दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ (अहिल्यानगर):
पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील शेतकरी माणिक काळे यांच्या घराजवळील शेतामध्ये वाळत घातलेली २० क्विंटल तूर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास करत तीन आरोपींना अटक करून चोरीस गेलेला तूर आणि एक मालवाहू टेम्पो असा एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

माणिक काळे यांनी त्यांच्या शेतात वाळत घातलेल्या तुरीची चोरी १ फेब्रुवारी रोजी झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके यांना गोपनीय माहिती मिळाली की, हा गुन्हा अनिल गोलवड व त्याच्या साथीदारांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथे सापळा रचून अनिल गोलवड (वय ४५, रा. कामठी, ता. श्रीगोंदा), संतोष चौरे (वय ४२, रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा), जालिंदर गोलवड (वय २५, रा. कामठी, ता. श्रीगोंदा) या आरोपींना अटक केली.

तपासात आरोपींनी चोरी केलेली तूर मिरजगाव (ता. कर्जत) येथील आडते व्यापारी अशोक सुपेकर यांना स्वतःची म्हणून विकल्याची कबुली दिली. तर या प्रकरणातील संजय गोलवड, संतोष गोलवड (दोघे रा. कामठी, ता. श्रीगोंदा), राहुल पवार आणि लहू पवार (दोघे रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर) हे आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संतोष खैरे, सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे, मेघराज कोल्हे व महादेव भांड यांच्या पथकाने केली. ताब्यातील आरोपींना पुढील तपासासाठी सुपा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
