महापुरुषांचे विचार घरा-घरात पोहोचणे गरजेचे..:शिवश्री अरविंद कापसे..

दिनांक १३ जानेवारी, श्रीगोंदा:

जिजाऊंच्या जयंती निमित्त काल दिनांक १२ जानेवारी रोजी संध्याकाळी श्रीगोंद्यातील शिंदे वस्ती येथे प्रबोधन व्याख्यान, कोरोना कालखंडात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मानासह नाना शिंदे यांच्या आई – वडिलांचा अभिष्टचिंतन व कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अरविंद कापसे यांनी आपले विचार व्यक्त केले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

त्यांनी महापुरुष आणि महामातांचा वैचारिक वारसा व त्या कालखंडात केलेल्या कार्याचा आढावा घेत, या विचारांची आधुनिक पिढीला गरज असल्याचे नमूद केले. तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीत मानव मुक्तीच्या चळवळीचे आंदोलन उभा करणाऱ्या जिजाऊ, सावित्री, रमाई, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत गाडगे महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब, अण्णाभाऊ साठे आणि सर्वच पुरोगामी विचारांच्या तसेच वंचित, पीडित, शोषित, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या न्याय – हक्कासाठी लढणाऱ्या महापुरुषांचा शिवश्री अरविंद कापसे यांनी त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून ऐतिहासिक आढावा घेतला. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून सामान्य माणसाला अश्लील आणि कौटुंबिक वादांमध्ये अडकवण्याचे काम केले जात असून, महापुरुषांचा जागर करणाऱ्या दूरदर्शन वरील सावित्री ज्योती सारख्या मालिकेला टीआरपी मिळाला नाही म्हणून, बंद होणे. खेदाची गोष्ट असल्याचे त्यांनी यावेळी विशेष नमूद केले. अतिशय सामान्य परिस्थितीत महापुरुषांनी केलेल्या आंदोलनासह संघर्षाची मालिका कापसे यांनी कार्यक्रमात मांडली. पुढीच्या पिढीला घडवण्यासाठी आजची स्त्री ही संस्काराच्या केंद्रस्थानी असल्याने तिने जिजाऊ, सावित्री, रमाईच्या विचारांची कास धरून, योग्य मार्गक्रमण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तर, पत्रकारांमार्फत महामातांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर नाना शिंदे यांच्या आई – वडिलांचा केक कापून मुलांच्या हस्ते माल्यार्पण करीत अभिष्टचिंतन व कृतज्ञता सोहळा साजरा करण्यात आला. त्याचबरोबर पत्रकार बाळासाहेब काकडे, राजेंद्र राऊत, नितीन रोही व दत्ता जगताप यांचा पत्रकार दिनाचे औचित्य साधत महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचा आसूड (पुस्तक), शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी Ad. प्रशांत गोरे, मुकुंद सोनटक्के, मीनलताई भिंताडे, प्रेरणाताई धेंडे, बोडके सर, आनंदकर सर, नानासाहेब सोनवणे, नानासाहेब कोथिंबिरे, आबा कोथिंबिरे, नेमीचंद कोथिंबीरे सह नाना शिंदे यांच्या परिवारातील सदस्य व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथे लहान मुलींनी भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचे वाचन करून, जिजाऊ मातेवर भाषण सादर केले. पत्रकार बांधवांपैकी बाळासाहेब काकडे, दत्ता जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतः नानासाहेब शिंदे यांनी केले. तर, उपस्थितांचे बोडके सर यांनी आभार मानले.

स्त्रोत: (आयोजित कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading