दिनांक १४ जून,श्रीगोंदा:
शहरातील व्यापारी असोसिएशन प्रत्येक सामाजिक उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेत सक्रिय सहभाग दाखवून सामान्यांच्या मदतीला धावून येत असल्याचे सर्वश्रुत आहे.याप्रमाणेच कोरोना आपत्तीमध्ये व्यवसाय बंधू म्हणून कार्यरत असणाऱ्या शहरातील नाभिक बांधवांवर व्यवसाय बंदी मुळे अडचणीची वेळ आली असल्याने, अशा नाजूक प्रसंगांमध्ये त्यांना मदत करणे एका बांधवाचे काम असल्याने व्यापारी असोसिएशनने जीवनावश्यक किटची मदत केली आहे. आज रत्नकमल मंगल कार्यालयात व्यापारी असोसिएशन मार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये शहरातील बहुतांश व्यापारी उपस्थित होते. त्याचबरोबर श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीशशेठ बोरा, सतीशशेठ पोखरणा, सुभाषशेठ मुनोत, काका कदम सह इतर मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.
यावेळी सतीशशेठ पोखरणा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे, नितीन रोही यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी कोरोना प्रादुर्भावात उद्भवलेल्या विविध अडचणींचा आढावा घेतला.सामान्यांना होणाऱ्या व्यथा त्यांनी यावेळी मांडल्या.तालुक्यासह राज्यातील सर्वच नाभिक समाजाच्या व्यवसायावर कोरोनामुळे गदा आली असल्याने, त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होत असल्याचे मत त्यांनी यावेळी नमूद केले. नाभिक बांधवांचे व्यवसाय निमित्ताने ग्राहकांची अगदी जवळचा संपर्क येतो त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने, शासनाने यावर बंधन घातल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या तीन महिन्यांपासून नाभिक बांधवांचे उत्पन्नाचे स्त्रोत बंद आहेत. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असू, यासाठी त्यांनी आंदोलनही केल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र, शासन निर्णय होईल त्याअनुषंगाने प्रशासन भूमिका घेईल असेही पोनि जाधव यांनी उपस्थितांना यावेळी सांगितले. व्यापारी असोसिएशनने नाभिक बांधवांना या आपत्तीमध्ये केलेली मदत उल्लेखनीय आहे. या कार्याबद्दल निरीक्षकांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.
यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेठ बोरा, सतीश शेठ पोखरणा, सुभाष शेठ मुनोत, अनिल गांजुरे, राजू सिदनकर, चंदु कोथिंबिरे, हौसराव गाडीलकर, राजू लोखंडे, निलेश मेहेर, गौरव शेठ बोरा, नमन शेठ भंडारी, अमोल शेठ दंडनाईक, सुनील भुजबळ, सतीश शेठ भंडारी इत्यादी असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नाभिक समाजाचे कार्यकर्ता आबासाहेब मोरे यांनी व्यक्त केले. यावेळी नाभिक समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
