राज्यव्यवस्था
अशोकाचे साम्राज्य विशाल होते. वायव्येस अफगाणिस्थानच्या सीमेपासून ते आग्नेयेस ओरिसा व उत्तरेस हिमालयापासून दक्षिणेस म्हैसूरपर्यंत पसरलेले होते. याची राजधानी पाटलीपुत्र होती. येथून सर्व राज्यकारभाराची सूत्रे हलत. पाटलीपुत्रला अनेक नावाने ओळखले जाते. पुष्पपूर, पुष्पालय, पाटलीग्राम. अशोकाने छोट्या छोट्या ग्रामांपासून मोठ्या नगरापर्यंत राज्याची व्यवस्था उत्तम ठेवली होती. अशोक हा साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ अधिपती होता.

राजधानी पाटलीपुत्र येथून सर्व साम्राज्याची सूत्रे अशोकाच्या अधिकारात चालत होता. कायदेकारी, कार्यकारी व न्याय ह्या प्रशासनाच्या तिन्ही शाखांचा तो प्रमुख असे. विधीनियम बनविणे, अंमलबजावणी करणे , नियमांचा भंग करणा – यास शासन करणे , सर्वोच्च सत्ता अशोकाच्या हातात होती . तरी पण स्थानिक चालीरीती व धर्मनियम वगैरेचे बंधन सम्राट सहसा तोडत नसे . परंतु ‘ बहुजन हिताय , बहुजन सुखाय ‘ यामुळे विश्वशांती व विश्वकल्याण होईल याची त्यांना खात्री होती . राज्यरक्षणासाठी सैन्य सहा विभागात विभागले होते . १ ) नौसेना २ ) साहित्य , अन्नधान्य , जनावरांची वैरण ( चारा ) , घोड्यांना शिक्षण देणे ३ ) पायदळ ४ ) अश्वसेना ५ ) रथसेना ६ ) हत्तीसेना . प्रत्येक विभागावर एक प्रमुख नेमलेले असते . सैनिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चिकित्सा विभाग होता . यामध्ये सेवा करण्यासाठी स्त्रियांची नियुक्ती केली जात असे . त्यात जे सैन्य दल होते . त्याचेही भाग करण्यात आले होते .
१) मैलसेना – ही राज्याची निजी सेना होती . २) भूतकसेना – ही भाड्याने ठेवलेली सेना . ३) श्रेणीसेना – जन्मजात सैनिकांचा धंदा असलेली . ४) मित्रबल – मित्रराष्ट्राची सेना , मित्रबल म्हणजे शत्रूच्या राज्यात भरती केलेले सैन्यशक्ती . ५) अटवीबल – जंगली प्रदेशातील आदिवासी लोकांची सेना . एका तुकडीत २०० पायदळ, १० हत्ती , १० रथ , ५० अश्वरोही. यावर एक प्रमुख. अशा १० विभागावर एक सेनापती, १० सेनापतींच्या वर एक नायक , सैनिकांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी चिलखत होते . हत्ती , घोडे , रथ सजवून रणवाद्यांच्या रणभेदीने युद्धाला सुरुवात होत असे . गुप्तचर विभागात स्त्रयांचा भरणा मोठ्या प्रमाणावर असे .
शत्रूच्या गोटात शिरून माहिती कळवण्याचे काम त्या उत्तम प्रकारे करत. अशोकाने राज्यव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपल्या राज्याचे एकूण सहा विभागात विभागणी केली होती. १) मूळ विभाग – मगध , आसपासचा भाग पाटलीपुत्र राजधानी. २) मध्य विभाग – आजचा मध्यप्रदेश , राजपुताना हे होय . त्याची राजधानी उज्जैन . ३) वायव्य विभाग – सरहद्द प्रांत काबूल , कंदाहार , बलुचिस्तान , सिंध व पंजाब हा भाग राजधानी , तक्षशिला . ४) पूर्वविभाग – कलिंग व शेजारचा प्रदेश . राजधानी तोसला . ५) पश्चिम विभाग – कच्छ, सौराष्ट्र , गुजरात हा भाग . राजधानी गिरनार . ६) दक्षिण विभआग – म्हैसूर , आंध्रप्रदेश . राजधानी सुवर्णगिरी . प्रत्येक विभागाला प्रमुख प्रादेशिक म्हणत असत . प्रांताचे विभाजन जिल्ह्यात आणि जिल्ह्याचे विभाजन तालुका , नंतर गाव अशा लहान भागात होते . सरकारी अधिकाऱ्यांवर अशोकाची करडी नजर होती. अधिकाऱ्यांची ३ ते ५ वर्षांनी बदली करण्यात येत असे. महामात्र हे दर ५ वर्षांनी राज्यात सर्वत्र फिरून प्रजेची चौकशी करत असत . लग्नाच्या बाबतीत अशोकाने वयाची अट मुलीचे वय १२ वर्षे आणि मुलाचे वय १६ वर्षे असावे असा नियम केला होता.
अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता तरी राज्यकारभारावर त्याची पकड भक्कम होती. त्याने राज्यव्यवस्थेकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. या आपल्या विशाल साम्राज्यावर उत्कृष्ट पद्धतीने राज्यकारभार केला. एवढ्या विशाल साम्राजावरवर शस्त्र हातात न धरता आपल्या कार्यपद्धतीने एक उत्तम इतिहास घडवला. या अगोदर असा सम्राट झाला नाही आणि पुढेही होईल की नाही हे काळच ठरवेल . प्रजेवर कोठेही अन्याय होणार नाही याची तो दक्षता घेई. अशोकाच्या सैन्यात कपात करूनही कोठे शत्रूने डोके वर काढले नाही , संरक्षणाची भीती पण उरली नाही . ज्याचे अंतःकरण आकाशाएवढे विशाल त्याच्या राज्याची प्रजा सुखी आणि खुशाल होती.
अशोकांनी आपल्या सद्वर्तनाने अनेक शबूंना मित्र बनविले. सदैव मैत्रीचा हात पुढे केला. त्यामुळे बंधुभावाची भावना निर्माण झाली. प्रजेचा सर्वागीण विकास व्हावा हाच अशोकाचा प्रामाणिक हेतू होता . प्रत्येक गोष्टीत त्याचे बारीक लक्ष असे. परंतु कोणाच्याही अधिकारात तो डोकावत नसे. परंतु कोणावरही अन्याय झाला तर तेही खपवून घेत नसत. राज्यातील अधिकारीवर्ग हा कार्यक्षम, प्रामाणिक व प्रजाहितदक्ष असावा यावर त्यांचा कटाक्ष असे. अशोकाचा कारभार महामंत्री परिषदेच्या मदतीने चालत असे. अशोकाशी सर्व धर्मातील लोक आदराने वागत असत. तो इतर धर्माच्या लोकांनाही आपल्या बरोबरीचे स्थान देत असे. त्याने कधीही भेदभाव केला नाही .
इतर धर्मांच्या व व्यक्तींच्या विकासात कोठे कोठे अडथळा निर्माण झाला नाही. उलट सहकार्यच केले. एक आदर्श सम्राट, एक आदर्श धम्मदीप, जिथे संघर्षाला थारा नाही, हिंसेचा वाराही नाही अशी उत्तम आदर्श राज्यव्यवस्था उभारण्याची धडपड, जिद्द उराशी बाळगून प्रामाणिक प्रयत्न करून, पडतील ते कष्ट झेलून मानवकल्याणाची राज्यव्यवस्था अशोकाने निर्माण केली . अशोकाच्या राज्यात कडक शिस्त होती. नियम मोडणाऱ्यांना शिक्षा केली जात होती. दंड केला जात असे . कारण त्यांनी आपल्या कर्तव्यात कोठेही कसूर करू नये. नियमांचे पालन करावे, कोणतेही काम विश्वासाने व निर्भयपूर्वक झाले पाहिजे असा अशोकाचा दंडक होता . पाटलीपुत्रमध्ये एक खास नगरसभा होती . तिचे एकूण नऊ विभागात काम चालत असे .
१) निरनिराळे जे शिल्प होते त्यांची देखभाल करणे, मजुरांचे काम आणि त्यांचे दर ठरविण्याचे काम पहिली समिती पाहत असे . २) परदेशातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे, राजदूत यांची व्यवस्था करणे आणि त्यावर कडक नजर ठेवणे. ३) जनगणना करणे. जन्ममृत्यूची नोंद करणे. ४) खरेदी – विक्रीचे नियम तयार करणे , वस्तूंचे भाव कमी – जास्त ठरवून देणे . ५) धान्य किंवा इतर वस्तूंमध्ये भेसळ होत नाही ना , जुना माल व नवीन मालाची भेसळ कोण करून ते विकत नाही ना यावर नजर ठेवत असे ६) विक्रीकर समिती – विकलेल्या मालावर कर लावून १० वा भाग पाटलीपुत्रच्या नगरसभेकडे जमा केले जात असे . ७ ) सार्वजनिक इमारती , विहारे , मंदिरे यांची देखभाल करणे , याशिवाय बाजार , पूजास्थानावर नियंत्रण ठेवणे. ८) अशोकाचे केंद्रीय मंत्रीमंडळ होते .
त्यामार्फत प्रत्येक भागाचे कामकाज पाहिले जात असे . न्यायव्यवस्था होती . छोट्यात छोट्या गावी न्याय देण्यासाठी ग्रामसंघ ही संस्था काम करीत असे . पाटलीपुत्रमध्ये धम्मस्थीय ( दिवाणी ) , कंटकशोध ( फौजदारी ) अशी न्यायालये होती . सर्व न्यायाधिशांच्या सहकार्याने अंतिम निर्णय दिला जात असे.शेतक – यांना पिकावर चौथा हिस्सा कर भरावा लागत असे . येणा – या मालावरही कर द्यावा लागत असे . सोने , चांदी , हिरे , माणिक , मोती आणि मीठ , खनिज संपत्ती राज्याची संपत्तीमानली जात असे. निरनिराळ्या व्यवसायावरही कर भरावा लागत असे . सर्वात जास्त वेतन ४००० पना आणि कमीत कमी ५ पना पगार दिला जात असे . व्यापा – यांना १५ टक्के व्याजाने कर्ज देण्याची व्यवस्था होती. श्रीलंका, म्यानमार (ब्रह्मदेश), मलाया , बेबीलोन यांच्याशी जलमार्गाने व्यापार चालत असे . भडोच, सुपारा, कल्याण, नीलकंठ, कावेरीपट्टम, मच्छलीपट्टम ही बंदरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती . राज्यातील मोठमोठी शहरे रस्त्याने जोडण्यात आली होती.
प्रजेच्या अडचणी सोडवण्यासाठी सम्राट अशोक नेहमी तयार असे . तो म्हणतो , “ मी असे ठरविले आहे की , जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी मला केव्हाही , कोठेही बोलवावे अथवा भेटावे , मग मी बागेत विहार करीत असेन , भोजन करीत असेन , अन्तःपुरात असो किंवा झोपलेला असो , प्रजेला मला केव्हाही भेटता येईल.. प्रत्येक व्यक्तीला आपले सुखदुःख माझ्याजवळ मांडण्यास परवानगी आहे. ” एवढा मोठा सम्राट पण सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचला ही साधी गोष्ट नाही . असे असले तरीदेखील आक्रमक, शत्रू, गुन्हेगार, समाजद्रोही व राष्ट्रद्रोही यांना कठोर शासन अथवा मृत्युदंड देण्यास कचरत नसे . त्यामुळे व्यवहार आणि आदर्श कल्पना यांचा योग्य संयोग अशोकाने आपल्या शासनव्यवस्थेत साधल होता. पुढे मात्र मृत्युदंडाच्या शिक्षेत बदल करण्यात आला . धम्मदीप अशोकाच्या मनात जनतेविषयी अपार प्रेम होते . तो म्हणत असे , मी जनतेचा सेवक , माझ्या जनतेचेजीवन सुख आणि शांतीच्या मार्गावरून चालत जाऊन समृद्ध बनावे . हीच त्याची प्रामाणिक इच्छा होती.
क्रमशः..
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)
