दिनांक ५ फेब्रुवारी, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरालगत मागील सात आठ दिवसांपासून पाळीव जनावरांच्या माध्यमांतून काही लोक सामान्य लोकांमध्ये भविष्य वर्तवित, अफवा पसरवून अंधश्रद्धा बळावेल अशा प्रकारे साधारण माणसांची दिशाभूल करत असल्याचे समोर आले आहे. दिनांक ५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये एक शिष्टमंडळ याप्रकरणी चर्चा करण्यासाठी गेल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.
त्यांनी पोलीस ठाण्यात नमूद केले आहे की, प्रत्येकाला श्रद्धा व उपासनेचा अधिकार आहे. त्यांच्या भावना दुखावन्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही. मात्र, याच श्रद्धेतून अंधश्रद्धा निर्माण होत असल्याने, काही लोक याबाबतच्या कायद्याला केराची टोपली दाखवत आहेत. याबाबतीत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा शहराच्या पूर्वेला मागील काही दिवसांपासून पाळीव जनावरांचा प्रदर्शन खेळ लावून, समाजातील साधारण माणसांमध्ये अफवा पसरवण्याचे प्रकार तसेच, लोकांची अंधश्रद्धेपोटी फसवणूक होत असल्याचे पुढे आले आहे. याच बरोबर नमूद कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जमून साथ प्रतिबंधक कायद्यालाही मूठ माती देत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाचे प्रमुख तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना लवकरच लेखी स्वरूपात तक्रार सादर करणार असल्याचे या शिष्टमंडळाने सांगितले आहे.

हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये रंग उधळत, जमीन उकरून त्याच्याखालून पाळीव जनावरांना धावण्याचा खेळ दाखवला गेला. लोकांना वारुळातून ही जनावरं निघणार, अश्या प्रकारची अफवा सर्वत्र पसरवण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात जमिनीच्या खाली मोठा खड्डा करून, वाळवी, मुंग्या व साप यांचे वास्तव्य तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात आल्याचे मत पर्यावरण प्रेमींनी यावेळी पोलिस स्टेशनमध्ये मांडले.
प्रत्येक वेळी महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी व मिरवणूकांसाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी असणे आवश्यक असते. मात्र, या ठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यक्रमास कोणतीही प्रशासकीय परवानगी घेतली नसल्याचे समजले. हा तांडा स्थलांतरित झाल्यावर श्रीगोंदा शहरातून मिरवणुकीच्या स्वरूपात पुढे जातांना शेकडोच्या संख्येने जमलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात रंग उधळून प्रदूषण केले. नाचत आरडाओरडा, गोंधळ घातला जेसीबी मशीनच्या पुढच्या खोऱ्यामध्ये बसून, उंचावरून रंग उधळण्यात आला. हे करताना उंचावरील विद्युत वाहिनींमार्फत दुर्घटनेची शक्यता अनेकांनी वर्तवली. तसेच, स्थानिक प्रशासनाने याबाबत कोणत्याही प्रकारच्या सूचना दिल्या नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.
कोरोना महामारीचे समूळ उच्चाटन झालेले नसतानां व शासनाच्या जमाव व गर्दी संदर्भातील निर्देशाला डावलून हजारोंच्या संख्येने गर्दी करीत, साथ प्रतिबंधक कायद्याला पायदळी तूडवण्यात आले. यात्रा, उरुस, उस्तव, जयंती किंवा कोणत्याही सणाआधी श्रीगोंदा पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयामार्फत शांतता कमिटीची बैठक होते. मात्र, अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात हा उत्सव होत असतांनाही स्थानिक प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेता, डोळे झाकून हे सर्व होऊ दिले.
परिणामी या प्रकरणात काही लोकांकडून अंधश्रद्धा पसरवल्याचे समोर आले. याबाबत ad संभाजीराव बोरुडे व त्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरिक्षक रामराव ढिकले यांना फोनद्वारे नमूद प्रकार सांगितला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीगोंदा शहरात या पाळीव प्राण्यांच्या माध्यमांतून अफवा पसरवणे, सामान्यांची आर्थिक लूट करणे, अंधश्रद्धा व साथ प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झाल्याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक ढिकले यांना ad बोरुडे यांनी दिली आहे. त्यानुसार चौकशी करून, खेळाचे चालक/मालक यांना प्रतिबंधात्मक नोटिसा देणार असल्याचे पोलीस निरीक्षकांनी उपस्थितांना सांगितले आहे.
श्रीगोंदा शहरातील सामान्य जनता अंधश्रद्धेच्या वेढ्यात सापडत असून, अफवांना बळी पडून, आर्थिक लूट झाल्याबाबत माहिती या शिष्टमंडळामार्फत समोर आली. त्याचबरोबर अश्या माध्यमांतून घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात जमलेल्या हजारो लोकांमुळे साथ प्रतिबंधक व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याला पायदळी तुडवल्याची प्रतिक्रिया चर्चेतुन पुढे आली आहे.
स्रोत:(श्रीगोंदा पोलीस ठाण्यात झालेली बैठक)
