अतिवृष्टीमुळे श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भिमा नदी काठावरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा..

दिनांक २५ जुलै २०२४, अहमदनगर:

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना कळविण्यात येते की, आजपर्यंत ३१५.१० मि.मी. सरासरी पर्जन्याच्या ७०.३२% पर्जन्यमान झालेले आहे. दिनांक २५ जुलै २०२४ रोजी सकाळी १०:०० वा. अहमदनगर जिल्हयातून वाहणा-या नद्यांस विसर्ग सुरु आहेत. गोदावरी नदीचा विसर्ग नांदूर मध्यमेश्वर धरणातून ८८०४ क्युसेक आहे. तर, भिमा नदीचा दौंड पुल येथे ४९५९० क्युसेक आहे.

पुणे जिल्हयात दिनांक २४ जुलै २०२४ रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे खडकवासला व इतर धरणांतुन विसर्ग सुरू आहे, त्यामुळे भिमा नदीस दौंड पुल येथे मोठया प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. पुणे व अहमदनगर जिल्हयात पर्जन्यमान सुरु असून दौंड पुल येथे भिमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत बंडगार्डन, पुणे येथे १,०५,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आज दिनांक २५ जुलै २०२४ रोजी रात्री दौंड पुल येथे भिमा नदीचा विसर्गामध्ये वाढ होवून विसर्ग १,००,००० ते १,५०,००० क्युसेक होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भिमा नदीकाठावरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

नाशिक जिल्हयातील नांदुर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरु असुन नाशिक व अहमदनगर जिल्हयात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. अहमदनगर जिल्हयातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा या तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्हयातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की, स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणा-या नागरीकांनी तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे.

नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणा-या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे.

घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१/२३२३८४४ व २३५६९४० वर संपर्क साधावा.

स्रोत:(राजेंद्रकुमार पाटील),निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहमदनगर..

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading