संत शेख महंमद महाराज पालखी सोहळा: पंढरपूरकडे प्रस्थान..

दिनांक ४ जुलै २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील संत शेख महंमद महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज पंढरपूरकडे मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. ज्ञानोबा माऊली तुकारामा च्या जयघोषात, बँडच्या तालावर, टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर नाचत, भजन करत वारकरी मंडळींनी पंढरपूरकडे मार्गक्रमण केले. “शेख महंमद महाराज की जय” च्या घोषणेने सर्व शहर दुमदुमून गेले होते. हा सोहळा दुसऱ्या वर्षी आयोजित केला जात असून, एकूण दोन हजार भाविकांनी दिंडीत सहभागासाठी नावनोंदणी केली आहे. दिंडी सोहळा समिती तर्फे सर्व भाविकांचे विमा उतरवण्यात आले आहे.

आज सकाळी अकरा वाजता शेख महंमद महाराज मंदिर परिसरातून फुलांनी सजवलेल्या आकर्षक रथातून पालखीचे प्रस्थान झाले. शहरातील व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी पालखीच्या स्वागतासाठी दारात व रस्त्यावर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी या पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

पालखी सोहळ्याच्या सुरुवातीला वारकऱ्यांच्या वेशातील गळ्यात टाळ, कपाळी टिळा लावलेली मुलं, डोक्यावर तुळस घेतलेल्या लहान मुली हे बालवारकरी, त्यांच्या मागे सजवलेला महाराजांचा आश्व व आकर्षक फुलांची सजावट असलेला रथ, रथाच्या मागे विठू रायाचा जयघोष करणाऱ्या महिलांचा मोठा जमाव, आणि रथाच्या पुढे दोन बँड यांमुळे शहर भक्तीमय विठ्ठलमय झाले होते. दिंडीचे दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शहरातील काळकाई चौकात तरुण मुलांनी दिंडीतील वारकऱ्यांसाठी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. अनेक अन्नदात्यांनी नाष्टा व जेवणाचे सहकार्य केले आहे.

शेख महंमद महाराज हे सुफी संत होते. मागच्या वर्षीच या दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सेवा मोफत देण्यात येतात, ज्यात नाष्टा, दोन वेळचे जेवण, राहण्याची सोय तसेच आरोग्य सेवा यांचा समावेश आहे.

स्रोत:(पालखी सोहळा)

जाहिरात.
जाहिरात.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading