दिनांक 8 सप्टेंबर 2022,श्रीगोंदा:
शिक्षकी पेशात सेवाभाव जपत कार्य करणारे काही शिक्षक निवृत्तीनंतरही शिक्षकपण जपत असतात.नियत वयोमानाने ते निवृत्त होतात पण शाळेबददल, विद्यार्थ्यांबद्दलचे प्रेम व आपुलकी त्यांच्या मनात तसूभरही कमी झालेली दिसत नाही. याचाच प्रत्यय शिक्षकदिनी आला. श्रीगोंदा पंचायत समितीचे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव सोमवंशी यांनी शिरसगाव बोडखा येथील देशमुखवस्ती आदर्श शाळेस एनरॉईड एलईडी टीव्ही नुकताच भेट दिला.
माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस यावेळी अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरसगाव सेवा सोसायटीचे चेअरमन भानुदास सोमवंशी होते.
यावेळी बोलताना सोमवंशी म्हणाले की शिक्षकी पेशात इमानदारीने काम केले. वेळेत शाळेत जायचो. अनेक विद्यार्थ्याना कष्टाने घडवले. तेच विद्यार्थी खूप मोठे झाले. त्यामुळे माझे कुटुंबही घडले. माझी मुलेही घडली. माझी तिनही मुले आज उच्चविद्याविभूषित आहेत. शिक्षकाने जर प्रामाणिकपणे काम केले तर त्यांची मुलेही आपोआप घडतात. ईश्वराकडे न्याय असतोच, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक रामदास ठाकर यांनी केले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव सोमवंशी, चंद्रकांत जगताप, अनिलराव सोमवंशी, सौ.नतिशा वाबळे, सुरेखा गलांडे, विठठल गलांडे आदी पालक उपस्थित होते. आभार शाळेचे मा. अध्यक्ष दिलावर सय्यद यांनी मानले.
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)
