दिनांक २१ मे २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील सावतानगर परिसरातील नागरिकांनी बाबुर्डी रोडवरील डिवायडरची दुरवस्था, माती व झाडे अभावी असलेली अस्वच्छता आणि प्रशासनाच्या उदासीनते विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर सावतानगरमधील नागरिकांनी श्रीगोंदा नगरपरिषदेसमोर ९ जून २०२५ पासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला असून, यासंबंधीचे निवेदन मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.

सदर निवेदनात अर्जदार श्री. किरण दत्तात्रय बनसुडे, श्री. मयुर पोपटदादा बनसुडे व अन्य ग्रामस्थांनी नमूद केले आहे की,

शहरातील एकूण १७ मुख्य रस्त्यांपैकी १६ रस्त्यांवरील डिवायडरमध्ये माती टाकून झाडे लावण्यात आलेली आहेत. मात्र, फक्त बाबुर्डी रोडवरील डिवायडरची अवस्था मात्र अजूनही जर्जर स्थितीत असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या डिवायडरमध्ये मोठमोठी काटेरी झुडपे आणि अनावश्यक झाडे उगवून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या भागात अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सदर डिवायडरची दुरुस्ती करून त्यात माती टाकून सुशोभीकरण करणे, झाडे लावणे व रंगकाम करणे गरजेचे आहे. मात्र, या मागणीकडे वेळोवेळी दुर्लक्ष होत असल्याने आता ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

९ जून २०२५ रोजी श्रीगोंदा नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

ही मागणी निवेदनाच्या प्रतीसह मा. तहसिलदार साहेब श्रीगोंदा, मा. पोलीस निरीक्षक साहेब श्रीगोंदा आणि नगरपालिका कार्यालयासही सादर करण्यात आली आहे.

स्रोत:(निवेदन)
