते . ” तिष्य मात्र शिलारानावर आरामात मांडी घालून बसला होता . आणि म्हणाला , ” आपणास ध्यानधारणा करण्यास हे आसन फारच छान आहे . ” अशोक क्षणात ताडताड बाहेर निघून गेला तेव्हा त्याच्या मागे मागे राधागुप्तही धावत सुटले . अशोकाला तो म्हणाला , ” कुमाराने राग करणे बरे नाही . ” त्याला समजवण्याचा प्रयत्न केला . “ अंगी पराक्रम असला की सिंहासन मिळेल . त्यासाठी पराक्रम आणि बुद्धीमत्ता याचा ध्यास धरा . अशोक मातोश्रींच्या महालात पोहोचण्याअगोदरच आरामशाळेत जे घडले त्याची माहिती सुभद्रांगीला कळली होती . झाल्या अपमानाने मातेचे मन कळवळले .

त्या आपल्या आसवांना डोळ्यांतून वाट करून देत होत्या. अशोक येताच त्यांनी त्याला छातीशी कवटाळले. अशोकालाही गहिवरून आले. अशोकाच्या डोळ्यातील आसवे मातोश्रींच्या चरणावर पडत होती . तर सुभद्रांगीनी मातेचे अश्रू अशोकाच्या मस्तकावर . जवळ उभ्या असणाऱ्या लोकांच्याही अंतःकरणात चर्र झाले. माता – पुत्र कितीतरी वेळ स्तब्ध होते . दुःखाचा आवेग ओसरल्यावर सुभद्रांगी म्हणाली “ अशोका ! ” बाळा , आरामशाळेत काय घडले ते तरी सांगावे. ” ” हं . सगळं सांगतो पण…. ” अरे ! पण काय ? ” अगोदर हस बघू. ” अशोकाच्या बोलण्याने आईने डोळे पुसले आणि खरंच हसली. ” माझं नाव कोणी ठेवलं? ” ” तुझ्या पिताश्रींच्या परवानगीने मीच ठेवलं. का ? तू जन्मलास आणि माझा शोक संपला, दुःख दूर झाले. म्हणून तुझे नाव अशोक ठेवले. ” उभे असलेले राधागुप्त वातावरण शांत झाल्याचे पाहून महालातून बाहेर पडले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

थोड्या वेळाने अशोकही झाल्या गोष्टी विसरून सर्व भावंडांत मिळून वागत होता. सुभद्रांगी वित्ताशोक याला खेळवत होती. छोटा वित्ताशोक हुंकार देत होता.

क्रमशः
स्रोत:(प्रजापिता सम्राट अशोक या श्रीनिवास भालेराव यांच्या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading