दिनांक ३ मार्च २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत सेशन कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिवाळीच्या वादातून झालेल्या गुन्ह्यात नऊ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित प्रकरणात एकाचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी खून आणि ॲट्रॉसिटीची वाढीव कलमे लावली.
तपासादरम्यान चार आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील मोहम्मद नवाज शेख यांची अटक सेशन कोर्टाने बेकायदेशीर ठरवून तीन दिवसांतच जामीन मंजूर केला. उर्वरित तिघा आरोपींना देखील १ मार्च २०२५ रोजी जामीन देताना कोर्टाने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कोर्टाने स्पष्ट केले की, दोषारोपपत्र दाखल झालेल्या प्रकरणात पुनर्तपास करण्यासाठी पोलिसांनी आधी न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक होते. तसेच, तपासादरम्यान वेळोवेळी अधिकारी बदलल्याने तपास प्रक्रियेत गोंधळ उडाल्याचे कोर्टाने नमूद केले.
या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर अटकेमुळे श्रीगोंदा शहरात संतापाची लाट उसळली होती. हिंदू-मुस्लिम समाजाने एकत्र येऊन पोलिसांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. स्थानिक नागरिक आणि संघटनांनी पालकमंत्री व पोलीस अधीक्षकांना निवेदने देऊन संबंधित दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे.
आरोपींच्या वतीने ॲड. दत्तात्रय झराड, ॲड. सुमित बोरुडे, ॲड. सुमित पाटील व ॲड. अनिकेत भोसले यांनी बाजू मांडली. आता दोषी पोलिसांवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)





जाहिरात…
