दिनांक २६ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा/सोलापूर:
संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय आईसस्टॉक स्पोर्ट्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. २५ ऑगस्ट रोजी कुर्डूवाडी येथील के.एन. भिसे कॉलेजमध्ये झालेल्या या स्पर्धेत संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याने पदके जिंकून सर्वांचे लक्ष वेधले.
ज्युनियर कॅटेगिरीमध्ये शौर्य भुजबळ, ओंकार ननवरे, विराज बरबडे, स्वराज पंडित यांनी कांस्य पदक पटकावले. तर ओम भुजबळ, यश खाकाळ, ओंकार ननवरे, ऋतुराज थिटे यांनी सुवर्ण व रौप्य पदक जिंकले. त्यांच्या या यशामुळे त्यांची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय आईसस्टॉक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आईसस्टॉक हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाद्वारे मान्यताप्राप्त खेळ आहे. हा खेळ ‘खेलो इंडिया’ विंटर गेम्स तसेच ऑल इंडिया पोलिस गेममध्येही समाविष्ट आहे. संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीने या खेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यशस्वी खेळाडूंना अकॅडमीचे मास्टर जयेश आणि सिद्धेश आनंदकर यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल खेळाडूंचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. खासदार निलेशजी लंके, आमदार बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घनश्याम अण्णा शेलार, राजेंद्र दादा नागवडे, माजी आमदार राहुल दादा जगताप, माजी उपनगराध्यक्ष बापुशेठ गोरे, नगराध्यक्ष शुभांगी ताई पोटे, उपनगराध्यक्ष ज्योती ताई खेडकर, महाराष्ट्र राज्य आईसस्टॉक संघटनेचे महेश राठोड, ग्रँडमास्टर संजय आनंदकर यांनी या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या या खेळाडूंनी मिळवलेल्या यशामुळे या अकॅडमीची प्रतिष्ठा आणखी वाढली असून, त्यांच्या पुढील यशासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)





