दिनांक ६ मार्च २०२६, अहिल्यानगर:
श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे जातीयवादी मानसिकतेतून काम करत असून, त्यांनी ‘कोकणगाव हत्याकांड’ प्रकरणातील आरोपींना आर्थिक तडजोडीतून मदत केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन सविस्तर तक्रार दाखल केली.
कोकणगाव रजपूत खून प्रकरणाच्या तपासात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला आहे. मागासवर्गीय आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांशी बोलताना शिंदे हे अर्वाच्य आणि एकेरी भाषेचा वापर करतात, असा दावा यावेळी करण्यात आला.

या वर्तणुकीमुळे ते आंबेडकरी चळवळीचे विरोधक असल्याचे चित्र निर्माण झाले असून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी होत आहे.
कोकणगाव हत्याकांड प्रकरणातील मुख्य संशयित आणि सह-आरोपींना वाचवण्यासाठी मोठी आर्थिक तडजोड केल्याचा गंभीर आरोप., मागासवर्गीय समाज आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांशी चुकीच्या पद्धतीने आणि द्वेषपूर्ण वागणे., आंदोलकांशी चर्चा करताना अर्वाच्य आणि एकेरी भाषेचा वापर करून चळवळीचा अवमान करणे., गुन्ह्यातील सह-आरोपींना अटक न करता त्यांना पाठीशी घालणे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि समाज कल्याण सह आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने कोकणगाव प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी., सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा., गुन्ह्याचा ‘कट रचणे’ आणि ‘दंगल घडवणे’ या कलमांचा समावेश करावा., पीडित कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे इत्यादी मागण्यांसह

किरण शिंदे यांनी आरोपींसोबत केलेल्या कथित आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी. असे निवेदन सादर करण्यात आले आहे.
यावेळी राहुल चव्हाण, भालचंद्र सावंत, चंदन घोडके, सुनील ओहोळ, संजय रणसिंग, संजय साळवे यांच्यासह पीडित कुटुंबातील सदस्य, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या तक्रारीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे या प्रकरणावर काय भूमिका घेतात आणि किरण शिंदे यांच्यावर काय कारवाई होते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)

