दिनांक १० जून,जामखेड:
जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा शहरातील रहिवाशी असलेले रिजवान मौला बागवान यांना पुणे जिल्ह्यातील मानवता हिताय सोशल फाउंडेशनच्या वतीने कोविड योद्धाने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
रिजवान बागवान यांनी लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये पुणे जिल्ह्यातील पंचतारांकित रांजणगाव एमआयडीसी च्या विविध कंपन्यात पोट भरण्यासाठी आलेल्या स्थलांतरित कामगारांना लोकसहभागातून जेवण मिळवून देण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. तसेच, ते कामगारांच्या विविध प्रश्नांवर व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.
त्यांनी अहमदनगर शहरातील वंचित, बेघर, स्थलांतरित भटकंती करून काम करणारे, रस्त्यावर भंगार, रद्दी, पुठ्ठा गोळा करणारे, भिक्षा मागून पोट भरणारे, मनोरुग्ण आदी शेकडो व्यक्तींना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले आहे. त्यांना समाजसेवेची आवड असल्याने त्यांच्या कामाची दखल मानवता हिताय सोशल फाउंडेशन पुणे यांनी घेतली असून, त्यांना कोविड योद्धा ने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी (भटक्या विमुक्तांचे नेते डॉक्टर) अरुण जाधव, (युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष) नाथाभाऊ शेवाळे, (महिला आघाडीच्या) लता पवार, विशाल पवार, गुरुराज पवार, निलेश पानगावकर, रशीद बागवान राजू शेख, अमोल नवले, मोहीन बागवान, फैजान बागवान आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
