दिनांक ९ जुलै,श्रीगोंदा:
आयकॉन्स फौंडेशन, बहुजन क्रांती मोर्चा व अखिल भारतीय राष्ट्रसेवा ब्रिगेड यांच्या वतीने श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांना राजगृहवर जो हल्ला झाला,त्या हल्ल्यातील आरोपींना त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी म्हणून निवेदन देण्यात आले.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर ७ जुलै २०२० रोजी संध्याकाळी ५:३० च्या सुमारास अज्ञात मातेफिरु व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच, घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी,पुरोगामी बहुजन वादी जनता येथे दररोज भेटीला येत असते.समस्त आंबेडकरी अनुयायांबरोबर बहुजन वादी पुरोगामी जनतेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे.
आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. राजगृह म्हणजे आंबेडकरी जनतेचे काळीज,हा हल्ला अर्थात आंबेडकरी जनतेच्या अस्मितेवर, अस्तित्वावरचा हल्ला आहे.
आज श्रीगोंदयात या भ्याड हल्ल्याचा समस्त पुरोगामी, आंबेडकरी बहुजन समाज्याकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.तसेच निवेदनाद्वारे १.आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी, २.राजगृहास संरक्षण द्यावे, ३.आंबेडकर परिवाराला संरक्षण द्यावे, ४.हा हल्ला म्हणजे आंबेडकरी समाजामध्ये असंतोष निर्माण करून कोरोनाच्या काळात सामाजिक अशांतता पसरवण्यासाठी केला आहे का? त्या दृष्टीने तपास करून याचे मास्टर माईंड शोधन्याची मागणी करण्यात आली.
यावेळी नितीन घोडके (अध्यक्ष आयकॉन्स फौंडेशन), प्रकाश घोडके (ग्रा. सदस्य), झगडे सचिन (भारतीय पिछडा वर्ग मोर्चा), शकिलभाई शेख (जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक विकास परिषद), विजय गायकवाड (बहुजन क्रांती मोर्चा), सुरज घोडके (बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क), राजू भोसले, अक्षय शिंदे, अक्षय झगडे, (बोधाचार्य आनंद घोडके), दिनेश म्हस्के, अक्षय ससाणे लहुजी क्रांती मोर्चा आदी मान्यवर उपस्थित होते.
(स्रोत:नितीन घोडके, सर यांनी दिलेले नमूद निवेदन व मिळालेली माहिती)
