दिनांक २९ ऑगस्ट २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील इनामगाव-वांगदरी-ढोकराई रस्ता कामाच्या उद्घाटनावरून स्थानिक राजकारण तापले आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संदिप नागवडे यांनी राजेंद्र नागवडे यांच्यावर तीव्र टीका करताना म्हटले की, “स्वतःच्या गावच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी न आणू शकणारे राजेंद्र नागवडे यांनी अजितदादांना कुठलीही कल्पना न देता, सरकारी कार्यक्रम नसताना व प्रोटोकॉल पाळल्याशिवाय अपूर्ण रस्त्याचे उद्घाटन करवून घेणे हा केविलवाणा व हास्यास्पद प्रयत्न आहे.”

संदिप नागवडे यांनी सांगितले की, माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी फडणवीस साहेब तसेच तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याने २०२३-२४ मध्ये विशेष रस्ता दुरुस्ती (SR) योजनेतून या रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला असून त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत.

त्यांनी आरोप केला की, अजित दादा महायुतीचे घटक असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींना कोणत्याही प्रकारची सूचना न देता, शासकीय पत्रिकेत नसताना उद्घाटन करणे हा प्रोटोकॉलचा भंग आहे. अपूर्ण रस्त्याचे उद्घाटन करण्यामागे “स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्याचा” राजेंद्र नागवडे यांचा प्रयत्न आहे.

👉 संदिप नागवडे यांनी या प्रकरणाचा जाहीर निषेध नोंदवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. तसेच, “जर निधी खरोखर त्यांनीच आणला असेल तर अपूर्ण कामाचे उद्घाटन करण्याची एवढी घाई का?” असा सवाल उपस्थित केला.

यासोबतच विद्यमान आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी पत्रकार परिषदेतून या विषयावर खुलासा करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
