लातुर बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट थांबवा..

लातुर बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट थांबवा
(शेतकरी संघटनेचे पणन संचालकांना आवाहन.)

दिनांक १९ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
लातुर येथिल बाजार समितीमध्ये कृषि उतपन्न खरेदी विक्री नियम धाब्यावर बसवुन शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची लूट होत आहे. बाजार समिती व जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी व आंदोलने करुन सुद्धा परिणाम होत नसल्यामुळे राज्य पणन संचालकांना बेजबाबदार अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
लातुर कृषि उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यातील मोठी बाजारपेठ असुन तेथे संपूर्ण मराठवाड्यासह आंध्र प्रदेश व कर्नाटकातील सिमावर्ती भागातुन मोठ्या प्रम‍णात शेतीमाल या बाजार समितीत विक्रीस येतो. सोयाबीन, तुर , हरभरा, तीळ, मका, ज्वारी अशी अनेक धान्य,कड धान्ये या बाजार समितीत शेतकरी विक्रीसाठी घेउन येत असतात.
लातुर बाजार समितीत रोज ५० हजार क्विंटल पेक्षा जास्त माल विक्रीसाठी येतो. कृषि उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६७ कलम १३ नुसार या सर्व मालाची विक्री जाहीर लिलाव करुनच झाली पाहिजे असा नियम आहे. परंतू लातुर बाजार समितीत पाच टक्के मालाचा जाहीर लिलाव होतो व बाकी माल “पोटली” मध्ये खरेदी केला जातो. लिलाव झालेल्या किंमतीपेक्षा ४००/- ते ५००/- रुपये कमी दराने या मालाची खरेदी केली जाते. या द्वारे शेतकऱ्यांचे सुमारे दोन कोटी रुपये रोज लुटले जातात.
काय आहे पोटली
ज्या शेतमालाचे लिलाव होत नाहीत त्या मालाचे नमुने एका गाठोड्यात काढले जातात. याला पोटली म्हणतात. सुमारे ३ ते ४ किलो शेतमाल प्रत्येक शेतकऱ्यांच्या मालातुन काढला जातो. हे नमुने आडत्या मार्फत खरेदीदाराकडे पोहोचवले जातात. या नमुन्यानुसार शेतकऱ्यांच्या परस्पर खरेदीदार मालाची किंमत ठरतो. ही किंमत त्या दिवशी झालेल्या लिलावातील किंमतीपेक्षा ४०० ते ५०० रुपयांनी कमी असते. या पद्धतीला ‘पोटली’ असे संबोधले जाते.
सॅम्पलद्वारे लुट
पोटलीसाठी शेतकऱ्यांच्या मालातुन काढलेला सॅम्पल (नमुने) शेतकऱ्यांना परत केला जात नाही. खरेदीदार तो स्वत:कडेच ठेउन घेतो. एका हंगामात खरेदीदाराकडे ५० ते ७० क्विंटल माल फुकटात जमा होतो.
कडता
बाजार समिती अधिनियमानुसार शेतकऱ्यांच्या मालाचे पुर्ण वजन हिशोबात धरले पाहिजे मात्र लातुर बाजार समितीत ५० किलोच्या गोणी मागे एक किलो माल वजनात जास्त घेतला जातो. म्हणजे प्रती क्विंटल २ किलो माल व्यापारी फुकट घेतो. अशा लुटीतुन व्यापारी दररोज लाखो रुपये जास्त कमवतात.
तक्रारीची दखल घेतली जात नाही
बाजार समितीत सुरु असलेली लूट बंद व्हावी यासाठी लातुर जिल्हा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळा आंदोलने केली. जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी केल्या पण हा प्रकार थांबविण्यासाठी कोणावरही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. प्रशासन व व्यापारी यांच्यात काही साटेलोटे आहे काय अशी शंका शेतकरी व शेतकरी संघटना व्यक्त करत आहे.
वजनकाटे ही शंकास्पद
पणन संचालकांच्या दि १९ मार्च २०११ रोजीच्या परिपत्रकानुसार, बाजार समितीत येनाऱ्या मालाचे मुख्य गेटवरच इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन व्हावे व आडत्याकडेही इलेकट्रॉनिक वजन काट्यावर वजन करणे बंधन कारक आहे. लातुर बाजार समितीने काटे खरेदी केले आहेत मात्र ते धुळ खात पडले आहेत. व्यापाऱ्यांच्या काट्यांचीही तपासणी होते की नाही याची शंका आहे.
बाजार समितीत एकच अप्रशिक्षित ग्रेडर
लातुर सारख्या मोठ्या कृ.उ. बाजार समितीत किमान सहा ते सात ग्रेडर असणे आवश्यक आहे. अलेल्या मालाची तिन प्रतीत प्रतवारी करुन त्याचे दर निश्चित करण्याचे काम ग्रेडरचे असते. सध्या बाजार समितीत असलेले ग्रेडर अप्रशिक्षित असल्यामुळे ते ग्रेडिंनगचे काम करत नाहीत. त्याच्या कडुन इतर कामेच करुन घेतली जातात.
व्यापारीच बाजारसमितीचे अध्यक्ष
लातुर बाजार समितीचे अध्यक्ष शहा हे स्वत: खरेदीदार आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावे खरेदीचा परवाना आहे. ते शेतकरी म्हणुन बाजार समितीत निवडुन आले असले तरी ते खरेदीदार आहेत व ते शेतकऱ्यांपेक्षा खरेदीदारांचे हीत जोपासत आहेत. त्यांच्या संपत्तीची ई.डी.मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकार परिषदेत केली.
व्यापारात सुधारणा न झाल्यास पणन संचालकांना घेराव
लतुर बाजार समितीतील गैरव्यव्हार व शेतकऱ्यांची होणारी लुट, शेतकरी संघटनेने वेळोवेळी जिल्हा उपनिबंधक, पणन संचालक व पणन मंत्र्याना निवेदने पाठवुन लक्षात आणुन दिली आहे. तरी सुद्धा दोषींवर कारवाई होणार नसेल तर राज्याच्या पणन संचालकांना घेराव घालण्याचे आंदोलन करण्यात येइल असा इशारा घनवट यांनी दिला.
दि.१८ फेब्रवारी रोजी पुणे येथिल शेतकरी संघटनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष,अनिल घनवट, प. महाराष्ट्र शे. संघटनेचे अध्यक्ष अनिल चव्हाण, प. महाराष्ट्र महिला अघाडी अध्यक्षा सीमाताई नरोडे, लातुर जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष रुपेश शंके,माजी जिल्हाध्यक्ष माधव कंदे, लातुर जिल्हा उपाध्यक्ष बालाजी जाधव, पुणे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रांजणे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading