दिनांक ६ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्याचे ग्रामदैवत आणि सर्वधर्मांचे श्रद्धास्थान असलेल्या संत शेख महंमद बाबा यांच्या उरूस यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या यात्रेत दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीने गावाला उत्साहाचे आणि श्रद्धेचे स्वरूप प्राप्त होते. मात्र या मंगल यात्रेमध्ये काही दलाल आणि मध्यस्थ लोक आर्थिक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

उरूस यात्रेनिमित्त श्रीगोंद्यात विविध पाळणे, मनोरंजन खेळ आणि लहानमोठी दुकाने येतात. परंतु काही संधीसाधू दलाल आणि मध्यस्थ या व्यवसायांवर बेकायदेशीर हक्क दाखवत तिकीट दरांमध्ये मनमानी वाढ करून व्यापाऱ्यांकडून अवाजवी जागा भाडे वसूल करत असल्याचे दिसून आले आहे.
पालिकेच्या जागेवर अनधिकृत कब्जा दाखवून हे दलाल दुकानदार आणि लहान व्यावसायिकांना त्रास देत आहेत. विशेषतः महात्मा फुले उद्यानाजवळील जागेवर हे प्रकार अधिक प्रमाणात घडत आहेत. सामान्य यात्रेकरू, छोटे दुकानदार आणि स्थानिक व्यावसायिक यांना या दलालीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

या अव्यवस्थित कारभारामुळे श्रीगोंदा नगरपालिकेलाही आर्थिक फटका बसत आहे. जागेच्या भाड्यापासून मिळणारा महसूल नगरपालिकेऐवजी दलालांच्या खिशात जात आहे. परिणामी शासकीय तिजोरीत जमा होणारा कर कमी होत असून जनतेच्या विकासकामांवर याचा परिणाम होत आहे.

श्रीगोंदा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी भगत मॅडम यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की, या जागांचे निलामी पद्धतीने वाटप करून महसूल थेट नगरपालिकेच्या तिजोरीत जमा व्हावा. तसेच दलालांना थेट इशारा देऊन सामान्य व्यावसायिकांना योग्य दरात जागा उपलब्ध करून द्यावी.
श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक आणि स्थानिक व्यापारी वर्गाने ही समस्या थांबविण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत अशी मागणी केली आहे. यात्रेतील प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या दरात मनोरंजन आणि सेवांचा लाभ मिळावा, हीच महंमद बाबा यांच्यासमोर कृतज्ञतेची खरी भावना असल्याचे भाविकांनी सांगितले.

या वर्षी नगरपालिकेने यावर ठोस निर्णय घेतल्यास यात्रा अधिक आनंददायी ठरेल, असा विश्वास सर्व स्तरांतील लोकांनी व्यक्त केला आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
