श्रीगोंद्यात खळबळजनक घटना.! घरातून अचानक बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत सापडला; आत्महत्येचा संशय..!

श्रीगोंदा, दि. १३ जून २०२५:

श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातून अचानक बेपत्ता झालेल्या अप्सना जमीर पठाण (वय ३८ वर्षे) या महिलेचा मृतदेह आज दुपारी गाव शिवारातील एका विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असला तरी पोलीस तपास सुरू आहे.

साहील जमीर पठाण (वय १९ वर्षे) या अप्सना पठाण यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबात वडील जमीर दस्तगीर पठाण, आई अप्सना, बहीण व तो स्वतः असे सदस्य असून ते घोडेगाव येथे राहतात. साहील श्रीगोंद्यातील छत्रपती कॉलेजमध्ये बीसीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.

१२ जूनच्या रात्री अडीचच्या सुमारास त्यांची आई अप्सना यांनी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद साहील यांची आजी बेगम शेख यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ‘मनुष्य बेपत्ता’ म्हणून केली होती.

यानंतर आज, १३ जून रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास साहील, त्यांचे चुलते राजू पठाण आणि इतर नातेवाईकांनी शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, संदीप किसन डेबरे यांच्या शेतातील विहिरीत एक तरंगणारा मृतदेह आढळून आला. तो मृतदेह अप्सना पठाण यांचाच असल्याचे ओळखले गेले. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर मृतदेह विहिरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, श्रीगोंदा येथे नेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह ठेवण्यात आला.

घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांमध्येही या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात असून, यामागे काय कारणे आहेत..? याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

श्रीगोंदा पोलीस अधिक तपास करत असून, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

स्रोत:(खबर)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading