प्रजापिता सम्राट अशोक(भाग १).

प्रजापिता सम्राट अशोक

भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात कितीतरी थोर व महान राजेमहाराजे होऊन गेले. अनेकांच्या पराक्रमाचा इतिहास आपण इतिहासाच्या पाना पानावर वाचला असेल. अनेक शूर , मुत्सद्दी व पराक्रमांनी इतिहासाची पाने व्यापून टाकली आहेत . अनेकांना अनेक पदव्याही बहाल करण्यात आल्या असतील . परंतु यातील किती राजांनी जनकल्याणाची कामे केली?

मानवाच्या हितासाठी, सुखासाठी सामान्य मानवाला न्याय देण्याचे काम कोणी किती केले? या राजेमहाराजांची मोजमापे करायची म्हटली तर अशोकाचा अग्रक्रम लागेल. ज्याची श्रेष्ठता फार थोर ठरेल, लोकहिताची प्रामाणिक इच्छा व तळमळ व त्यासाठी केलेले अविश्रांत परिश्रम याच्याबाबतीत अशोकाशी तुलना ( बरोबरी ) करणे अवघड काम आहे. आजवरच्या सर्व राजे – महाराजांनी युद्धाचे धोरण कायम ठेवले , परंतु अशोकाने शेवटचे कलिंग युद्ध केले आणि आपले धोरण बदलून टाकले. जगाला प्रेम, शांती, अहिंसा व करूणेचा संदेश आपल्या कर्तव्यातून दिला . असा हा महान राजा अशोक तलवारीच्या जोरावर नव्हे तर दया, प्रेम या भावनेतून लोकांना जिंकण्यात यशस्वी झाला .

https://bit.ly/bspmycityshrigonda

त्याने मानवी इतिहासाला नवे प्रवाही वळण दिले . एक नवीन जीवन प्रवाह सुरू केला . सुप्रसिद्ध इतिहासकार एच.जी. वेल्स हे आपल्या ‘ इतिहासाची रूपरेषा ‘ ह्या ग्रंथात म्हणतात , ” इतिहासाच्या रकान्यातून गर्दी करून सोडणाऱ्या ह्या शेकडो राजेमहाराजांच्या नावात अशोकाचे एकमेव नाव ता – याप्रमाणे चमकत असलेले दिसते. होल्गा नदीतून थेट जपानपर्यंत ह्यांच्या नावाबद्दल आदर आहे . चीन , तिबेट , भारत या देशात अशोकाच्या मोठेपणाची स्मृती अजून कायम आहे . ” डॉ . आर. सी. मुझुमदार म्हणतात, “सम्राट अशोक म्हणजे भारतवर्षाच्या इतिहासातील दिवसेंदिवस तेज वाढत असलेला महान तेजस्वी तारा आहे. अशोकाच्या ह्या अमर कीर्तीचे रहस्य आहे . मानवप्राणी , पक्षी व धरतीवरील अमर प्रेम . ” सम्राट अशोकाची जीवनकथा ही भारतवर्षाच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे .

हा कायम तेवणारा एक धम्मदीप आहे. पृथ्वीवरील मानवाचा मान विंदू आहे. हे कोणीही विसरणार नाही. अशोकाचे स्तंभलेख, शिलालेख यातील मौलिक विचारधन आज सर्व मानवजातीला दीपस्तंभाप्रमाणे जीवनात उपयोगी पडेल. अशोकाचे संदेश म्हणजे मानवी विकासाची प्रकाशवाट आहे. गंगा आणि सोन नदीच्या संगमावर मगधची राजधानी. राजगृहाच्याजवळ पाटलीपुत्र नावाचे एक गाव होते. याचा इतिहास पाहिला तर हे गाव वसवण्यास बिंबीसाराचा मुलगा अजातशत्रू याने या गावाचा ( नगराचा ) पाया घातला .

त्याचा मुलगा उदईकभद्रयाने पाटलीपुत्राचे विशाल आणि सौंदर्यपूर्ण बांधकाम करून रामगृहऐवजी पाटलीपुत्र नगर ही राजधानी बनविली . यामुळे पाटलीपुत्राचा निर्माता (संस्थापक) म्हणून उदईकभद्र मानला जातो . त्यावेळी अंग , मगध , काशी, कुरू, पांचाल असे जनपद राज्य होते. त्यात मगधाची राजधानी म्हणून पाटलीपुत्रची ख्याती होती. यालाच आजच्या बिहार राज्यात पटणा नावाने ओळखले जाते. याला पाटलीपुत्र म्हणण्याचे कारण की , ज्या ठिकाणी हे नगर वसवण्यात आले तेथे पाटली नावाचे वृक्ष होते .

त्याची सुंदर लाल फुले मनाला मोहित करत होती. त्या पाटलीवृक्षावरून पाटलीपुत्र म्हणत असत . आणि त्या सुकुमार व सुंदर फुलांमुळे पाटलीपुत्रला पुष्पपूर असेही म्हटले जाते. मगधची पहिली राजधानी गिरीव्रज होती . नंतर राजगृह आणि त्यानंतर पाटलीपुत्र बनली . बौद्धकाळात सोळा जनपद राज्ये होती . त्यापैकी चौदा राज्ये ही मगधराज्याच्या अधिपत्याखाली होती . पुढे मगध हे राज्य सम्राट चंद्रगुप्ताच्या अधिपत्याखाली आले . चंद्रगुप्तचा नातू अशोक . अशोकाच्या वडिलांचे नाव बिंदूसार . हा पराक्रमी राजा होता . राजाला त्यावेळी अनेक स्त्रियांशी लग्न करता येत असे . त्याला अनेक बायका होत्या . अनेक ठिकाणी १६ बायका आणि १०० पुत्र असल्याचे लिहिले गेले आहे . त्यापैकी सुभद्रांगी ही चंपानगरीची .

चंपानगरीत एक गरीब ब्राह्मण राहत होता . त्याची ती मुलगी . ती दिसायला फारच सुंदर होती म्हणून तिला सुभद्रांगी जनकल्याणी असे म्हणत . त्यावेळी तिचे भविष्य सांगणा – याने असे सांगितले की , ही राजाची राणी होईल आणि हिचा एक पुत्र सम्राट बनेल आणि दुसरा भिक्खू बनेल. हे ऐकून तिच्या आई वडिलांना खूप आनंद झाला . लग्नाचे वय होताच तिला सुंदर वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजवले. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. तिचे वडील तिला पाटलीपुत्रच्या दरबारात तिचे नशीब आजमावण्यासाठी घेऊन आले. राजगृहात आल्यानंतर तिचे सौंदर्य पाहून दुस – या राण्या तिचा मत्सर करू लागल्या तिला हलके नापीताचे ( नाईन ) काम देण्यात आले . तिला दिलेले काम ती मन लावून व प्रेमाने करीत असे. राण्यांचे केस करणे , नखे काढणे , तेल लावून मालीश करणे , उटणी लावून आंघोळ घालणे ही कामे ती आनंदाने करायची. पण पट्टमहिषी म्हणजे सुसीमची आई नेहमी तिचा अपमान करीत असे . तिच्या आई – बाबांच्या गरिबीबद्दल हिणवत असे, तेव्हा ती मनातून दुःखी व्हायची पण ते दुःख कोणापुढेही व्यक्त करीत नसे . ती खूपच सहनशील होती.आपले काम मनलावून प्रामाणिकपणे करीत असे . एके दिवशी राजाने विचारले , ” हे काम तुला कोणी शिकविले .

” तेव्हा ती म्हणाली , ” अंत पुरातील स्त्रियांनी . ” खरोखर ती दिसायला शुक्राची चांदणी होती . बिंदूसार तिच्या सौंदर्यावर भाळला आणि एके दिवशी सुभद्रांगीशी मोठ्या थाटात विवाह करून त्याने तिला आपली राणी बनविले . आता सुभद्रांगी खुषीत होती . बिंदूसारची तिच्यावर खूपच मर्जी होती . परंतु पट्टमहिषी म्हणजे सुसीमची आई अधूनमधून तिला टाकून बोलायची , अपमानीत करायची . परंतु बिंदूसारची मर्जी असल्यामुळे इतरांच्या बोलण्याकडे ती लक्ष देत नव्हती . पुढे इ . स . पूर्वी ३०४ मध्ये सुभद्रांगीच्या पोटी पुत्ररत्न जन्मास आले . ते म्हणजे सम्राट अशोक होय . अशोकाच्या जन्मामुळे सुभद्रांगी आता फारच आनंदात होती मुलांच्या सहवासात ती सुखावली होती . अशोक दिसामासी वाढत होता . त्याला आता चांगल कळायला लागलं होतं.

क्रमशः
स्रोत:(प्रजापिता सम्राट अशोक, या श्रीनिवास भालेराव यांच्या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading