प्रजापिता सम्राट अशोक (भाग ६).

वराहचे सुळे

विद्याभवनाच्या थोड्या अंतरावर एक पशूशाळा होती. त्यामध्ये रानटी वराह होते. एके दिवशी रक्षकांची नजर चुकवून एक वराह बाहेर निसटला आणि विद्याभवनाच्या बागेत घुसला. सर्व विद्यार्थी भोजनगृहात भोजनासाठी गेले होते. वित्ताशोक मात्र एका झाडाखाली आपल्याच तंद्रीत बसला होता. वराहाने वित्ताशोकाकडे पाहिले आणि नाक फेंदरून त्याच्या बाजूने मुसंडी मारली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

वित्ताशोक घाबरून पळत सुटला. त्यावेळी अशोक नेमका शस्त्रागाराच्या पायरीवर उभा होता. समोरचे दृश्य पाहून क्षणाचाही विलंब न करता त्याने वराहाच्या पायावर बाण मारला व पाठोपाठ पायरीवरून उडी घेऊन वित्ताशोकाला विद्याभवनाच्या आत ढकलले. तेव्हा संतापलेला वराह अशोकावर चाल करून आला. अशोकने न घाबरता त्या वराहाचे सुळे घट्ट पकडले. दोघांमध्ये कितीतरी वेळ रेटारेटी चालली होती. अशोकाला अनेक जखमाही झाल्या होत्या . पण अशोकाने असा एक झटका मारला की त्याचा एक सुळा अशोकाच्या हातात आला.

तेव्हा वराह घाबरून पळत सुटला. अशोकाचे अंग थरथरत होते. डोळ्यापुढे अंधारी आली होती. तेवढ्यात गुरूजींनी अशोकाला सावरले. पुढे काय झाले ते त्याला कळलेच नाही. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा तो मातोश्री सुभद्रांगीनीच्या जवळ होता . ती आपल्या पदराने त्याचा घाम पुसत होती. ती सुभद्रांगी मातेच्या काळजात चर्र झाले म्हणाली, ” अरे ! अशा प्राण्यापुढे दुरून शस्त्र चालवावे .

” आईकडे पाहून अशोक फक्त हसला . स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने लहान भावाचा प्राण वाचवला. म्हणजेच अशोक शक्तीमान, धैर्यवान व साहसी होता हे या गोष्टीवरून दिसून येते. तेव्हापासून बिंदूसार, सुसीमची आई व सुसीम थोडेसे घाबरून असत. अशोक इतर भावंडापेक्षा अगदी वेगळा आहे याची त्यांना खात्री झाली. आणि या विचाराने त्यांचे मन खजिल होई.

असाच एक प्रसंग घडला. अशोक लहान असताना एकदा बिंदूसार त्याला म्हणाले होते, “ कुमार , तू महासेनापती होणार. तसे तुझ्यात अनेक गुण दिसतात. ” तेव्हा अशोक लगेच म्हणाला होता, “ नाही , मी महासेनापती होणार नाही. मी या मगध साम्राज्याचा सम्राट होणार आहे तुमच्यासारखा.” अशोकाला वाटलं पिताश्री आता आपलं कौतुक करतील. जवळ घेतील . पण घडले ते वेगळेच. महाराज बिंदूसार एकदम मोठ्याने ओरडले. “तुला राजसिंहासन कसे मिळणार? सिंहासनावर बसण्याचा मान हा सर्वात मोठ्या मुलाचाच असतो. ” अशोकाचे मन खजील झाले. सुसीमदादा हा तर नाचगाण्यात दंग असतो. त्याला शौर्य गाजवण्यापेक्षा नृत्य करण्यातच आवड होती. तरीदेखील कोठे संधी मिळाली की तो अशोकाचा अपमान करायचा. त्याला हिणवायचा. त्याला अपमानीत करायचा. कधी कधी अशोक या अपमानाने अस्वस्थ व्हायचा तर कधी पेटून उठायचा .

स्वतःचा अपमान एखादे वेळी तो सहन करील पण आईबद्दल कोणी अपमानयुक्त बोलले तर मग मात्र त्याची खैर नसे. अनेक वेळा राधागुप्त अशोकाची समजूत घालून शांत करण्याचा प्रयत्न करायवे. त्यांना मनातून सगळ्या गोष्टी पटायच्या, अशोकाचं वागणं योग्य आहे असे वाटायचे पण असे असूनही वेळ योग्य नाही हे ते जाणून होते. मी सम्राट का नाही ? माझा वेळोवेळी अवमान का ? माझ्या मातोश्रीचा अवमान आम्ही का सहन करायचा ? असे अनेक प्रश्न अशोकाच्या मनात येत असत. मन खजील होत असे. कधी कधी पेटून उठत असे.

क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading