शिवचरित्र हे सांकेतिक शब्दांत सांगता येणारी संज्ञा नसून, महाराष्ट्रातील प्रत्येकाला दिशा देणारं दीपस्तंभ आहे.:नवाज शेख…

दिनांक १६ फेब्रुवारी, श्रीगोंदा:

विचार प्रबोधन सप्ताहा“च्या निमित्ताने आयोजित महामानवांच्या जीवन गौरव गाथा व शिव जयंतीच्या अनुषंगाने दिनांक १२ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या या वैचारिक सत्राचा आज पाचवा दिवस. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार केशव कातोरे (सिद्धी क्लासेस बेलवंडी बुु.), कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते नवाज शेख (टाकळीभान, श्रीरामपूर) तर, हभप अण्णाभाऊ खेतमाळीस हे कार्यक्रमाचे उद्घाटक होते. याठिकाणी साहेबराव शिंदे व प्रा.रेश्मा घोडके हे विचारमंचकावर उपस्थित होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून, दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी मुकुंद सोनटक्के यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी या ठिकाणी नमूद केले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी श्रीगोंद्यामध्ये सुफी संत शेख महंमद बाबा यांना गुरु मानत मठा साठी जागा दिली. नमूद ठिकाणी राष्ट्रीय समतेच आणि ऐक्‍याचे प्रतीक असलेल्या शेख महंमद बाबांच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होत असल्याने, हा कार्यक्रम ऐतिहासिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोनटक्के पुढे बोलताना म्हणाले की, चळवळीतील माणूस ज्यावेळेस बोलतो, त्या वेळेस खरं बोललं तर लोकांना बरं वाटत नाही आणि बर बोलला तर लोकांना खरं वाटत नाही. अशा परिस्थितीमध्ये तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा तालुका, जिल्ह्यासह राज्यापर्यंत तन-मन-धनाने गतिमान करणारे ad. संभाजीराव बोरुडे यांच्याबरोबर सर्व स्तरातील लोक आहेत. हा बुवा बापूंचा कार्यक्रम नसून, पुरोगामी चळवळीचा नीती, चारित्र्य आणि संस्कृती जतन करणारा कार्यक्रम आहे. ते पुढे म्हणाले, तत्कालीन परिस्थिती अतिशय भयंकर होती. त्या काळामध्ये ज्ञानार्जनावर बंधन होती. ज्ञान बोलणाऱ्याची जीभ छाटली जायची, ज्ञान ऐकणाऱ्यांची कानात शीशे पागळून ओतले जायचे, ज्ञान पाहणार्‍याचे डोळे काढले जायचे. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून शिकले. त्यांनी जगातल्या मोठमोठया डिग्र्या संपादित केल्या. निवडुंगाच्या झाडा शेजारी झोपडीत जन्मलेल्या अण्णाभाऊने दिड दिवसाची शाळा शिकुन, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियात गाऊन दाखवला. महात्मा फुले यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी मानल. तर, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना गुरुस्थानी मानत या विचारांच्या शृंखला आणि समतावादी, मानवतावादी विचारंबीज समाजामध्ये रुजावेत, या उद्देशाने सदर प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे, आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलतांना मुकुंद सोनटक्के यांनी नमूद केले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

आपल्या प्रमुख भाषणात बोलत असतांना नवाज शेख यांनी महापुरुषांच्या त्यागी, संघर्षवादी आणि समाजवादी विचारांबाबत चर्चा केली. त्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे सह इतर महामानवांच्या जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश झोत टाकला. त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र हे तांत्रिक शब्द प्रयोगामध्ये शब्दबद्ध करणारी सज्ञा नसून, महासागराच्या मध्यावर एखाद्या जहाजाचा मार्ग चुकावा आणि तिला दूरवर एखादा दिपस्तंप दिसावा व त्यांना दिशा मिळावी. अगदी सबंध महाराष्ट्रातील प्रत्येकाला शिवचरित्र हे त्या दीपस्तंभाप्रमाणे वाटते. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला पाच सुलतान सत्ता महाराष्ट्राच्या उरावर थैमान घालतात.. यात अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले होते.. स्त्रियांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात होती.. अशा पारतंत्राच्या वादळामध्ये स्वातंत्र्याची संकल्पना जिजाऊ माँ साहेबांच्या संकल्पनेतून अवतरली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वराज्याचे स्वप्न जिजामातांनी पाहिलेल्या पद्धतीने शिवबावर संस्कार करण्यात आले. संस्कारातून संस्कृती घडते व संस्कृतीतून मानवता टिकते, अशा प्रकारे संस्कार करत असतांना, एकदा घोड्यावर चढण्याचा प्रयत्न करत असणारे बाल शिवाजी वारंवार पडत होते. खिडकीतून पाहत असणाऱ्या जिजाऊं कोणालाही मदतीसाठी पाठवत नव्हत्या. शेवटी आत गेल्यानंतर जिजाऊं ने शिवबाला विचारलं की, लागले तर नाही ना ? यावर रागाने शिवाजींनी आमची काळजी नसल्याचे सांगितले. ज्यावेळेस मदतीची गरज होती, त्यावेळेस तुम्ही लांबून पहात होतात. असे म्हणतात. त्यावेळेस जिजाऊ माँ साहेबांनी त्यांना सांगितले, जमिनीवर पडलेल्या ज्या माणसांना उभा राहण्यासाठी दुसऱ्याचा आधार लागतो. ती मानस स्वतःच्या पायावर कधीच उभा राहू शकत नाहीत. आपल्या भाषणात शेख पुढे सांगतात, त्या कालखंडात होत असलेला संघर्ष हा धर्म संघर्ष नव्हता. तर, सत्ता संघर्ष होता. सर्व धर्माचा सन्मान शिवाजी महाराजांनी केला. कधीही मस्जिदला हात लावला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम मावळे होते. ज्यामध्ये (आरमार प्रमुख) दौलत खान, (तोफखाना प्रमुख) इब्राहीम खान, (पहिला सरसेनापती) नूरखान, शिवाजी महाराजांबरोबर (आग्र्याला गेलेला) मदारी मेहतर, महाराजांचा (वकील) काझी हैदर शिवाजी महाराजांचे एकमेव उपलब्ध असलेला चित्र काढणारा (चित्रकार) मीर मोहम्मद, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी (वाघ नख्या पाठवणारा) रुस्तुमे जमाल इत्यादी मुस्लिम समाजाचे विश्वासू मावळे त्यांच्या सैन्यदलात होते. असे यावेळेस नवाज शेख यांनी विशेष नमूद केले.

लोकशाहीची खरी पाळीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये रोवली होती. या पद्धतीने अतिशय उपयुक्त शब्दात आणि व्यवस्थित मांडणीतून शेख यांनी आपले विचार सर्वांसमोर व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कालखंडातील ऐतिहासिक संदर्भ, ऐतिहासिक दाखले त्यांनी त्यांच्या भाषणातून नमूद केले. शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये स्त्रीची अपप्रतिष्ठा किंवा तिचे चारित्र्यहनन करणाऱ्याला थेट शिक्षा दिली जात होती. मात्र, आत्ता देशभरामध्ये होत असलेल्या स्त्रियांच्या अत्याचाराबाबत बोलतांना नवाज शेख म्हणाले की, यातील आरोपींना शिक्षा मिळते की नाही ? हा मात्र अभ्यासाचा भाग आहे.

यावर त्यांनी एक छोटी कविता सादर केली. एक ७० वर्षाची आजीबाई न्यायालयाच्या दारामध्ये बसली असतांना, तिला विचारणा केली जाते की, तुम्ही इथे काय करता ? त्यावर त्या आजी सांगतात की, सतरा वर्षांची असतांना माझ्यावर बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे, २० वकील, ४० न्यायाधीश, ३२ शिरस्तेदार बदलून गेले, अनेक बलात्कारित स्त्रिया मरून गेल्या, मी एकटीच जिवंत आहे, सतराव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे, थरथरत्या हाताला हात देऊन, त्या आजीला उभा करण्यात आलं, निकाल ऐकण्यासाठी चार भिंतीच्या आत नेलं गेलं, निकाल ऐकताच आजीचे पाय लटपटू लागले, कारण काही निम्मे गुन्हेगार पुराव्याअभावी निसटून गेले आणि ज्यांना झाली होती फाशीची शिक्षा ते तर, केंव्हाच मरून गेले, सत्तर वर्षाच्या आयुष्याचा हा निकाल आहे आणि सतराव्या वर्षी झालेल्या पहिल्या बलात्कारावर आता हा न्यायालयाचा दुसरा बलात्कार आहे… अशा वास्तविक शब्दांमध्ये त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुढे त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधी व्यसन केले नाही. मात्र, आता समाजामध्ये शिंके, थुंके, फुंके आणि भुंके अरे चार प्रकारचे व्यसनाधीनतेचे प्रकार समोर आले आहेत. याचे त्यांनी विश्लेषणही केले. प्रत्येक ठिकाणी राजकारणाचा हस्तक्षेप होत असल्याने वाढदिवसात, लग्न समारंभात, आनंदात, दुःखात सर्वत्र राजकारणाने शिरकाव केला असल्याने, सामान्यांच्या सर्व तक्रारीकडे बारकाईने लक्ष देत, पुरोगामी चळवळीतील महामानवांचे विचार, आचार त्यांचे उद्देश, दिशा, समजून घेत आपले मार्गक्रमण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना सांगितले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना प्राध्यापक केशव कातोरे यांनी अतिशय अभ्यासु पद्धतीने समतावादी व मानवतावादी समाजाची निर्मिती करणाऱ्या महामानवां प्रति कृतज्ञता व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंत सर्व महानायकांच्या गौरवशाली इतिहासा संदर्भाची वर्णन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील तत्वज्ञान त्यांनी उपस्थितांसमोर मांडले आहे.

या प्रसंगी ad. संभाजीराव बोरुडे, मुकुंद सोनटक्के, प्रदीप खामगळ, बापू माने, राजेंद्र औटी, मच्छिंद्र (काका) सुपेकर, वामन (भाऊ) भदे, साहेबराव रासकर, बबन आनंदकर, रवि लांडगे, राजू शेख, सिटीझन वृत्तपत्राचे (संपादक) आमीन भाई शेख, सुभाष बोराडे, अमित सोनवणे, दिलीप औटी, विनोद उजगरे, भीमा कोथंबिरे, गजानन गायकवाड, शिवाजी गायकवाड, कपिल उल्हारे सर, संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे, नाना शिंदे, सुरज शिंदे, ad. महेश लोणकर, भारत घोडके सह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

प्रा.रेश्मा घोडके यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न झाला.

स्त्रोत:(दिनांक १६ फेब्रुवारी २१ रोजी आयोजित विचार प्रबोधन सप्ताहातील कार्यक्रम)…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading